Monday, February 25, 2019

मुशाफिरी MP ची : भाग १(इंदोर, धार)

कुठेतरी बाहेर मस्त भटकून यायचं असा विचार मनात आला आणि इंदोर ,मांडू च नाव पुढे आलं. बरेच दिवस मांडू मनात घोळत होतचं. भटक्या मित्र स्वप्निल नुकताच मध्य भारत धुंडाळून आला होता. माहितीसाठी फोन केला. त्याच्याकडून कळलं धार सुद्धा अफलातून आहे. नवीन एका स्थळाची भर पडली. मित्रमंडळींसोबत फिरण्याचा आनंद असतोच पण कधीतरी एकट्याने लांबच्या अपरिचित प्रवासाला निघणं आणि अनोळखी माणसं जोडणं यात वेगळा आनंद असतो.  सारं काही एकला चलो असल्यामुळे सारी तयारी व्यवस्थित करावी लागली. प्रस्थानाचा  दिवस उजाडला. इंदोर कडे कूच केलं . गाढ झोपेत इंदोर मध्ये प्रवेश  कधी केला कळलं देखील नाही. खिडकीतून इंदोर ची झलक पाहता पाहता गंतव्य स्थानी उतरलो. थंडीने शरीर कुडकुडत होत. पुढील पंधरा मिनटात हॉस्टेल (वैकुंठ होम स्टे) वर पोहोचलो. तिथे पाहतो तर त्याचे मालक श्री. वैशंपायन मूळचे रत्नागिरीचे तब्बल शंभर वर्षांपूर्वी इथे स्थलांतरित झालेले. गेल्यागेल्या इंदोरच मराठीपण जाणवायला सुरुवात झाली.  थोडावेळ आराम करत बाहेर पडलो थेट खर्जाना गणेशाच्या दर्शनासाठी. आय आय टी  आणि आय आय एम या दोन्ही विख्यात शिक्षण संस्था असलेले हे एकमेव शहर. इंदोरचे रस्ते मात्र एकदम चकाचक कुठेही घाण नाही. सगळीकडे कचरा कुंड्या लावलेल्या आणि मुख्य म्हणजे नागरिक कचराकुंडीतच कचरा टाकतात. सकाळीच नगर परिषदेच्या गाड्या कचरा जमा करण्याचं काम अत्यंत शिस्तबद्ध करत होत्या. उगाच नाही इंदोर भारतातलं स्वच्छतेत प्रथम क्रमांकाचं शहर आहे. आणि आपली मुंबईतील उपनगरं. शेवटी सरकार सोबत नागरिकांची मानसिकता महत्त्वाची ठरते. असो .
चकाचक इंदोर 





खजराना गणेश 



पेशवेकालीन खजराना गणेशाच्या दर्शनाने इंदोर दर्शनाचा श्रीगणेशा केला. येथे अनेक प्राचीन मंदिरांचा समूह आहे, आता भूक लागली होती. छपन्न दुकानाकडे मोर्चा वळवला . एकटा असल्यामुळे सिटी बसचा  आधार घेतला . छप्पन दुकान . इथे सारीच उदरभरणाची दुकानं . वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तेही खिशाला परवडणारे .  गरमागरम इंदुरी पोहे व जिलेबी. खरंतर जिलेबी हा प्रकार पर्शियन आणि पोहे महाराष्ट्रातले. पण दोन्ही एकत्र चाखायला मजा येते. शेव आणि कांदा पेरलेले वेगळ्या चवीचे पोहे आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी जिलेबी. इंदोरी पोहे व जिलेबी पोटात ढकलत पोटपूजा केली. मजा आ गया .

