Saturday, January 18, 2020

वाटा माथेरानच्या (हाशाची पट्टी )

सुरुवात करण्यापूर्वी :

जानेवारी २०२० आम्हा भटक्यांसाठी धक्का देणारा ठरला. जेष्ठ गिर्यारोहक ज्यांनी अवघं आयुष्य सह्याद्रीसाठी वेचलं ,अनेक गिर्यारोहक घडवले असे गुरुवर्य  अरुण सावंत सर यांचा कोकणकड्यावरून अपघात व हरहुन्नरी खेळकर स्वभाव असलेला ट्रेकर मित्र कृष्णा पार्टे किल्ले अनघाई चढताना अनपेक्षित रित्या गमावला. दोन्ही गोष्टी अनाकलनीय. माझं भ्रमण तर्फे दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. सह्याद्रीत भटकताना यांचं स्मरण सदैव राहील. 

वाटा माथेरानच्या (५ जानेवारी २०२०):

माथेरान म्हटलं की समोर येतं ते थंड हवेचं ठिकाण, पर्यटन स्थळ. सगळ्या ऋतूत असणारी गर्दी. पण हेच ठिकाण ,याच्या गर्द झाडीतल्या लाल वाटा ट्रेकर्स ना नेहमीच मोहात पाडतात. आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर. कमी पैशात आणि कमी वेळेत होणारा ट्रेक. त्याच असं झालं २०२० चा पहिला शनिवार घाटघर जवळच्या घाटवाटा करण्याचं ठरलं होतं. पण ऐन वेळी तीन जण अपरिहार्य कारणामुळे रद्द. शिल्पाचा फोन झाला . माथेरान जायचं का? थोडावेळ विचार केला म्हटलं रद्द करू प्लॅन... पुढच्या क्षणी माथेरान साठी जाऊ म्हणत हिरवा सिग्नल दिला. नेरळ पोहोचेपर्यंत रात्रीचा एक वाजला. माथेरान ला सोडणारी टॅक्सी मिळणे मुश्कील होतं. आणि वर जाणारे पर्यटक एवढ्या रात्री कुठून येणारं? तोच एक टॅक्सी समोर आली. ड्रायव्हर शेजारी एक व्यक्ती बसली होती. इन्स्पेक्टर आहोत असं सांगत होती. थोडं हायसं वाटलं. त्यांना जवळच जायचं होत. गाडी सुरू झाली. साहेब त्यांचं घर येताच उतरले. त्यांनी ड्रायव्हरला बजावून सांगितलं की सावकाश जा. आम्ही दस्तूरी नाका आधी गारबेट पठारावर जी वाट जाते तिथे उतरलो. आणि जंगलाची वाट तुडवू लागलो. अर्ध्या पाऊण तासात गारबेटच्या पठारावर. असीम शांतता ,दूरवर खाली गावातील लुकलुकणारे दिवे. भर्राट वारं सुटलं होतं. त्यामुळें थंडीचा जोर होताच. पथारी पसरत स्लीपिंग बॅग मध्ये गुंडाळून घेतलं. भव्य आकाशातील चमचमणारे तारे न्याहाळत होतो. लुकलुकणारे असंख्य तारे आणि भवताली डोंगर रांगा यांच्या सानिध्यात झोपी गेलो. सकाळीच गजरा शिवाय जाग आली . छान झोप झाली होती. गारबेटच भलमोठं पठार. दूरवर माथेरान चा माधवजी पॉइंट व वर चढणारी वाट खुणावत होती. मोरबे जलाशाया मागे नारायणराव उगवण्याच्या तयारीत. माथेरानच्या पोटातील गाव/ वाड्या ना जाग येत होती. सकाळची कामं उरकत गारबेट पॉइंट ची खडी चढण चढण्यास सुरुवात केली. गारबेट वाडी तील कौलारू घरं निरखत बाजाराच्या  दिशेत आगेकूच.
गारबेट पठार 
वर माथेरान  खाली गारबेट वाडी 


