Wednesday, April 4, 2018

अहुपे घाट व भैरोबा दार


                       प्रचंड झाडोरा माजलेला..... प्रचंड घसारा.... 
                बाजूला काही आधार नाही... असलीच तर ती 
                सुकलेली कारवी.... तुटून हातात येते...... 
                बुटांनी जोखत वाट काढावी...... 
                पाच सहा फुटांवरून बॅग सावरत....... 
                पाय टेकवण्याचा प्रयत्न.....   
                काही ठिकाणी पाच -सहा फूट     
                खाली घसरतोय...... 
                नाळेतले मोठमोठाले दगड  ......
                पदरातील निसरडी वाट ..... थ.. रार... क 
                                               

अहुप्यातील सूर्योदय 




डिसेंबर २०१७ च्या सह्यांकन नंतर सह्याद्रीत फिरकलोच नव्हतो. जानेवारी तर असाच गेला. तगड्या ट्रेकच्या शोधात होतो. पण शक्य होत नव्हतं. शनिवारी रात्री ट्रेकर मैत्रिण शिल्पाला सहज फोन केला. तिच्याकडून कळलं कि ती आहुपे भैरोबा दार ट्रेक साठी निघतेय. "तू येतोयस का?" घाटवाट म्हटल्यावर काही आढेवेढे न घेता हो म्हणून टाकलं. अकरा ची यष्टी हातात फक्त एक तास. गरजेपुरत सामान बॅगेत टाकलं उचलली बॅग लावली पाठीला. सात टाळकी मुरबाडकडे निघाली. गाडीत ट्रेकच्या व  नॉर्थ इस्टच्या गप्पा रंगल्या. मुरबाडहून साडेबाराची मिल्हेला जाणारी यष्टी पकडायची होती. तिथे कळलं कि ती पुरेस भारमान नसल्याने बंद करण्यात आली होती. आम्हा ट्रेकर्सना ही गाडी खूपच फायद्याची होती. थोडं हिरमुसलो. नियंत्रकानं सांगितल कि रात्री स्टँडात झोपा सकाळी साडे सहाची गाडी आहे. रविवारी रद्द असते गाडी पण खास तुमच्यासाठी सोडतो. यष्टीचं  एवढं सौजन्य पाहून मनोमन सुखावलो (सौजन्य सप्ताह वगैरे नव्हता बर का)दुसरा पर्याय होता खाजगी वाहनान खोपिवली गाठायचं. आम्ही दुसरा पर्याय निवडला कारण वेळ वाचवण्यासाठी आणि ऊन टाळण्यासाठी आहुपे घाट रात्रीच पार करायचा होता. बाहेर दोन रिक्षा उभ्या होत्या पण रिक्षामागे पाचशे असं अवास्तव दर सांगितला. घासाघीस करत तयार झाले. अखेरीस खोपिवली गाठलं. वस्तीची एसटी उभी होती. थोडी तयारी करत अहुपे घाट चढण्यास सुरुवात केली. रात्रीची नीरव शांतता. पुढे जाताच एक गोरखगड चा फलक आहे. इथून एक वाट गोरखगडाकडे जाते आम्ही डाव्या हाताला निघालो. तशी अहुपेची वाट साधी सोपी रमतगमत करण्याजोगी. आजही ह्या वाटेवर राबता असतो. अहुप्यातली लोक थेट खोपिवलीत उतरतात. काळाच्या ओघात काही घाटवाटा अनवट होत चालल्यात. पुढे विश्रांतीसाठी थांबावं लागलं. पोटात काहीबाही ढकललं. अंधुक प्रकाशात  गोरख मच्छिन्द्र जोडी एकदम सुरेख दर्शन देत होती. आकाशात लगडलेल्या चांदण्या फारच सुरेख दिसत होत्या. थोडं आकाशदर्शन झालं. आराम होताच पुन्हा चढण्यास सुरुवात केली. आता मात्र हळूहळू खडी चढण सुरु झाली. छातीचा भात चांगलाच फुलत होता. रात्रीच्या शीतलतेमुळे थकवा जाणवत नव्हता. वळणदार वाटेच्या पायऱ्यापाशी पोहोचलो. कोकणात वर उठावलेली गोरख मछिंद्र जोडगोळी फारच खाली वाटत होती. हे सारं डोळे भरून पाहत सुरेख वळणदार वाट माथ्यावर घेऊन गेली. शरीरास गार वारा लागत होता. अहुपे गाव थोडं अंतरावर होत. पठारावरून चालत गाव गाठलं व एका घराच्या अंगणात पथारी पसरली. पाच वाजत आले होते. दोन अडीच तासांची झोप मिळेल असा विचार करून झोपी गेलो. थंडी स्लिपींग बॅग मधून आत शिरत होती. 
सकाळी उठताच अहुपे गावाचं सुंदर दर्शन झालं. नारायणराव वर येण्याच्या तयारीत होते. आमचं सगळं आरामात चाललं होत. घाई अजिबात नव्हती. चहा झाला. घरातल्या मामाना वाट दाखवण्यास सांगितलं. मामानी आधीच नन्नाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. वाट पार मोडलेय कोणी त्या वाटेला जात नाही. भयंकर घसारा व झाडोरा माजलाय. दगड कोसळलेत. मीच त्या वाटेने बरीच वर्ष गेलो नाही. तुम्ही वाट चुकाल.  अशी कॅसेट सुरु झाली. त्यांनी आम्हाला अहुपेन उतरायचा सल्ला दिला. आम्ही कसले ऐकतोय. घाटवाटांचं भूत मानगुटीवर बसलं कि ते उतरवणं महाकठीण असत. आम्ही मामाना सांगितलं आम्हाला नाळ उतरवून द्या आम्ही पुढे जातो. (सगळे भिडू तयारीचे व सोबत सुरक्षा साहित्य  असल्याशिवाय वाटाड्याना कठीण वाटेने जायचंय हा आग्रह धरू नये. त्या भागाची चांगली माहिती असते. त्यांचं ऐकावं). अजून एक प्रश्न होता गावात मामाना साखरपुड्याला जायचं होत. त्यांनी मुलाला विचारलं पण त्याला वाट नीटशी माहित नव्हती. अशा वेळी जुनीच खोड कामी येतात. आमचा उत्साह पाहून मामा यायला तयार झाले. पाणपिशव्या  भरून घेतल्या कारण वाटेत पाणी कुठेच नाही. पठार तुडवत पुढे निघालो. अहुप्याचा भव्य कोकणकडा नजरेस पडला. रस्त्यावरुन पुढे जाताच अहुप्याच्या देवराईत आलो. इथे पोचताच निरामय शांतता अनुभवण्यास मिळाली. उंचच उंच झाड गच्च झाडी. आणि त्या गर्द झाडीत लपलेलं भैरोबाच राऊळ. काही गावकरी भेटले. त्यांनीही या वाटेने जाऊ नका अस काळजीपोटी सांगितलं. थोडं घाबरलो.  पण निश्चय केलाच होता. वाट सुखरूप उतरावी यासाठी भैरोबाचे आशीर्वाद घेतले व झाडीतून आत शिरत उतरण्यास सुरुवात केली. पाहतो तर दाराचं स्वागतच घसऱ्याने. पाऊल मावेल एवढी वाट गच्च माजलेली झाडी. पावलागणिक घसरायला होत होत. आधार काहीच नाही. जणू काही भैरोबा दार सांगत हॊत माझ्या वाटेला  जाण्याचं धाडस करताय जरा सांभाळून. 

