 |
सह्याद्रीचे रांगडे गडी |
पहाटे पाच ला गजर वाजला. गारठ्यामुळे स्लिपिंग बँगच्या बाहेर पडावस वाटत नव्हत. बाहेर आलो. सुटलेला गार वारा बोचकारत होता. कुडकुडत सगळी कामं आटपत घाटघर छावणीचा निरोप घेत कुलंगकडे प्रस्थान केलं. बऱ्यापैकी फटफटल होतं. पूर्वेस नारायणरावांची वर येण्याची घाई. विहीरीवर बायांची लगबग.
 |
पाणी भरण्याची लगबग |
 |
रतनगड खुट्टा |
 |
कुलंगकडे प्रस्थान |
 |
तेजोमय सकाळ |
समोर दिसणाऱ्या AMK कडे नजर ठेवत चालू लागलो. दूरवर रतनचा खुट्टा अस्तित्व दाखवत होता. तासभर सपाटीवर चालल्यावर आता मात्र चढण दमवणारी कानात सू सू करणारा सुसाट वारा थोडफार कठिण करत होता. बॅग सांभाळत नेटानं वर गेलो. खाली घाटघर जलाशयाचं पाणी चमचमत होतं. एक पठार बघून थोडी विश्रांती झाली. येथून अलंग मदनची खिंड अधिकच स्पष्ट दिसू लागली. जणू काही लवकर येण्याचं निमंत्रण देत होती. आम्हाला खिंड गाठायची होती.
 |
गवताळ टप्प्याची भर्राट वाऱ्यासोबत चढाई | | | |
 |
चमकणारा घाटघर जलाशय |
 |
अबब केवढी बॅग.... सामंत काका
|
यू आकारात पसरलेला अलंग बलाढ्य भासत होता. बरीच मजल मारायची होती. जाता जाता उजव्या बाजूस अलंगच्या शिड्या दृष्टीस पडतात. या शिड्यांवरूनही अलंगला जाता येतं. भाऊंनी सांगितल १९९९ ला सह्यंकनचा मार्ग होता. पुढे पाण्याच्या ठिकाणी पाणी भरून घेतलं कारण वर पोहोचेपर्यंत मध्ये पाणी नाही. इथून एक वाट शिड्यांकडे घेऊन जाते. जंगलवाटेने पुढे जाताच कातळटप्पा लागला. त्यानंतर पुढे बऱ्यापैकी मोठा ट्रँव्हर्स. दगड धोंड्याच्या खड्या चढणीतून अलंग व मदनच्या खिंडीत पोहोचलो एकदाचे. अलंग व मदन मल्लांसारखे आव्हान देत उभे होते. अवाढव्य अलंग व मदनची सरळसोट काळी भिंत. कुलंग छावणीवरून सुर्या, सुदर्शन आणि सहकारी आवळा सरबत घेऊन प्रतिक्षेत होते. या खिंडीतून अलंग व मदन वर चढाई करता येते. पण आम्हाला गाठायचा होता कुलंग. भोपळ्याचे घारगे व आरोग्यदायी सरबत घेत मदनाला वळसा मारत निघालो. एका बाजूला मदनाची भिंत व दुसऱ्या बाजूला चक्रावून टाकणारी दरी. तोल सावरत बारीक दगड माती मिश्रित वाटेवरून पुढे सरकत होतो. हे कमी कि काय मदन च्या शेवटी ऐंशी अंशातला घसारा. हा टप्पा दोर लावून सुरक्षित केला होता.
 |
Add caption |
 |
घसाऱ्यावरची कसरत |
सावकाशपणे खाली मदन आणि कुलंगच्या खिंडीत उतरलो. आता कुलंग व्यवस्थित दिसत होता. अद्याप पायऱ्या दूरच होता. ट्ँव्हर्स काही पाठ सोडत नव्हता. काट्याकुट्यातून ,कधीतरी भितींचा आधार घेत बुटाने वाट जोखत पुढे जायचं. M1 M2 दिसत होते. कडे कडेने चालत एकदाचे कुलंग पायऱ्यांपाशी पोहोचलो. नजर भिरभिरली ती कुलंगच्या माथ्यावर. पूर्ण उभी चढाई होती.
