Wednesday, October 12, 2016

सह्याद्रीतलं अमूल्य रत्न :रतनगड


झिम्माड पावसात पोट भरून भटकंती केल्यावर सरत्या पावसातली भटकंती करायची फार इच्छा होती.(सह्याद्रीत कितीही भटकंती केली तरी पोट काही भरत नाही. सह्यभ्रमणाची भूक काही भागत नाही.) बरेच दिवस सह्याद्रीची भेट झाली नव्हती. या भटकंतीसाठी रतनगड खुणावत होता. सह्याद्रीत अनेक दुर्गरत्न आहेत त्यातलचं एक रतनगड .सह्याद्रीच्या अनेक रंगांनी सजलेल्या माळरानांवरचं पुष्प वैभवही अनुभवता येईल आणि अमृतेश्वराचं दर्शन होईल म्हणून रतन गड पक्का केला. Travel त्रिकोण सोबत रतनवाडीस जाण्यास निघालो. बस वेगाने मार्गक्रमण करत होती. बस घोटीच्या आसपास अचानक धीमी झाली. पहातो तर गाड्यांची रांगच रांग लागली होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्यामुळे गाड्यांची वाहतूक रोखण्यात आली होती. मन बेचैन झालं होतं. रतनगड होतोय की नाही धाकधूक होती. पण नशिब दांडग बस त्यातून बाहेर पडली. भंडारदऱ्याच्या जवळ गार वारा सुटला होता. साम्रद,उडदवणे अशी गावं मागे टाकत बस मार्गस्थ होत होती.शेवटी पहाटे साडेपाच च्या सुमारास रतनवाडीत पाऊल टाकलं. प्रातःविधी उरकेपर्यंत तांबडं फुटायला लागलं होतं. रतनवाडीचं ते रूपडं न्यारं दिसत होतं. अमृतेश्वराचं  मंदिर, धरणाचं पाणी,चहूबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा. खरंच अकोले तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलीय याची प्रचिती येते.