उदरभ`रण 


राजवाड्याकडे निघालो. राजवाड्यानजीकच असणाऱ्या छत्र्यांकडे लक्ष वेधलं गेलं. कृष्णपुरा छत्र्या. होळकरांची ही शाही स्मारकं . याचा आकार छत्रीसारखा आहे. या ठिकाणी तीन छत्र्या आहेत. महाराणी कृष्णाबाई, महाराज तुकोजीराव होळकर दुसरे आणि त्यांचा पुत्र शिवाजीराव होळकर. या छत्र्यांवर मराठा वास्तुकलेची छाप दिसून येते. यातील खांबावरील कोरीव काम, नक्षीदार जाळ्या ,विविध देव देवतांची कोरलेली शिल्प सारंच डोळ्यात भरण्यासारखं आहे. होळकर शूर होतेच पण वास्तुकलेतही तेवढेच पारंगत होते हे जाणवतं. या छत्र्या नुसत्याच मराठा साम्राज्याच्या आठवणी नाहीत तर अजोड वास्तुकलेचा नमुनादेखील आहेत. 











इंदोरची शान असलेला होळकरांचा राजवाडा दुरुस्ती कारणामुळे बंद असल्यामुळे बाहेरूनच पहावा लागला. त्याची उणीव मात्र बाजूला असलेल्या वस्तू संग्रहालयाने  भरून काढली. येथे होळकरांच्या बऱ्याच आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. मल्हार राव होळकर आणि अहिल्याबाईंचा इतिहास जिवंत होऊन डोळ्यासमोर उभा राहतो. अत्यंत साधे पण दूरदृष्टी असलेले शूरवीर मल्हार राव. अशा शूर मल्हार रावांविषयी राजस्थानी कवी म्हणतो
"अइयो बखत मल्हार का ,अइयो बखत अबीह ! गरजण लागा गडरी ,दर्पण लागा सीहं !!
सिंहा  सिर  नीचा किया गाडर करै गलार ! अधपतियाँ सिर ओधीणी ,तो सिरपर पाघ मल्हार!!
त्यानी अहिल्याबाईना सून करून घेतली. शंकराची निस्सीम भक्त असलेल्या या देवीने मध्ययुगातील रूढी झुगारत सासऱ्यांकडून राज्यकारभाराचे व युद्धाचं शिक्षण घेतलं. माळव्याच्या गादीवर बसली. सत्ता उपभोगायची म्हणून नव्हे तर सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी. त्यांच्या न्यायासाठी झटली . लोकोपयोगी कार्यासाठी त्यांनी अफाट मदत केली. त्यांच्या कार्याला सलाम करत बाहेर पडलो.


हातमाग (अहिल्यादेवींनी महेश्वरी साड्या विशेष प्रोत्साहन )








 बाहेर एक  रिक्षा वाले काका भेटले.  पाहताक्षणीच माझ्या कपाळावरचा टिळा पाहत "खजराना गणेश जाके आये क्या?"   विचारलं . मी हो म्हटलं. बोलता बोलता कळलं ते मुंबईहून बऱ्याच वर्षांपूर्वी इंदोर ला स्थायिक झाले. आता मराठीतून बोलण्यास सुरुवात झाली. काका म्हणाले ,"बेटा मी तुला इंदोर फिरवतो." त्यांच्या बोलण्यात आणि डोळ्यात आपुलकी दिसली. लगेच हो म्हटलं इंदोरही फिरता येईल आणि गप्पाही होतील . लाल बाग महालात प्रवेश केला. येथे डोळे दिपून गेले. अत्यंत भव्य असा महाल. ऐषोआराम असलेला हा पॅलेस . मोठी डायनिंग टेबल्स . संगमरवराचे सुशोभित कलाकुसरीचे खांब. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा इथे बऱ्यापैकी दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी फ्रेंच शैलीची कलाकुसर. मोठे डान्सिंग हॉल्स. साराच श्रीमंती थाट. थोड्या वेळापूर्वी पाहिलेला मल्हार रावांचा अत्यंत साधा राजवाडा आणि या पॅलेस मधील ऐय्याशी. फरक नक्कीच जाणवतो. मल्हार रावांच्या वाड्याचं शौर्याचं वलय इथे नाही. यापुढचं ठिकाण अन्नपूर्णा मंदिर प्रवेशद्वार चार हत्तींच्या प्रतिकृतीवर तोललेलं. आत निराळं असं वेद मंदिर आहे.  अथर्व , साम ,यजुर्वेद,ऋग्वेद. पुढे काका बडा गणपती मंदिरात घेऊन गेले. येथे गणेशाची भव्य अशी मूर्ती आहे. हे मंदिर पर्यटकांच आकर्षण आहे. आणखी एक आकर्षण  म्हणजे शीश महल ( काच मंदिर). हे जैन मंदिर पूर्ण काचांनी मढवलेलं . भिंती, खांब, जमीन, आरसे सगळीकडे काचाच काचा. सजावटीसाठी सिरॅमिक टाईल्स बसवल्यात. काचेच्या मण्यांची महावीरांची मूर्ती  आकर्षक वाटते.  अनेक रंगी काचांनी  मढवलेला हा महाल तोंडात बोटं घालायला लावतो. पुढे राजवाड्याच्या दिशेत टाउन हॉल आताचा महात्मा गांधी हॉल. इंडो गॉथिक शैलीत बांधलेला . सध्या कला,पुस्तक प्रदर्शनासाठी वापरला जातो. हे सार पाहता पाहता दुपारचे ३ वाजून गेले . काकांशी मनमोकळ्या गप्पाही सुरु होत्याच. मूळचे विदर्भातील असलेले काका मुंबईमार्गे इंदोर मध्ये आले त्याची कहाणी सांगितली. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते.