 |
स्टॉक कांगरी सर केलेले उत्साही श्रीधर सर (अण्णा ) |
उत्साहाने पण थोडी काळजी घेत खोबण्यांचा आधार घेत वर सरकत रहाव. या पायऱ्या म्हणजे आविष्कारच आहे. विशेष म्हणजे इंग्रजांच्या तोफांच्या तडाख्यातून या वाचल्या. या पायऱ्या सोप्या जरी असल्या तरी संपता संपत नाहीत. पार दमछाक करतात. बाजूला कातळात कोरलेल्या गुहा दिसतात. विसाव्यासाठी बसाव थोडा वेळ पाणी प्याव व पुन्हा भिडावं पायऱ्यांना. थोड्याच वेळात प्रवेशद्वार दिसू लागतं. गडमाथा जवळ आला थोडं बरं वाटतं. कमान नसलेलं महाद्वार थोडं खिन्न करतं. पण त्याची ठेवण व बांधकाम पाहून मन अचंबित होतं. वर आल्यावर भलंमोठं कुलंगच पठार. स्वागतासाठी कुलंग छावणी टिम. भूक सपाटून लागली होती. फ्रेश होत गुहेत पानावर बसलो. पोट भरलं. थकलेली शरीरं गुहेच्या थंडाव्यात पहुडली. उन्ह कलताच चहा घेत आदित्यसोबत सारे गडफेरीसाठी बाहेर पडले. कुलंगच पठार भव्य आहे. पाण्याच्या टाक्यांच्या शृंखलाच आहेत. पूर्वेकडे आलो. आजोबा रतनगड कळसुबाई, समोरच मोठ्या पिंपासारखा मदनगड व यू आकारात पसरलेला अलंगचा विस्तार हा सगळा सह्यपट उलगडला होता. ह्या पटावरील अलंग व मदन या राजांना कुलंगच्या माथ्यावरून कुर्निसात केला.
 |
अलंग आणि मदनाचा भव्य नजारा |
 |
बंधारा |
थोडं खाली येत बंधाऱ्यापाशी आलो. पाण्याचं नियोजन करण्यासाठी केलेली रचना, गोमुख(आता फक्त अवशेष) पाहून निव्वळ थक्क व्हायला होतं. आखीव रेखीव असा हा बंधारा. पावलं वळली पश्चिमेकडे. मध्ये भग्न राजवाड्याचे अवशेष. या साठी वापरलेल्या विटा नीट निरखल्या. मावळतीकडे क्षितिजावर नजरा खिळल्या. बरेच विचार मनात सतावत होते. पडक्या वाड्याचे अवशेष गुढतेत रमायला भाग पाडतात. हे वाडे पाण्याच्या टाक्या पाहून बऱ्यापैकी राबता होता असेल त्या काळी. सुखाचे भरभराटीचे दिवस पाहिले असतील या गडाने. बराच काळ गेला. कालाय तस्मैः नमः आणि काय. उदया सर करायचा समोरचा छोटा कुलंग नीट पाहून घेतला. भाऊंनी सांगितल सूर्य मावळतीला जातोय उजव्या बाजूला कावनाई गड दिसेल. आणि खरचं वातावरणामुळे पुसट का होईना कावनाईनं दर्शन दिलं. भाऊंच्या अनुभवाला दाद द्यावी तेवढी कमीच. खाली भावली धरणाचं पाणी दिसत होतं. दिनकराने निरोप घेताच गुहेकडे निघालो. नुसताच भोज्जा न करता वेळ काढून पाहिल्यास कुलंग काय चीज आहे हे नक्किच कळत.
