Wednesday, April 12, 2017

सह्याद्रीतली पायपीट (कमळगड- कोळेश्वर पठार-जोर-बहिरीची घुमटी-आर्थर सीट )

कडक उन्हाळा. त्यात एखादा ट्रेक करायची खुमखुमी आली होती. एखाद्या तगड्या ट्रेकच्या शोधात होतो. आणि चक्रमचा ट्रेक मिळाला. कमळगड ते आर्थर सीट. एकदम सणसणीत. चक्रम प्लान. कमळगड कोळेश्वर खूप दिवसांपासून खुणावत होते. मुलुंडवरून निघायच होतं. सगळे जमले. आम्हाला नेणारी गाडी आलीं. अथर्वचे बाबा म्हणाले कोंबडागाडी. कोंबडागाडी म्हणजे फोर्स ची क्रुझर हो. त्या कोंबडागाडीत सगळे बसलो. प्रवास सुरू झाला. खंडाळा घाटातल्या ट्राफीक ने थोडं बेजार केलं. मुंगीच्या पावलाने गाडी पुढे सरकत होती . पहाटे खेड शिवापूर ला  गाडीतून उतरलो तर अंग शहारलं. मुंबईत वाफा तर इथे थंडी. वेगळचं अगदी. चहा मारत पुढचा प्रवास सुरू केला. सकाळ होत होती. बऱ्याच ठिकाणी मोरांनी दर्शन दिलं. आकोशी  गावात पोहोचलो. एका जर्मन शेफ़र्ड़ने आमचं दमदार स्वागत केल.

भू भू 

प्रातःकालची काम आटपली. चहा पोहे घेत आमच्या नऊ जणांच्या चमूने कमळगडाकडे वाटचाल सुरू केली. थोडा उशीरचं झाला होता. चढण सुरू झाली. नारायणराव बऱ्यापैकी वर आले होते. आम्ही सोंडेवरून मार्गक्रमण करत होतो. धोम धरणाचं निळशार चमचमणारं पाणी पाठ काही सोडत नव्हतं. त्या पाण्याकडे पाहत चढाई सुरू होती. 

गावात उतरणारी सोंड व धोम जलाशय 


पहिल्या दिवशी मार्ग दाखवणारे  मामा 

दूरवर पांडवगड दिसत होता. वर चढत पठारावर आलो. मामांच्या घरी थंडगार पाण्याने   तृष्णा  भागवली अन् पावलं पुढे निघाली. एक छोटासा कातळटप्पा पार केला. थोडं पुढे गेल्यावर शिडी लागली. चढत माथ्यावर आलो. काय दृश्य होतं ते. नजर फिरवली तर रायरेश्वर समोरच ठसठशीत केंजळगड, रोहिडा ,दूरवर कोळेश्वर पठार , केट्स पॉईंट. सारचं विलक्षण. गेरूच्या विहीरीकडे लक्ष गेलं. या काव्याच्या विहिरीत पायऱ्या उतरत खाली गेलो अदमासे ६० फूट.  येथे कोळ्यांचं साम्राज्य आहे. उतरताना थोडं सांभाळून उतराव लागतं कारण माती घसरते. आत एकदम गारव्याचा अनुभव येतो. बाहेर कडक उन आणि आत थंडावा. एकदम अचंबित व्हायला होतं. अजोड स्थापत्यकला. या अवशेषाशिवाय गडावर पहाण्याजोगं काही नाही.

केंजळगड 


गेरुची विहीर 



आम्ही मोर्चा वळवला तो कोळेश्वरकडे. मध्ये गोरक्षनाथाच्या मंदिराकडे पोटपूजा केली. सर्वात छोटा ट्रेकर अथर्वचा पाय दुखावल्याने त्याच्यासोबत आलोक नंदगणे गावात उतरला. आणि आम्ही ७ जण मामांसोबत  पुढे निघालो. सोबत वाटाड्या असलेले मामा वय अवघ पंचाहत्तर तरीही ताडताड चालणारे या जंगलात ते दहा वर्षांनी आलेले तरीही कुठेही वाट चुकले नाहीत. आम्ही अवाक झालो. मध्येच चढण ,उतरण,सपाटी असा प्रवास सुरू होता. मध्येच शरीराला दिलासा देणारा गार वारा सोबत होताच. गच्च झाडी असलेली सुखाची वाट होती.