 तिथे पुढच्या प्रवासात कोयल आमच्यात सामील होणार होती. गर्द झाडांनी शाकारलेल्या लाल वाटा नेहमीच मोहात पाडतात. वाटेत खालच्या गावातून येणारे हात रिक्षा चालवणारे गावकरी भेटले. त्यांच्या सोबत माथेरानच्या  वाटा विषयी गप्पा मारत पुढे निघालो. पुढच्या वेळी एखादी नवी वाट करण्याचे विचार मनात घोळू लागले. रविवार असल्याने सकाळीच घोडेवाले, दुकानदार , फेरीवाले यांची लगबग सुरू होती.
माथेरान च्या लाल वाटा 

उदर भरण करत मलंग पॉइंट ची वाट विचारत  आम्ही तिघ निघालो.  सरळ चालत मलंग पॉइंट गाठला. समोरच प्रबळ गडाचं भलं मोठ्ठं धुड. बाजूला कलावंतीण. डाव्या बाजूला दूरवर दिमाखात ईर्शाळगड. प्रबळ कलावंतीण मधली खिंड स्पष्ट दिसत होती. उजवीकडे खाली हाश्या ची पट्टी तली घरं खुणावू लागली. मलंग पॉइंट वरून मुख्य रस्त्याला खाली येत सनसेट पॉईंट कडे निघालो. थोड चालल्यावर लगेचच उतरण्यास पायऱ्या दिसतात. हीच ती हाशा च्या पट्टीत उतरणारी वाट. सह्याद्रीच्या आडवाटांवर फिरणाऱ्या शिल्पाच्या डोक्यातील वाट. 
डावीकडे प्रशस्त  प्रबळगड व कलावंतीण 

हाशा च्या पट्टीत उतरणारी वाट 


हाशाची पट्टी प्राथमिक शाळा 
बच्चे कंपनी 



 उतरण्यास सुरुवात केली. पूर्ण बांधीव वळणाची वाट. उतरताना म्हैसमाळ ,चंदेरी यांनी सुरेख दर्शन दिलं. उजव्या बाजूस पेब डोकं वर काढत होता. पोहोचताच मारुती च मंदिर व स्वच्छ पटांगण असलेली प्राथमिक शाळा. तिथे खेळणारी मुलं चिक्की दिल्यावर फार खुश झाली. खाली एका घरी विसाव्यासाठी थांबलो. चहापाणी व हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मावशींनी दाखवलेल्या वाटेने खाली उतरू लागलो. 




एका सोंडेवर चालू लागलो. सरळ जाणारी वाट न घेता उजव्या बाजूची खाली उतरणारी वाट घेतली(बाकाच्या बाजूची).  चिंचवाडीत जाणारी. खडकात पायऱ्या खोदलेली थोडी उताराची वाट. काही ठिकाणी जास्तच तीव्र आहे पण धोका नाही. थोड्याच वेळात डाव्या बाजूस झाडोऱ्यात घुसलो. दगडातून वाट काढत ओढ्याच्या पात्रात पोहोचलो. मागून एक ताई जेवण घेवून चालल्या होत्या. त्यांच्या सोबत पलीकडील पाऊल वाट पकडली. पुढे गावकरी रस्त्याच्या कामासाठी श्रमदान करत होते. गावातील लोकांना वाहनं जाण्यास रस्ता नाही. जो काही प्रवास तो पायी पायी. अडचणीच्या वेळ खूप हाल होत. काम करताना आता यापुढे गावात गाडी येईल व हाल दूर होतील याच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. मुख्य म्हणजे ते सांगत होते. जंगलातील मोठी झाडं गरज वाटली तरच तोडणार नाही तर हात देखील लावणार नाही. ऐकून बरं वाटलं. निरोप घेत निघालो. चिंचवाडीत पोहोचलो.  चंदेरी म्हैसमाळ गाढेश्वर  तलाव स्पष्ट नजरेच्या टप्प्यात होतें. दिड ची एस टी मिळायची आशा संपली होती. मुख्य रस्त्याला आलो तोच एक क्रिकेट टीम घेऊन जाणारा टेम्पो मिळाला. थांबवत पटापट चढलो. त्याने दुधाणी बसस्टॉप वर सोडलं. तिथून पुढं पनवेल. आणि साडे तीन चार पर्यंत मुंबईत. सुंदर असा रमत गमत केलेला छोटेखानी ट्रेक भटकंतीच्या गाठोड्यात जमा. 
म्हैसमाळ, चंदेरी ,गाढेश्वर तलाव