 |
राजवाडा अवशेष |
 |
निरोप |
 |
कुलंग छावणी |
अंधार पडू लागला. गडावर सरपटणारे प्राणी, विंचू असल्याने काळजी घ्यावी. कुलंगवरचा हा शेवटचा मुक्काम उद्या सह्यांकन संपणार. प्रशस्तिपत्रक व सह्यांकन अनुभव कथन झालं. चक्रमच्या शिरस्त्या प्रमाणे "बडा खाना" चं आयोजन होतं. छोले पुरी पुलाव सार ,गुलाब जामुन असा साग्रसंगीत बेत होता. विलास काका व बाकिचे आग्रहाने वाढत होते. पानावरून उठूच देत नव्हते. अनिकेत चे शब्द आठवले "बडा खाना" साठी तयार रहा. खरचं होतं ते. शेवटी तब्बल सात गुलाबजामुन खात पटकन उठलो नाहीतर दशकपूर्ती झाली असती. बडा खाना जरा जास्तच झालं. पाय मोकळे करण्यासाठी गुहेच्या वर आलो. रात्रीची निरव शांतता. नभांगणी चांदण्या. खालच्या गावातील लुकलुकते दिवे. शांत झोपलेलं गाव. रात्रीचा कुलंग वेगळाच भासत होता. तंबूत झोपी गेलो. पाचवा व निरोपाचा दिवस. कुलंग छावणीचा निरोप घेतला. रात्रीच्या बडा खाना अन्नदात्यांना सुखी भव म्हणत पायऱ्या उतरण्यास सुरूवात केली. सकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात अलंग मदन न्हाऊन निघाले होते. कळसुबाई शिखर उजळून निघालं होत.

पायऱ्या संपल्या. उजव्या हाताला पूर्वेला मदन कडे वाट जाते. समोरील वाट कुरंगवाडीत उतरते. आणि डाव्या बाजूची पश्चिमेकडची वाट छोट्या कुलंगकडे. आता मोर्चा वळवला तो छोटा कुलंगकडे. भल्यामोठ्या कुलंगला वळसा घालायचा होता. मध्येच अरूंद वाट. दगडधोंड्यानी भरलेली वाट,मुरमाड वाट काटेकुटे असं दिव्य पार करत कुलंग आणि छोटा कुलंगच्या बेचक्यात आलो. आता छोटा कुलंगची चढाई. वाट,पायऱ्या नव्हत्याच मुळी. सरळसोट चढाई. कातळारोहण करावे लागणार हे नक्की होतं. दोर बांधला होता. तीन ठिकाणी चक्रमच्या क्लायबिंग टिमने लाकडाच्या बेचक्याचा वापर करून अफलातून शिड्या केल्या होत्या.मात्र या पक्क्या केलेल्या नाहीत.

 |
छायाचित्र सौजन्य : ज्योतिबा कुऱ्हाडे |
 |
छोटा कुलंग थरारक चढाई |
थोडीफार चढाई सोपी झाली. सावधपणे वर चढत होतो. काही ठिकाणी दगड घसरत होते. छोटीशी चूक महागात पडणार होती. सोबत टिम होतीच. शेवटच्या टप्प्यात मोठी शिळा अडकल्याने चिमणी तंत्राने चढाव लागत. म्हणजेच पाठ टेकत व पायाने आधार घेत वर यायचं. वीस एक मिनिटात गडमाथा गाठला. छोटा कुलंगवर पहाण्यासारख असं काहीच नाही. येथून कुलंगचं अफलातून दर्शन होतं. उपमा पोटात ढकलत काळजीपुर्वक खाली उतरलो. खाली गावात उतरता आलं असतं पण चक्रमचा शिरस्ता आणि त्यात सह्यांकन आणखी एखादी घाटवाट होऊन जाऊदे गाढवघाटाने खाली कोकणात उतरायचं होतं. छोटा कुलंग व गाढवघाट बोनस होते. आदित्य,तन्मय,श्रीकांत,चंदरमामा आम्हाला पुढच्या वाटेवर सोडायला आले. पुन्हा तोच सिलसिला. छोट्या कुलंगला वळसा, डावाकडे दरी, झाडाझुडपातून मुरमाड मातीची वाट घसारा. हि वाट वापरात नसल्याने थोडी बिकटचं. एव्हाना उन तापू लागलं. ट्रँव्हर्स संपला आता तीव्र घसरडीचा टप्पा. हा टप्पा पार करत बऱ्यापैकी खाली आलो.
