Saturday, December 31, 2016

दाऱ्यातून उतरताना

खूप दिवसांपासून सह्याद्रीस बिलगलो नव्हतो. एखाद्या दमदार,तगड्या ट्रेकची प्रतिक्षा होती. महादेवने टाकलेला दाऱ्या  घाट वाचला आणि प्रतिक्षा संपली. तसाही दाऱ्या घाट मनात खूप दिवस घोळत होता. त्रिगुणधारेतून वर चढायचं. दुर्ग,धाकोबा व दाऱ्या तून खाली. एकदम तगडा ट्रेक. शुक्रवारी रात्री कल्याण बस स्थानकात हजर झालो. महादेवशी गप्पा मारत असताना एक समोर बसलेला कलाकार आमच्या जवळ आला. त्याच्या बोलण्यावरून तो नुकताच तीर्थप्राशन करून आल्याचं आम्ही ताडलं. त्याचं काय झालं की महादेवने बाकावर ठेवलेली भलीमोठी  बँग मढ्यासारखी वाटली म्हणून तो विचारपूस करण्यास आला.  गमतीचा भाग. तात्पर्य सतर्कता महत्त्वाची. आम्ही अवघे सात जण होतो. मुरबाडला जाणारी यष्टी पकडली. जवळपास बाराच्या सुमारास पोहोचलो. स्थानकात चार पाच पाशिंजराखेरीज कोणी नव्हतं. आम्ही आलो आणि गडबड सुरू झाली. डेहरीची  बस १२:३०ची होती. ट्रेक्स , अवघड ट्रॅव्हर्स च्या गप्पांमधें गुंतून गेलो. बसमध्ये चढलो. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास सुरू होता. ड्रायवर महाशय पार रंगात आले होते. यष्टी उड्डाणं अशी काय घेत होती की हाडं खिळखिळी होतात कि क़ाय असं वाटू लागलं. शेवटी डेहरी गावात पोहोचलो. एका घरात पथारी पसरली. सकाळी लवकर उठलो. सर्व विधी आटपून नाश्ता करून बाहेर पडलो. डेहरी  हे गोरखगडाच्या पायथ्याचं गाव. गोरखगडाचं दूरूनचं दर्शन घेतलं. पुढचा प्रवास जीपचा होता. वाघाच्या वाडीत पोहोचलो. सह्यरांगांनी वेढलेलं हे गाव. खालून खुटे दाराची कठीण वाट व त्रिगुणधारा घाट दिसत होता. एका दादांना विचारलं किती वेळात चढता त्रिगुणधारा उत्तर एक तास. मला या एक तासाचं गणित घाट उतरल्यावरही कळलं नाही. असो.

Saturday, December 3, 2016

हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने: भटक्यांचे नंदनवन !

हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने : भटक्यांचे नंदनवन ! खूप दिवस कामाच्या ओझ्याखाली दबून गेलो होतो. शहरात अक्षरशः जीव घुसमटला होता काहीतरी वेगळ कराव असं वाटत होतं. मग काय ठेवली कामं बाजूला आणि हरिश्चंद्र गडाकडे प्रयाण करण्यास पुण्याच्या WTA सोबत निघालो. सह्याद्रीत असलेल्या या बेलाग गडावर आपली पावले उमटणार तेही नळीच्या वाटेने या विचाराने मन उल्हासित झालं होतं. सव्वा अकराच्या दरम्याने आम्ही ठाणे जिल्ह्यातील बेलपाडा या आदिवासी गावात पोहोचलो. थोडं थांबून साडेअकराच्या सुमारास चढाईस प्रारंभ केला. नारायणराव आग ओकत होते. वर पाहिले तर स्थितप्रज्ञ,अजस्त्र ,बलदंड असा कोकणकड़ा खुणावत होता घामाच्या धारा वाहत होत्या. वाट बिकट होती. मोठ मोठ्या दगडांशी दोन हात करत चढाईला सुरुवात केली.