Tuesday, July 2, 2019

सैर माथेरानची व्हाया उंबरणे वाडी

                                                                                       
जून महिना सुरु झाला. पावसाळी ट्रेकचे वेध लागले. जून संपायला आला तरी पावसाने दडी मारलेली. चक्रम हायकर्स चा माथेरान ट्रेक मार्गे उंबरणेवाडी. गेल्यावर्षी दोनदा माथेरान सैर झाली होती. म्हटलं यावेळी वेगळ्या मार्गाने जाऊ. तसही हल्ली पावसात गड किल्यांवरची जत्रा पाहता मळलेल्या वाटा सोडून या कमी गर्दीच्या आडवाटांवर  पावलं टाकणं पसंत  करतो. असो. ऑक्टोबर पासून सह्याद्रीची गाठ भेट नव्हती. पावसाळी ट्रेकची चांगली सुरुवात म्हणून जाण्याचं ठरवलं. लोकल ने कर्जत गाठलं. पावसाचा काहीच पत्ता नसल्यानं ऐन जून मध्ये उन्हाळी ट्रेक होणार हे निश्चित होतं. मिसळीचा फडशा पाडत आंबेवाडी कडे कूच केलं . पावसात दुथडी भरून वाहणारा मोरबे जलाशय सुका सुका वाटत होता. पाण्याची पातळी खूपच खाली गेली होती. तोही बिचारा पावसाच्या प्रतिक्षेत .  आंबेवाडीत पोहचल्या पोहोचल्या दूरवर दिसणारा इर्शाळगड स्वागतासाठी तयार  होताच. 
इर्शाळगड आणि आंबेवाडी 

बारकाईनं पाहिल्यास त्याची खिडकीही नजरेस पडत होती. ओळख परेड आणि सूचनांचं सोपस्कार झाल्यावर तडक उंबर्णे वाडीची वाट धरली. आमचा दहा जणांचा छोटासा ग्रुप. नेता व उपनेता अनिकेत. एक मिरवणकर आणि दुसरा रहाळकर. ऊन चांगलंच तापायला लागलं होत.  पानगळ झाल्यामुळे सारंच रुक्ष वाटत होतं. पावसाच्या धारांची जागा घामाच्या धारांनी घेतली होती. इर्शाळ चा सुळका आणि प्रबळ चा काळा  बुरुज आणि काळी कभिन्न भिंत सोबतीला होतेच. 

वाटचाल 


बऱ्याच काळानंतर ट्रेक करत असल्याने सुरुवातीस  वेग मंद होता.थोड्याच वेळात नेहमीच्या लयीत आलो. सपाटीवरून झपझप पावलं पडत होती. झाडाचं एक पान हलेल तर शपथ . मधेच एक गावकरी मामा भेटले उंबर्णे वाडीची विचारणा झाली. म्हणाले पुढे जाऊन डाव्या हाताला  वळा. ओढा पार केलात कि खाली गाव. त्यांच्या सांगण्यावरून पुढे निघालो . डावीकडची वाट गावात घेऊन जाते आणि सरळ गेलात तर माळावर आणि तेथून माथेरान. आम्ही डावीकडे गावात निघालो. वाटेत ओढा. पाणी नसल्याने खडखडाट. खाली टुमदार अश्या मोजकीच घरं असलेल्या उंबर्णे वाडीत पोहोचलो. सूर्यदेव चांगलेच वर आले होते. पाणी भरण्यास विहीर कुठे दिसते का ते पाहू लागलो. एका ताईंनी सांगितल कि विहीर नाही. खाली जाऊन खूप लांबून पाणी आणावं लागत. तरीही एका घरातून आमच्यासाठी हंडा भरून ठेवण्यात आला. भर उन्हाळ्यात पाणी नसताना दाखवलेला हा  मोठेपणा . मन भरून आलं. काही क्षणांची विश्रांती घेत पावलांनी वेग घेतला. एक टेपाड चढत वर आलो. 


आता खरी चढण सुरु झाली. एव्हाना भट्टी चांगलीच तापली होती.  मधेच येणारी मंद झुळूक फुंकर घालत शरीरास दिलासा देत  होती.  खडी चढण , कडक ऊन ,दमट हवा चांगलीच दमछाक होत होती. छातीचा भाता फुलत होता. एक छोटा कातळटप्पा पार करून वर आलो. नशिबाने वारा  वाहू लागला.  विसाव्यासाठी बसकण मारली. 




समोर दिसणारं दृश्य झिम्माड नसलं तरी मोहित करणारं. मोरबेचा  पसरलेला जलाशय, दिमाखात उभा  इर्शाळ चा सुळका . प्रबळ गड . सोबतीला दिलासा देणारा गार वारा. भान हरपलं. वर चढताना आलेला शीण क्षणात पळाला. सह्याद्रीतला माहोल धुंद करतो.  या सगळ्यात भर पडली  ती केतकीच्या सुरांनी. आम्ही गमतीत मेघ मल्हार म्हणायला सांगितलं जेणेकरून पाऊस तरी पडेल. येथून उठावंसं वाटत नव्हतं पण पुढे जाणं भाग होतं.  थोडं पुढे गेल्यावर बेचक्यात बसवलेली अंधुक शिडी दृष्टीस पडली. म्हटलं चला आता काही क्षणांची दुरी. पहिल्या शिडीपाशी आलो जवळपास पंधरा फुटांची लोखंडी तारांनी बांधलेली लोखंडी शिडी. 
पहिली शिडी 