कोळेश्वर मंदिर 

कुठेकुठे नेचेच्या बनातून वाट काढावी लागत होती. पठार संपता संपेना. एका गर्द झाडीतून झाडांच्या सानिध्यात असलेल्या कोळेश्वर मंदिरापाशी येऊन ठेपलो. छप्पर नसलेलं हे मंदिर.बाजूने चिरे लावण्यात अले आहेत. मध्ये मुखवटा.  पुढे नंदी. येथे थोडं विसावलो. आता जोर गावात उतरायचं होतं तेही अंधार पडायच्या आत. ताडताड चालायला लागलो. पुन्हा सुखाची वाट. पुढे तीव्र उतार घसाऱ्याचा रस्ता. खाली जोर गाव दृष्टीक्षेपात आलं. परंतु अजूनही बरीच तंगडतोड बाकी होती. झपाझप खाली उतरत होतो. पाय नको म्हणत होते पण पर्याय नव्हता उतरणं भाग होतं. जोर गावात पाऊल टाकलं. एका शाळेच्या व्हरांड्यात पथारी पसरली. सर्वजण थकले भागलेले. चहा सूप झालं. गप्पा झाल्या. जेवणात खिचडी,बटाट्याची तिखट भाजी,पापड,लोणचं असा साग्रसंगीत बेत होता.कडाडून भूक लागल्यामुळे सारे तूटून पडले आणि झोपी गेले. पहाटे लवकर उठत आवराआवर केली सँडविच ,चहा घेत बहिरीच्या घुमटीकडे निघालो. सकाळच्या  प्रसन्न वातावरणात भरभर चालत होतो. वाट जंगलातली होती गच्च झाडी सूर्यप्रकाशही आत पोचणार नाही अशी. नीरव शांतता. फक्त काय ती पक्षांची सुरावट व पायाखालच्या पाचोळ्याचा  चालताना होणारा आवाज शांतता भेदत होता. थोडा उन्हाचा टप्पा पार करत बहिरीच्या घुमटीकडे पोचलो. दर्शन घेतल. चहूबाजूस निरखलं. तर  सह्याद्रीच विहंगम दृश्य चंद्रराव मोरेंचा चंदरगड,मंगळगड महादेवाचा मोरा,कामथे,ढवळे घाटातून येणारी वाट, अथांग पसरलेल जावळीचं निबिड अरण्य. सारंचं भुरळ घालणारं. इतिहास आठवू लागलो. चंद्रराव मोऱ्यांनी महाराजांना दिलेलं आव्हान. राजांनी केलेला पाडाव. जावळीचा रणसंग्राम ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. अफझल खान याच जावळीच्या खोऱ्यातून राजांना भेटायला गेला. खानाचा वध व आदिलशाही सैन्यास नामोहरम केलं. इथला इतिहास आणि भूगोल एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. इथे क्लिकचा आवाज झालाचं.  

बहिरची घुमटी 



दुसऱ्या दिवशी  मार्गाला लावणारे मामा 


झाडीतून आर्थर सीटच्या मार्गी लागलो. मध्ये टाक्यापाशी तहान शमवली. याला जोरचं पाणी म्हणतात. जोर गावातून निघाल्यावर मध्ये कुठेही पाणी नाही. मढी महलची चढण सुरू झाली. घसरडीचा सिलसिला सुरू झाला. पाय खाली सरकत होते. नेटाने चढत होतो. एक जीवघेणी चढण चढत वर आलो तोच दिमाखात उभा असलेला प्रतापगड दिसला. प्रतापगड पाहून मनोमन सुखावलो.  खाली पसरलेलं सावित्रीचं विस्तीर्ण खोरं. डाव्या बाजूला मधु मकरंद. पुढे होत गाढवाच्या माळावर आलो. मढी महल अर्थात आर्थर सीट स्पष्ट दिसू लागला. झाडीतून चिंचोळ्या वाटेने कारवीच्या बनात शिरलो. 

 सर्वात छोटा ट्रेकर 

उजव्या बाजूला खोल खोल दरी. समोरचा महाबळेश्वराचा डोंगर रांगडा भासत होता. पुन्हा खडी चढण सुरू झाली. प्रतापगड मध्येच डोकावत होता. खडी चढण काळजीपूर्वक पार करत १५ फूटी कातळटप्प्याकडे आलो. कातळाला चिकटत हात पाय रोवत हाही टप्पा काळजीपूर्वक पार केला. आर्थर सीटवरील माणसंही आता ठळकपणे दिसू लागली. बस अभी थोडी दूरी. चढण पार करत लोखंडी रेलिंग सफाईदारपणे ओलांडत माणसांच्या गर्दीत पोहोचलो. कारने किंवा इतर वाहनांनी वर पोचलेली माणसं कौतुकानं पाहत होती. प्रश्न पडला असणार खालून कूठून आले? एकाने विचारल कहांसे आये? त्याला सांगताना अंगावर उगाचच मूठभर मांस चढलं. आर्थर सीटच्या चौथऱ्यावर गेलो. रविवार असल्याने बरीच गर्दी होती. सेल्फीसेशन चालू होत. त्या गर्दीतून वाट काढत समोरचा सह्याद्रीचा अवाढव्य नयनरम्य परिसर नजरेत भरून घेतला. प्रतापगड,सावित्रीचं दूरवर पसरलेलं खोरं बरंचं काही. वाई ला आलो मस्त एका होटेलात ताव मारला व मुंबईकडे परतलो. पूर्ण ट्रेकभर बऱ्याच ठिकाणी सावली असल्याने सुसह्य  झाला. संत्री व काकड़याचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडला. सी  जीवनसत्व जरा जास्तच  झाल. असो. 



3 comments: