Friday, April 24, 2020

मांडूचं मायाजाल :पूर्वार्ध

घाट चढत आलमगीर,कमानी ,गाडी दरवाजातून बसने मांडू नगरीच्या मायाजालात प्रवेश केला. मालवा रिट्रीट या मध्य प्रदेश पर्यटनविभागाच्या  डॉर्मेटरीमध्ये आधीच बुकिंग केलं होत. हे हॉटेल मोक्याच्या ठिकाणी वसलंय. येथून माळवा दरीचं दर्शन डोळ्यांना सुखावत. दोन ते तीन दिवस मांडू मुक्काम. मांडू, मांडवगड जणू एक किल्लाच. पश्चिमेकडील माळव्याचा भाग. सातपुड्याच्या रांगांनी वेढलेला . त्यामुळे नैसर्गिक संरक्षण लाभलेला. हिंदू व अफगाण वास्तुशैलीचा सुरेख मिलाफ. मांडू मध्ये काळाच्या ओघात अनेक सत्तांतर झाली. नवव्या शतकात मांडूवर परमारांचा प्रभाव होता. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी च्या ताब्यात गेलं. नंतर दिलावर खान घौरी शासक बनला. त्याच्या मृत्यूनंतर होशंगशहा सर्वेसर्व झाला. बाज बहादूर शाह, अकबर असे अनेक मुस्लिम राज्यकर्ते झाले. मुस्लिम अधिपत्याखाली येथे अफगाण शैलीत अनेक वास्तू उभ्या राहिल्या. मांडूत एकटे असाल आणि  हे सारं फिरायचं असेल तर सायकल ला पर्याय नाही. शंभर रुपये प्रतिदिन भाड्याने मिळते.  निवांत आणि स्व मर्जीने भटकता येतं  हेही नसे थोडके.  सायकल  वर टांग मारत वारसा स्थळ मांडू नगरीचा पेटारा उघडण्यास सुरुवात केली. सुरुवात प्राचीन राम मंदिर दर्शनाने . थंडीची हुडहुडी होतीच. वाफाळलेले एम पी  फेम पोहे व चहा थंडी उडवण्यास मदत करत होते. चहा पिताना "कैसे हो सर सायकल बराबर चल रही है ना ?"  विस्मयाने पाहिलं तर म्हणाला "ये सायकल अपनी तो है" . आठवलं अरे हा तर कालचा सायकल वाला ज्याच्याकडून सायकल घेतली अंधारात चेहरा नीटसा दिसला नव्हता. पुढे म्हणाला "हमारा दिमाग कंप्युटर से भी तेज है, सब याद रहता है" मी म्हटलं "सायकल का लॉक ठीक से नहीं लगता कोई उठाके तो नहीं  लेके जायेगा ? त्याच उत्तर "यहाँ मेरी साइकिल को सब पहचानते है कोई हाथ नहीं लगाएगा कोई जरुरत हो तो फ़ोन कर लेना"

अश्रफी महल
बाजूलाच असलेल्या अश्रफी महालाकडे मोर्चा वळवला. हा महाल दोन स्तरात आहे. होशंगशहा ने जामा मशिदीच्या समोर विद्यालय (मदरसा ) उभारले. येथे विद्यार्थ्यांसाठी उभारलेले कक्ष आजही दिसतात. सफेद संगमरवर आणि लाल दगडात सुंदर अस कोरीवकाम आढळतं. महमूद खिलजी ने राणा कुंभ च्या कोठडीतून सुटून आल्यावर सात मजली विजयस्तंभ उभारला ज्याची उंची संपूर्ण मांडूत जास्त होती. आज त्याचा काही भागच शिल्लक आहे. या महालविषयी आणखी एक आख्यायिका  सांगितली जाते स्थूल झालेल्या राण्यांचं वजन कमी करण्यासाठी सुलतान पायऱ्यांवर अश्रफी म्हणजेच नाणी ठेऊन गोळा करण्यास सांगत असे. इतिहासात शिरल्यावर अशा गोष्टी ऐकायला फार गंमत वाटते.

अश्रफी महालातून दिसणारी जामी मस्जिद


अश्रफी महालाच्या समोरच भव्य जामी मशीद आहे. आत प्रवेश करताच विशाल काय घुमटावर नजर केंद्रित होते. जामी म्हणजे महान. आत गेल्यावर महानतेची आणि भव्यतेची कल्पना येते. कोरीवकाम केलेल्या संगमरवरी खांबाची शृंखला ,जाळीदार  नक्षीकाम केलेल्या खिडक्या,फुलांची सुरेख नक्षी सारं काही शाबूत . मशिदीची वास्तुकला पश्तून शैली च दर्शन घडवते. घुमटावरील नक्षीकाम अफलातून आहे. अनेक छोटे घुमट आहेत. भव्य असा प्रार्थना कक्ष. तब्बल आठ कमानींवर ,संगमरावर बारीक कोरीवकाम केलय. पश्चिम दिशेत असलेल्या भिंतीला सुंदर असा  मिहराव आहे.   जे हिंदू शैलीच प्रतीक आहे. या मशिदीची भव्यता पाहत असताना येथून पाय काही हलत नाहीत.
जामी मशीद