लाल बाग पॅलेस 



अन्नपूर्णा मंदिर 
शीश महल(google image ) 


सेंट्रल म्युझिअम कडे पोहोचलो . काकांचा निरोप घेतला. धन्यवाद देत पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं. धावत आत प्रवेश केला. गेल्यावर कळलं वेळ फार थोडा आहे. अत्यंत भव्य अस हे संग्रहालय खूप काही पाहण्यासारखं आहे. पण  फारच थोडा वेळ  हातात होता.  आणि बरीच दालनं . पहिल्याच दालनात अशमयुगीन काळातील हत्यारं ,मोहंजोदाडो उत्खननात मिळालेले अवशेष तसेच ताम्र निधी कायथा संस्कृती ,ताम्रयुगीन पात्रवशेष पाहायला मिळतात. अश्मयुगीन काळात आदिमानव दगडी हत्यारांवर विशेष अवलंबून होता. त्याने लाकूड व प्राण्यांची हाडं याचाही वापर केला. हि उपकरण आदिमानवाच्या बौद्धिक विकासाचा परिचय करून देतात. तसेच आर्थिक व सांस्कृतिक जीवनावर प्रकाशझोत टाकतात. काळाच्या किंवा विकासाच्या  ओघात हे सगळं नष्ट होत गेलं. मध्य प्रदेशात  नद्यांच्या खोऱ्यात तसेच पर्वत रांगात मिळालेल्या या अवशेषांचं जतन केलं गेलंय. पुढील दालनात ऐतिहासिक शस्त्रास्त्र तलवारी, तोफा,बंदुका आदींचं दर्शन घडत. पुढच्या दालनात आपल्या भेटीस तऱ्हेतऱ्हेची  नाणी येतात. यात उज्जयिनी मुद्रा, हिंदू - युनानी नाणी ,वल्लभी नाणी ,होळकरांच्या काळात पाडली गेलेली नाणी,तसेच मुसलमान राजांच्या काळातली नाणी पाहायला मिळतात. यात त्याकाळी इंदोर व भोपाळ राज्यसत्तेत सैनिकांना दिली जाणारी सन्मान पदक याचाही समावेश आहे.  सारं गडबडीत पाहत शेवटच्या दालनात प्रवेश केला. नाना प्रकारच्या मूर्त्यांनी सजलेलं हे दालन. विशेष वेळ काढून पाहावं असं. येथे शिव, विष्णू,पार्वती, सरस्वती विविध रूपात पहायला मिळतात. लग्ना आधीची गौरी ,लग्नानंतरची पार्वती, आणि मुलं झाल्यावर उमा अशी रूपं . विष्णूचे दहा अवतार, परमार मूर्त्या याविषयी निश्चितच माहिती मिळते.  हिंदू व जैन देवता पाहायला मिळतात. साधारण १२ व्या १३ व्या शतकातील हे अवशेष कलाकुसरीने थक्क करून टाकतात.  तिथल्या मणी साहेबानी वेळ संपत आली  होती तरी प्रत्येक मूर्तीच विश्लेषण केलं. यक्ष वराह वर कोरलेले ३३ कोटी देव, त्यातील समुद्र मंथन , वामनावतार असे बरेच प्रसंग सारं काही अदभूत . हे संग्रहालय इंदोर चा वैभवशाली  इतिहास निश्चितच अधोरेखित करतं . पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावं असं .











