Sunday, March 19, 2017

तंगडतोड : रतनगड ते हरिश्चंद्रगड


एक भन्नाट वारी. वारीचं म्हणायची ती. मागच्या खेपेस कुमशेत ते कात्राबाई केला होता पण वेळेअभावी रतनगड हुकला होता. संधी चालून आली ती डोंबिवलीच्या ट्रेकक्षितिज मुळे. शुक्रवारी बँग भरली. अंगात थोडा ताप असल्याचं जाणवत होतं. थकल्यासारखं वाटत होतं. तंगडतोडीला जावं की नको तळ्यात मळ्यात चाललं होतं. पस्तीस चाळीस किमी रपेट जमेल कि नाही ?  शेवटी शेंडी तुटो की पारंबी म्हणत तळ्यात उडी मारली म्हणजेचं तंगडतोडीस स्वतःला सज्ज केलं. क्रोसीन घेत बस प्रवास सुरू झाला. बस रतनवाडीच्या दिशेने धावत होती. गाढ झोप केव्हा लागली कळलचं नाही. भल्या पहाटे रतनवाडीस पोहेचलो. पहाटेच्या नीरव शांततेत मंदिरातील किर्तनाचे सूर कानी पडत होते. थोडा गारवा जाणवत होता. पाठीवरील बोचकी  ठेवत काळोखाचा फायदा घेत महत्त्वाची कामं आटपून घेतली. पोटाची साफसफाई झाली. सगळे पोह्यांवर आडवे पडले. आणि गवती चहा. बेस्टचं एकदम. एव्हाना उजाडू लागलं. रतनवाडी हळूहळू जागी होत होतं. रविकिरणं अमृतेश्वरावर पडत होती. रतनगडचा खुट्टा ,नेढं खुणावत होतं. अमृतेश्वराची ओढ लागली. एक धावती भेट घेतली. याचं सौंदर्य कितीही वेळा पहा डोळ्यांचं समाधान होतंचं नाही.