सुबक कमानी


भव्य घुमट




  मशिदीच्या मागेच होशंगशहा चा मकबरा आहे. याला पाहताच ताजमहाल ची आठवण येते. संपूर्ण सफेद संगमरवरात बांधलेला. याची सुरुवात होशांग शाह ने केली आणि महमूद खिलजी च्या काळात बांधून पूर्ण झाला. वर विशाल घुमट आहे. चारी बाजूला मिनार आहेत. हा मकबरा अफगाण वास्तुकलेचा अजोड नमुना आहे. द्वारावर कोरलेली कमलपुष्प आणखीनच सुंदरता प्राप्त करून देतात. त्याच परिसरात पश्चिमेकडे हिंदू शैली दर्शवणारी धर्मशाळा आहे. येथे लाल दगडी खांबाची कलात्मक शृंखला मोहित करते.
होशंग शहाचा मकबरा

हिंदू शैलीतील धर्मशाळा 



या जवळच्या वास्तू पाहत पुढे मार्गक्रमण केलं. मुख्य रस्त्यापासून थोडंसं आत महत्वपूर्ण वास्तू दारिया खान का मकबरा आहे.  संगमरावर केलेली बारीक कलाकृती अद्भुत आहे. आत निळ्या रंगाच्या टाईल्स एक वेगळंचं रूप देतात. बाजूलाच दर्या खान ची मशीद आणि सोमवती कुंड आहे. 
दरिया खान का मकबरा


सोमवती कुंड


 हे  सारं पाहून निघावं हत्ती महालाकडे. हाही हमरस्त्यापासून बऱ्यापैकी आतमध्ये. हत्तीसारखीच प्रचंड असणारी इस्लामिक आणि हिंदू कलेचं मिश्रण असलेली दगडातील ही वास्तू.  याच्या चहूबाजूंनी तीन तीन कमानी आहेत.  गोल घुमट अष्ट्कोनी  बांधकामावर बांधला आहे.  हा भलामोठा घुमट तोलण्यासाठीच खांबाचा आकार मोठा आहे. महालाच्या आत हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या व दरवाजे आहेत. सुस्थितीत असलेल्या महालाच्या स्थापत्य रचनेतील भव्यता व ऐतिहासिक महत्व आजही दिसून येतं . 
हत्ती महाल



मांडूतील सखी 

लाल सराय


थोडं पुढे गेल्यावर चार पाच वास्तूंचा समूह नजरेस पडतो. कारवा सराय मध्ये मोकळी जागा आणि चहूबाजूंनी सामान ठेवण्यासाठी व व्यापाऱ्यांसाठी राहण्यास खोल्या अशी काहीशी  मध्य युगीन युरोप शैलीतील याची रचना .  समोरच मालिक मुगीस मशीद हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. यातल्या अंतर्गत सजावटीसाठी मोझॅक टाईल्स वापर केला आहे. मशिदीच्या पूर्वेस दोन वास्तू आढळतात. दाई का महल आणि दाई की छोटी बहन का महल. दाई म्हणजे नर्स  लहान मुलांचं संगोपन करणारी. मोठा घुमट ,चहू बाजूनी दरवाजे आत फुलांची सुरेख नक्षी असा हा अष्टभुजाकार सुसज्ज असा महाल.  आज त्यांचं स्मारक म्हणून ओळखलं जातं .
सराय




मालिक मुगीस मशीद


दाई कि छोटी बहन का महल


दाई  का महल


 सायकल सुसाट निघाली रेवा कुंड च्या दिशेत .  डेरेदार झाडांचं आच्छादन आणि बाजूला पसरलेला सागर तलाव. भर दुपारीही थंडावा . वाटेत असलेला इको पॉईंट थोडं थांबण्यास प्रवृत्त करतो. हा अनुभव घेत पुढे निघावं. रस्त्याच्या उजवीकडे उंचावर जाली महाल लक्ष वेधतो .
जाली  महल





 मुस्लिम शैलीतील हे स्मारक. कमानी ,जाळी काम. इथून सागर तलाव व माळवा परिसर हा खूब सुरत नजारा दिसतो . पुन्हा मुख्य रस्त्यावर येत तडक रेवा कुंडाकडे . रेवा , परमार राजांच्या काळात बांधलेलं पाण्याचं कुंड . बाज बहादूर शाह ने त्याचा विस्तार केला . हे राणी रुपमतीचं आवडीचं ठिकाण होतं. आजही नर्मदा परिक्रमेत रेवा कुंडाला विशेष महत्त्व आहे. 
रेवा कुंड