दिवस संपत आला. पावलं निघाली छप्पन दुकानाकडे  खादाडीसाठी . येथील आंबट गोड चटण्यांनी भरलेली कचोरी , बटला पॅटिस (भरलेले मटार) आणि वेडावणारे खोबऱ्याचे खास खोपरा पॅटीस .  आता हे सगळं पोटात गेल्यावर गुलाबी थंडीत चहाची तल्लफ आलीच. चाय सुट्टा बार हे चहा प्रेमींच्या तल्लफीसाठी अगदी योग्य अस ठिकाण. वेगवेगळ्या स्वादात चहा. आलं, वेलची मसाला ते अगदी चॉकलेट, पान चहा सुद्धा तेही कुल्लड मधून. 



खोपरा पॅटीस ,बटला पॅटिस , कचोरी 

रात्री पावलं सराफाकडे वळतात. सराफा बाजार हा वेगळाच प्रकार दिवसा सोनारांची दुकानं आणि रात्री  खाण्याचे ठेले. जसजशी रात्र चढते तसा या सराफा बाजाराचा रंग आणि नूर बदलत जातो. खाद्यमय  माहोल अगदी. जिलेबी, रबडी, गुलाब जामुन, दही वडे, गराडू अस बरच. काय खाऊ आणि काय नको अस होतं. येथे नियोजन कराव लागत नाहीतर पोट लगेच भरण्याची भीती. मी दही वडा सहसा खात नाही पण जोशींचा दही बडा अफलातून. गोड दह्यात बुडालेला वडा खाताना रसना तृप्त होऊन जाते. बुट्टे का किस मक्या चा आगळावेगळा पदार्थ. पाणीपुरी आता पाणीपुरीत वेगळ काय? तर इथे एक नाही तब्बल दहा स्वादाची पाणीपुरी मिळते. लसूण, पुदिना ,लिंबू वगैरे वगैरे. आणि समोर कितीही माणसं उभी असली तरीही पाणीपुरी वाला राऊंड मात्र चुकवत नाही. फारच गम्मत. अस सगळ खात पोटात थोडी फार जागा शिल्लक होती म्हणजे केली गेली. गोड शेवट शिकंजी नावाच्या पेयाने. श्रीखंड काजू, बदाम पिस्ता घालून केलेल . आता  कुठे पोट भरल्यासारखं वाटलं.  दोन्ही म्हणजेच छप्पन आणि सराफा येथे  खिलवतात अदबीनं. आणि स्वच्छतेला महत्त्व दिल जात. खालेल्या पदार्थांची चव जिभेवर तशीच ठेवत सराफा चा निरोप घेतला. उदरभरण झाल्याने इंदोर भेट सार्थकी लागली. खादाडी साठी इंदूरला भेट द्यावीच एकदा तरी. 
सराफा बाजार 