प्रचंड झाडोरा 


सुरुवातच पाहून पुढे काय काय वाढून ठेवलय आणि काय भोगायला लागेल हे नीटच समजलं. घसाऱ्याचा पहिला टप्पा पार करत खाली उतरलो. आता नाळ स्पष्ट दिसत होती. तीव्र उतार पाहून धडकीच भरली. सांभाळूनच खाली उतरलो. नळीत  शिरलो. दगड धोंडे तुडवत निघालो. छोटे छोटे कातळटप्प्यांवर पायांवर भलताच ताण येत होता. काही ठिकाणी तर पाय पुढे टेकवत पाठीचा आधार घेत चिमणी तंत्राने उतरावं लागत होत. पाच ते सहा फुटांवर पाय टेकवण्याचा प्रयत्न करत होतो, मधेच वाट पदरात शिरत होती. हि वाटही फारशी सोपी नव्हती. गवताचा घसारा, वाटेत आड येणाऱ्या वेली माजलेला झाडोरा. आधारासाठी होती ती सुकलेली करावी तीही तुटून हातात येत होती. 


एका ठिकाणी तर पर्यायच उरला नाही. लहानपणीची घसरगुंडी आठवली श्वास रोखत दिलं  स्वतःला सोडून. खाली. (हे करताना जपून व नियंत्रणात केलं. धोक्याच्या ठिकाणी काळजी आवश्यक). घळीतून खालचं कोंकण पाहिलं कि हा त्रास नाहीसा होत होता. बाजूला अहुप्याचा अजस्त्र कोंकणकडा साथीला होताच. वाटेत पाणी पाहून शिदोरी सोडली. पोटपूजा होताच थोडं तरतरीत होत पुढच्या टप्प्यावर निघालो. आता उतार व घसरड दोन्ही कमी झाली होती. मामाना निरोप द्यायची वेळ झाली. गावात कार्यक्रम असताना आमच्यासाठी वेळ देणाऱ्या मामाना धन्यवाद दिले व शिदोबा दारा साठी लवकरच भेटू असं आश्वासन देत निरोप दिला. नाळ उतरून आलेल्या शरीरासाठी थोडी विश्रांती हवी होती. आणि गाव तस फारस दूर नव्हतं. 
मामा व शिल्पा 


काही क्षणांची विश्रांती 

उन्ह कलू लागली. मागे अक्राळविक्राळ दिसणाऱ्या नाळेकडे नजर फेकली व उजव्या बाजूच्या पदरात शिरलो. खाली गावाच्या दिशेत उतरत होतो. पठारावर पोचताच गोरख मच्छिन्द्र या जोडीनं मनोहारी दर्शन दिल. पुढे घसरडीने काही पाठ सोडली नाही. बऱ्यापैकी मोठा घसरडीचा टप्पा पार करत थेट खाली पोहोचलो. मागे वळून पाहतो तर एक मनोहारी दृश्य. भैरोबा दाराचा दिलखेचक असा पॅनोरमा. पलीकडे शिदोबा दार दिसतंय. हे सार पापण्यात साठवत रिकामी शेतं  तुडवत  खोपिवलीत पोहोचलो. तिथून पुढे परतीचा प्रवास मध्ये मात्र म्हश्यात मिसळ पाववर आडवा हात मारण्यास विसरलो नाही. 


गोरख-मच्छिन्द्र 





काही नोंदी:

 अहुपे  घाट  व भैरोबा दार :

पायथ्याचं गाव : खोपिवली (ठाणे जिल्हा)
घाटमाथ्यावरच गाव :अहुपे (पुणे  जिल्हा )

१) भैरोबा दारात प्रचंड घसारा व झाडोरा. घसाऱ्याचा अनुभव असल्याखेरीज जाऊ नये. 
२)पाण्याचा साठा सोबत ठेवावा. 
३)मानसिक व शारीरिक दृष्ट्या तयारी आवश्यक.  
४)सुराक्षसाधन सोबत ठेवावीत