तिकीट घेत टेकडी च्या उतारावर वसलेल्या  डोंगरांनी वेढलेल्या बाज बहादूर महालात शिरलो. तीन कमानदार दरवाजे पार करत आत प्रवेश केला. पहारेकऱ्यांसाठी येथे खोल्या आहेत. आतल्या दरवाजाने प्रवेश करताच प्रशस्त मोकळा भाग,चहुबाजूनी खोल्या व मध्ये कारंजे असा काहीसा माहोल. आतील सुरेख दालनं, तरण तलाव ,बाग त्यावेळच्या सुवर्ण काळाची साक्ष देतात. इथून एक जिना छतावर घेऊन जातो. छतावर सुरेख असे दोन बारदारी (घुमटाकार चबुतरा). महालाच्या वर असलेल्या चबुतऱ्यावरून मांडूचा सुंदर परिसर ,रूपमती महाल न्याहाळता येतो. कला आणि स्थापत्य यांचं सुरेख मिलाफ असलेला हा महाल नक्कीच मनात घर करून राहतो. 
बाज बहादूर शाह चा महाल









सज्जातून दिसणारा रूपमती महाल







टेकडी चढत रूपमती महाल पाहण्यास सज्ज झालो. दुरूनच त्याच मोहक रूप आकर्षित करतं . राणी रूपमती अतिशय सुंदर होती आणि गायची देखील सुंदर. बाज बहादूर याच कारणामुळे तिच्या  प्रेमात पडला. 
 राजा बाज बहादूर ने राणी रूपमती साठी या विशेष महालाची निर्मिती केली. याच्या खालचा भागात कमानदार खोल्यांचा समूह आहे. 

अरुंद पायऱ्या प्रशस्त छतावर घेऊन जातात. छतावर दोन चबुतरे आहेत. हा महाल राणी रूपमती व राजा बाज बहादूर यांच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो. असं म्हणतात की राणी नर्मदेचं  दर्शन घेतल्याशिवाय जेवत नसे. आणि म्हणूनच महालाच्या वरच्या भागाचा वापर नर्मदेच्या दर्शनासाठी केला जायचा खास राणी रुपमतीसाठी. 

राणी रूपमती महाल





रूपमती महालातून बाज बहादूर महाल




सज्जातून माळव्याचा आकर्षक असा परिसर डोळ्यांना समाधान देतो. 
असं म्हणतात कि रूपमती येथूनच नर्मदेचं दर्शन घ्यायची. दिवस कलायला थोडा अवधी बाकी. गार वारा सुटलाय.  सज्जात बसून  मांडूचा परिसर न्याहाळताना बाज बहादूर आणि रूपमती यांची प्रेमकहाणी डोळ्यांसमोर तरळते .  परतायची वेळ झाली. रूपमती महाल उतरताना वाटेत मांडूची प्रसिद्ध गोरख चिंच विकत घेतली. थंडीचे दिवस त्यात मांडू थंड हवेचे ठिकाण आणि दिवस मावळतीकडे निघालेला . एक मस्त असं वातावरण अनुभवत सागर तलावाच्या काठाने निघालो. सागर तलावावर थोडा वेळ बसण्याचा मोह झालाच.  हा  तलाव आणि परिसर पाहताना वाटतं निसर्गाने मुक्तहस्ते आढेवेढे न घेता उधळण  केली आहे. त्यात ही वारसा स्थळं म्हणजे  सोने पे सुहागा.
सागर तलाव




पुढचं ठिकाण छप्पन महाल.  पूर्वीच्या काळी इथे पोस्ट ऑफिस होत असं म्हटलं जातं ,जे आजूबाजूच्या छप्पन गावांना सेवा पुरवायचं म्हणून छप्पन महाल असावं. आत घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांवर मांडू आणि धार परिसरात उत्खननात सापडलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. हि मंदिरं सुलतान मांडूत येण्या आधी होती. गणेश ,शेषशायी विष्णू , पार्वती, ब्रम्हा ,सरस्वती अशा १० व्या ११व्या १२ व्या शतकात मिळालेल्या मुर्ती आहेत. या महालाचं सुंदर संग्रहालयात रूपांतर केलंय. दुसऱ्या दालनात मांडूच लोकजीवन आदिवासी जीवन त्यांची खान पण संस्कृती ,वेशभूषा मनोरंजनाची साधनं हे सारं मॉडेलच्या रूपात अनुभवता येत.












छप्पन महाल


दिवसाची सांगता होत होती. कालचा सूर्यास्त चुकला होता . तडक सनसेट पॉईंट गाठला. माळव्याचं दूरवर पसरलेलं खोरं. मऊशार थंडी . प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या. पश्चिम क्षितिजावर लाली उठू लागली. सारं स्तब्ध. लक्ष त्या माळव्या पलीकडे जाणाऱ्या गोळ्या कडे. दिवसभरात केलेली  मांडू भ्रमंती आठवत होतो. सूर्य पल्याड विसावला. अंधार पडू लागला. मांडूच्या चौकात चहा आणि इंदूरहून उशिरा आलेल्या सायकलिस्ट ग्रुप शी गप्पा ठोकत दिवसाची सांगता. 


कसं  जायचं ?

इंदोर हून जवळपास १०० किमी 
स्वतःच वाहन असल्यास उत्तम.
थेट बस सेवा नाही. इंदोर (गंगावल  बस स्टॅन्ड) ते धार 
धार ते इंदोर  जवळपास ४० किमी