झिम्माड पावसात पोट भरून भटकंती केल्यावर सरत्या पावसातली भटकंती करायची फार इच्छा होती.(सह्याद्रीत कितीही भटकंती केली तरी पोट काही भरत नाही. सह्यभ्रमणाची भूक काही भागत नाही.) बरेच दिवस सह्याद्रीची भेट झाली नव्हती. या भटकंतीसाठी रतनगड खुणावत होता. सह्याद्रीत अनेक दुर्गरत्न आहेत त्यातलचं एक रतनगड .सह्याद्रीच्या अनेक रंगांनी सजलेल्या माळरानांवरचं पुष्प वैभवही अनुभवता येईल आणि अमृतेश्वराचं दर्शन होईल म्हणून रतन गड पक्का केला. Travel त्रिकोण सोबत रतनवाडीस जाण्यास निघालो. बस वेगाने मार्गक्रमण करत होती. बस घोटीच्या आसपास अचानक धीमी झाली. पहातो तर गाड्यांची रांगच रांग लागली होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्यामुळे गाड्यांची वाहतूक रोखण्यात आली होती. मन बेचैन झालं होतं. रतनगड होतोय की नाही धाकधूक होती. पण नशिब दांडग बस त्यातून बाहेर पडली. भंडारदऱ्याच्या जवळ गार वारा सुटला होता. साम्रद,उडदवणे अशी गावं मागे टाकत बस मार्गस्थ होत होती.शेवटी पहाटे साडेपाच च्या सुमारास रतनवाडीत पाऊल टाकलं. प्रातःविधी उरकेपर्यंत तांबडं फुटायला लागलं होतं. रतनवाडीचं ते रूपडं न्यारं दिसत होतं. अमृतेश्वराचं मंदिर, धरणाचं पाणी,चहूबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा. खरंच अकोले तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलीय याची प्रचिती येते.
कांदेपोहे पोटात ढकलल्यावर पाऊले रतनगडाची वाट चालू लागली. थोड्याचं वेळात प्रवरेचं पात्र ओलांडल आणि जंगल वाट सुरू झाली. दाट जंगल असल्यामुळे ऑक्टोबरचा तडाखा जाणवत नव्हता. वरून रतनगड कौतुकाने पाहत होता. पावलं झपझप पुढे चालत होती. पुढे थोडी थकवणारी चढाई. थोडं चालल्यावर एक चौफुली लागते. इथून एक वाट कात्राबाईमार्गे हरिश्चंद्रगडावर जाते. याच वाटेवर जवळचं पाण्याचं टाकं आहे. उत्तरेकडनं येणारी वाट साम्रदमधून येणारी. टाक्यातलं थंडगार पाणी पिऊन तरतरीत होऊन थोडं विसाव्यासाठी थांबलो. आणि पश्चिमेकडे कूच केलं.तासभर जंगलातून मार्गक्रमण केल्यावर समोर शिड्या उभ्या ठाकतात. शिड्या पार करत गणेश दरवाज्याकडे आलो. माथ्यावर भैरोबाची सुंदर कोरीव मूर्ती . डाव्या बाजूला गणपतीचं दर्शन झालं. पुढे हनुमान दरवाज्यात एका बाजूला रिद्धी सिद्धी व दुसऱ्या बाजूला मारूतीराया. या शिल्पांचं कोरीवकाम पाहता गडाचा इतिहास फार प्राचीन आहे हे लक्षात येतं.
स्वतःला पसरत ताणून द्यावीशी वाटत होती. पण वेळ नव्हता. मन नाराज झालं. रतनगडाचा निरोप घेतला. परतीच्या वाटेचा प्रवास सुरू झाला. गावात उतरलो. सकाळी अमृतेश्वराचं दर्शन राहून गेलं होतं. मंदिराच्या आवारात दाखल झालो. हे हेमाडपंथीय धाटणीचं प्राचीन छोटेखानी मंदिर मोहून टाकतं. मंदिर बारकाईनं पाहण्यास सुरूवात केली. कोरीवकाम,खांबावरील नक्षी अफलातून. त्याकाळच्या स्थापत्याची दाद दिलीच पाहिजे. अमृतेश्वरचं दर्शन घेतलं. असा हा निसर्गाच्या कुशीतला अमृतेश्वर ,रतनवाडीची शान. मंदिराच्या बाजूस एक पुष्करणी आहे. बाजूलाच पुरातन मूर्त्या ठेवल्या आहेत. सुंदर असं मंदिर पाहून रतनवाडीची भेट सार्थक झाली. जेवण झाल्यावर पाण्यात डुंबत गड उतरताना आलेला सारा थकवा निघून गेला. नंतर ट्रेकच्या आठवणी घोळवत मुंबईकडे रवाना झालो.
रतनगड :
पायथ्याचं गाव : रतन वाडी किंवा साम्रद
चढाई श्रेणी :मध्यम
कालावधी : ३ -३. ५ तास
भेट देण्यास योग्य काळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी (ऑक्टोबर सर्वोत्तम फुलांचा उत्सव फोटोग्राफीसाठी अनुकूल )
रतनगड :
पायथ्याचं गाव : रतन वाडी किंवा साम्रद
चढाई श्रेणी :मध्यम
कालावधी : ३ -३. ५ तास
भेट देण्यास योग्य काळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी (ऑक्टोबर सर्वोत्तम फुलांचा उत्सव फोटोग्राफीसाठी अनुकूल )
Mast....khoop chaan
ReplyDelete