शिकंजी 

सकाळी धार  गाठायचं होतं . मध्य प्रदेश मधील सार्वजनिक वाहतुकीची पूर्वकल्पना असल्याने सकाळीच धार साठी गंगावल बस स्टॅन्ड गाठलं. धार साठी बस उभी होतीच. तीन चार वर्षांपूर्वीच्या रस्त्यात आणि आता बरीच सुधारणा वाटली. साधारण दोन तासात धार गाठलं. नाश्ता करत किल्ल्याकडे कूच केलं. धार बस स्टॅन्ड हुन पंधरा ते वीस मिनिटांचा पायी रस्ता. दुरूनच बलाढ्य असा धारचा किल्ला लक्ष वेधून घेत होता. जवळ येताच नजरबंदी करणारे भक्कम बुरुज . कमनीतून आत प्रवेश करत तटबंदीवरून निघालो. किल्ला निरखण्यास सुरुवात केली. खरबूजा महाल हि येथील वैशिष्ट पूर्ण ऐतिहासिक वास्तू . दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्म याच महालातील. आणखी एका वास्तूतील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. किल्ल्यात भोजकुवा हि भलीमोठी विहीर आहे. खाली उतरत पाहण्यास सुरुवात केली. आजूबाजूला झाडी वाढली आहे. धारच्या किल्ल्यातही पुरातत्व खात्याचं संग्रहालय आहे. उत्खननात मिळालेल्या १२ व्या १३ व्या शतकातील मूर्तीचं खूप मोठं दालन आहे. जैन गॅलरी वैष्णव गॅलरी अस वर्गीकरण. विष्णू,दिक्पाल  देवी प्रतिमा,अर्धनारीश्वर ,ब्रम्हा ,पार्वती ,अंबिका नर्मदा, गणेश ,कुबेर,तीर्थंकर अशा सुरेख कलाकुसर असलेल्या दगडात कोरलेल्या मूर्त्या पाहताना डोळे विस्फारतात. बूढी मांडव ,बदनावर अशा ठिकाणी सापडलेल्या या मूर्त्या . येथे गद्धेगाळ पहायला मिळते. किल्ला पाहताना तीन तास कधीच गेले. 
धार किल्ला 

Add caption


खरबुजा महाल 




पवार छत्र्यांकडे चालत निघालो. या छत्र्यांचा उल्लेख फारसा नाही. गुगल च्या नकाशावर सुद्धा नाही. विचारत विचारत शोधल्या. या पवार घराण्याच्या छत्र्या म्हणजे वास्तू कलेचा सुंदर असा नमुना. धार मध्ये पवार घराण्याची सत्ता होती. चार पाच छत्र्यांचा समूह हा सुखद धक्का होता. प्रत्येक छत्रीतील बारीक जाळीदार कलाकुसर केवळ पाहत राहण्यासारखी. याच डागडुजीच काम पाहून बरं वाटलं. अशा ऐतिहासिक वारश्याचं संवर्धन झालंच पाहिजे. 
पवार छत्री 








भोजशाळा मंदिर पाहण्यासाठी अकरा नंबरची पायगाडी सुरु केली. भोजशाळा हे भोज राजाने बांधलेलं सरस्वतीचं मंदिर. एक अप्रतिम विशाल अस वास्तुशिल्प . नक्षीदार खांबांवर तोललेलं सुरेख  शिल्प. 
भोजशाळा मंदिर 




आणखी  एक स्थळ खुणावत होत फडके म्युझिअम . गुगल मॅप ने गल्लीगल्लीतुन फिरवत बरोब्बर सोडलं. दुपार झाली होती. स्टुडिओ बंद होता. थोडा निराश झालो. एका भल्या माणसाने देव साहेबांचा फोन नंबर दिला. लगेच फोन केला त्यांच्याकडून कळलं कि स्टुडिओ जेवणाच्या सुट्टीसाठी बंद आहे. मुंबई हुन आलो सांगितल्यावर थांबा दहा मिनटात येतो असं सांगितलं. आणि संपूर्ण स्टुडिओ व्यवस्थित दाखवला. आणि फडके साहेबांचा जीवनपट उलगडला आणि कलाकृतींची माहितीही दिली. मूळचे वसई चे फडके साहेब त्यांच्या एक से बढकर एक कलाकृती पहाताना मन थक्क होतं. समाधानाने त्या महान कलाकाराला कुर्निसात करत स्टुडिओ बाहेर पडलो. देव साहेबांसोबत  धार स्टॅन्ड वर आलो.  धार ने खरंच  मन जिंकलं होतं.  खूप काही गवसलं होतं . आता मांडू नगरी साद घालत होती.