फारशी मजबूत नसल्याने जरा जपूनच. शिडी पार  करताच पावसाच्या सारी कोसळण्यास सुरुवात झाली. प्रतीक्षा संपली. कदाचित पावसाने मेघ मल्हार ऐकला असावा. उजव्या बाजूला वळत अरुंद ट्रॅव्हर्स पार करायचा. येथे थोडी सावधगिरी ने पावलं टाकावीत. तसच वर मधमाश्यांची पोळी आहेत. आवाज न करता पुढे चालत राहावे. डाव्या बाजूस गुहा आहे. कदाचित पिसारनाथांची असावी. एक मंदिरही आहे. 
ट्रॅव्हर्स 

दुसरी शिडी डाव्या बाजूला धबधब्यात बेचक्यात बसवली आहे.  ट्रॅव्हर्स पार करताना नजरेस पडत नाही. सुमारे ३० फुटांची लोखंडी शिडी. सध्या शिड्यांवरून खूप वाद होतात गर्दी वाढते असं म्हणतात. इथे शिड्या असूनही कोणी फिरकत नाही. सध्या प्रसिद्ध गड किल्ले,वाटांवर  फिरणे, म्हणजे ट्रेक असं समीकरण झालंय. हे कुठेतरी बदललं पाहिजे. एखाद्या ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा एखादी जंगलवाट देखील सुखावून जाते. 

पावसामुळे इर्शाळगड धूसर झाला होता. आणखी एक छोटीशी शिडी पार केल्यावर खेळ सुरु होतो तो कातळटप्प्यावरील चढाईचा. 

सोप्या श्रेणीचा पण पावसामुळे सावध चढाई करावी. होल्ड साठी हातांची  पायांची कसरत करत पोहोचलो बुवा एकदाचे वर. आता दाट जंगलाचा टप्पा. माथेरान आवाक्यात आल्याची खूण . जवळपास पोहोचलोच. या टप्प्यावर अरुंद वाटेवर मी मागे होतो. मागे वळून पाहतो तर एक बऱ्यापैकी मोठं माकड चालत येतंय. वेग वाढवला. बॅगेत खाणं होत. इथल्या माकडांच बॅगेकडे जास्त लक्ष असत. त्यामुळे बॅग्स सांभाळाव्यात. शार्लेट तळ्यावर पोहोचलो .पिसारनाथ मंदिर गर्द झाडीत वसलेलं. दर्शन घेत जेवणाचा कार्यक्रम आटपला. येथील पुजारी काकांशी बोलताना कळलं कि आता आपण माथेरान च जंगल  हे पूर्वीच्या तुलनेत फक्त २५ % शिल्लक आहे. मनात विचार  आला पुढच्या पिढीसाठी हे जंगल असेल कि नाही? काय करणार कालाय तस्मय नमः . 
पिसारनाथ मंदिर 

एव्हाना ३ वाजले . परतीचा प्रवास सुरु करायचा होता. कडक चहा मारत सूर्यास्त बिंदू (सनसेट पॉईंट) कडे निघालो. तिथून खाली उतरायचं होत. माथेरान च्या लाल रस्त्यांवरून गर्द झाडीतून रपेट सुरु झाली. 

सनसेट पॉईंट कडे फारसं कोणी फिरकत नाही. त्यामुळे एकांत अनुभवता येतो. खाली दुधाणे गाव दिसत होत. जिथे आम्हाला उतरायचं होत. आम्हाला सूर्यास्ताआधी खाली उतरायचं होत. रेलिंग च्या बाजूने उतरण्यास सुरुवात केली.  सुरुवातीचा टप्पा बऱ्यापैकी  तीव्र उताराचा. पण फार कठीण नाही. 


उजव्या बाजूस पेब लक्ष वेधून घेत होता. पाय झपझप उतरत होते कारण ६:३० ची शेवटची पनवेल एस टी पकडायची होती.  एका टप्य्यावर उजव्या बाजूस दुधाणे ला वाट जाते. खाली उतरताना बलाढ्य चंदेरी , नाखिंद या रांगा लक्ष वेधतात . 
चंदेरी 


पेब किल्ला 

पेब खुणावत होता . एकंदर सुंदर अशी वाट. अखेर गावात उतरलो. फ्रेश होत ६:३० च्या एस टी  ची वाट पाहत थांबलो. वेळ निघून गेली अनिकेत ने खाजगी वाहनाने पनवेलला जायचा निर्णय घेतला. एक मस्त असा ट्रेक सुखरूप पार पडला. 

काही नोंदी :
कर्जत ते आंबेवाडी : खाजगी वाहन 
आंबेवाडीपासून ३.५-४ तास 
पिसारनाथ मंदिर ते दुधाणे गाव :२.५ तास 
दुधाणे गाव ते पनवेल :एस टी (शेवटची ६:३०) /खाजगी वाहन 
श्रेणी: मध्यम 
वर्षभर जाण्यास अनुकूल (पावसाळा सोडल्यास पुरेसा पाणी साठा सोबत घ्यावा )

विशेष आभार: चक्रम हायकर्स मुलुंड 
२२ जून २०१९