 |
सरदारजी च्या वेशात वाटाड्या चंदर मामा |
 |
घसरड ..... केवळ घसारा |
गाढवघाटाने न जाता उजवीकडे पाण्याच्या ठिकाणी जेवण आटपल. दुपारचे दोन वाजले होते. थोडा आराम करत पुन्हा पायपीट सुरू झाली गाढवघाटाच्या दिशेने. आदित्य व टिमने निरोप घेतला व ते कुलंगकडे परतले. आमच्यासोबत चंदर मामा होते. झपाट्याने खाली उतरत होतो. वाट तशी बिकटच आहे. मध्ये एक सोपा कातळटप्पा उतरत ओढ्यात आलो. समोरील टेपाडावर चढलो. थोडं
सपाटीवर चालत खाली उतरताच गाढवघाटाच्या मुखाशी पोहोचलो. पार दूरवर कोकण
दिसत होत. येथे चढल्यावर/उतरताना गाढवासारखं खाली बघितलं जात म्हणून गाढव
घाट इति चंदर मामा. याला पोखेरीचा दरा असही म्हणतात मामांनी माहिती पुरवली.
डोंगर पोखरला गेल्यामुळे असेल कदाचित. या वाटेला आम्हाला लावत
चंदरमामा माघारी परतले. ही वाट पहाताच गुयरीचा दरा आठवला त्यामानाने सोपी.
दगड, धोंडे, उतार होताच. उन चांगलच तापलं होतं. सह्यांकनचा हा शेवटचा टप्पा.
खाली झाडोरा दिसत होता. झपझप उतरत झाडीत शिरलो. थोडं हायसं वाटलं. मध्ये
थांबत चाल सुरू ठेवली. पठारावर आलो. सपाटीवर चाल. खाली लादेवाडी दिसू
लागली. खाली पिनाक व लांबा जीपा घेऊन तयार होतेच. पाच दिवसाची मोहीम संपली होती पण मन मात्र रेंगाळत होत ते सह्याद्रीच्या बाहुपाशात.
खरंच पाच दिवस मंतरलेले होते. एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होत. सह्यांकन ने २०१७ च्या भटकंतीला चार चाँद लावले. सहसा वापरात नसलेल्या वाटा ,खडतर,कठीण मार्ग. बऱ्याच ठिकाणी कातळटप्पे घसारा , निसरडा रस्ता , पाच दिवसांच पाठीवर ओझं . पण चक्रम टिम ,आमचे नेते व सर्व सहभागी एक से बढकर एक दणकट असल्याने हि यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
काही नोंदी:
- घाटघर ते कुलंग लागलेला वेळ ६ ते ७ तास(विश्रांतीसह)
- कुलंग ते छोटा कुलंग साधारण तास ते दिड तास
- गाढवघाट चार ते पाच तास
- वाटेवर बऱ्याच ठिकाणी घसारा ,निसरडे कातळटप्पे असल्याने अनुभवी टीम व सुरक्षित साधनांसह जावे.
- शारीरिक व मानसिक बराच कस लागतो. तेव्हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे.
- कुलंगकडे व छोटा कुलंगकडे जाताना वाटेत मधमाशांची पोळी आहेत. सावधगिरी बाळगावी.
आभार :चक्रम हायकर्स
 |
सह्यांकन २०१७ गट क्र २ (छायाचित्र सौजन्य:मधुकर धुरी) |
 |
आमचे नेते भाऊ वैशंपायन व महेश कदम
|
No comments:
Post a Comment