एक भन्नाट वारी. वारीचं म्हणायची ती. मागच्या खेपेस कुमशेत ते कात्राबाई केला होता पण वेळेअभावी रतनगड हुकला होता. संधी चालून आली ती डोंबिवलीच्या ट्रेकक्षितिज मुळे. शुक्रवारी बँग भरली. अंगात थोडा ताप असल्याचं जाणवत होतं. थकल्यासारखं वाटत होतं. तंगडतोडीला जावं की नको तळ्यात मळ्यात चाललं होतं. पस्तीस चाळीस किमी रपेट जमेल कि नाही ? शेवटी शेंडी तुटो की पारंबी म्हणत तळ्यात उडी मारली म्हणजेचं तंगडतोडीस स्वतःला सज्ज केलं. क्रोसीन घेत बस प्रवास सुरू झाला. बस रतनवाडीच्या दिशेने धावत होती. गाढ झोप केव्हा लागली कळलचं नाही. भल्या पहाटे रतनवाडीस पोहेचलो. पहाटेच्या नीरव शांततेत मंदिरातील किर्तनाचे सूर कानी पडत होते. थोडा गारवा जाणवत होता. पाठीवरील बोचकी ठेवत काळोखाचा फायदा घेत महत्त्वाची कामं आटपून घेतली. पोटाची साफसफाई झाली. सगळे पोह्यांवर आडवे पडले. आणि गवती चहा. बेस्टचं एकदम. एव्हाना उजाडू लागलं. रतनवाडी हळूहळू जागी होत होतं. रविकिरणं अमृतेश्वरावर पडत होती. रतनगडचा खुट्टा ,नेढं खुणावत होतं. अमृतेश्वराची ओढ लागली. एक धावती भेट घेतली. याचं सौंदर्य कितीही वेळा पहा डोळ्यांचं समाधान होतंचं नाही.
रतनवाड़ी |
मंदिरातील सुंदर कलाकुसर |
पुढे बराचं पल्ला गाठायचा होतो. दर्शन आटपून रतनगडाची वाट धरली. पुढे राहुल तर मागे ऑगस्टीन व प्रशांत होते. प्रवरेचं पात्र पार करत चढण चढलो. ओळखपरेड झाली. पुन्हा पावलं झपझप चालू लागली. डाव्या बाजूला कात्राचे डोंगर तर उजव्या बाजूला खुट्टा ठेवून चालत पावलं टाकत होतो. मध्येच जुन्या झाडांची गर्द सावली मध्येच तळपणारा सूर्य. चौफुली पाशी पोहोचलो. इथूनचं नाकासमोरच्या वाटेने हरिश्चंद्रगडावर जायची वाट आहे. रतनगडाकडे वळलो. थोड्याचं वेळात शिड्यांपाशी आलो. शिड्यांची मालिकाचं. डुगडुगणाऱ्या शिड्यांवरून सावधपणे चढलो.
रतन गडचा खुट्टा |
मार्ग दाखवणारे दादा |
पहिला दरवाजा . डाव्या बाजूला गणेशाची सुंदर मुर्ती कोरली आहे. जणू काही स्वागतचं करत होती.
थोडं उजवीकडे वळत गुहेपाशी आलो. लिंबू सरबत घेत आलेला थकवा झटकून टाकला. समोरचं भंडारदऱ्याचा जलाशय. डाव्या बाजूसं बलाढ्य असे अलंग मदन कुलंग कळसुबाई दिमाखात उभे होते. थोडा वेळ आराम करत कात्राचे डोंगर पहाण्यास निघालो . हा गड फुलं नसल्यामुळं थोडा भकास वाटत होता पण त़्याचं सौंदर्य तसूभरही कमी झालं नव्हतं. सह्याद्रीतलं रत्नचं ते कुठल्याही ऋतूत चमकणारचं. सह्याद्रीतले गड किल्ले कितीही वेळा पहा प्रत्येकवेळी नवीनचं भासतात. समोर उभा ठाकला तो कात्राचा स्तब्ध विराट डोंगर. ते पाहून आपण किती खुजे आहोत याची प्रचिती येते. डावीकडे नजर फिरवली घनचक्कर,गवळदेव,मुडा याची झकास अशी रांग. अग्निबाण सुळका कात्राला चिकटून उभा होता. यालाच वळसा घालून कुमशेत गाठायचं होतं.
खाली डोळे विस्फारले ते कात्रा व रतन मधल्या भयावह दरीत. भयंकर खोल. पोटात गोळा येतो. पर डरना मना है. उजव्या बाजूस दूरवर थोरला आज्या पर्वत पसरला होता. सारं नजरेत साठवलं तरी कमीचं. मागे राणीचा बुरूज. राणीचा बुरूज पाहत नेढ्याकडे वळलो. नेढ्याकडे जाणारी खडी चढण नेटाने पार केली. नेढं या विस्मयकारी प्रकारात विसावलो. भर्र भर्र वारा वाहत होता. एक वेगळचं समाधान वाटत होतं. नेढ्यातनं खाली उतरलो ते थेट त्रिंबक दरवाज्याकडे. कातळात कोरलेल्या सुंदर अशा पायऱ्या. दरवाजा. ही वाट साम्रदमध्ये उतरते. वर आल्यावर खुट्टा समोरचं दिसतो. खाली भली मोठी सांधण दरी व दुपारच्या शांततेतलं साम्रद गाव. या खुट्ट़्याला वळसा मारून साम्रद गाठता येतं.
आता गड उतरण्यास सुरूवात केली. आमच्यासोबत एक कुत्री होती. ६०फूटांची शिडी ती इतक्या व्यवस्थितपणे तोल सांभाळत उतरली कि मान गये. चौफुलीपाशी डबे उघडले गेले. शाकाहारी ,मांसाहारी,गोड पाहता पाहता फस्त. थोडी विश्रांती झाली. दुपारचे दोन वाजले होते. अजून बराच पल्ला पार करायचा होता. अंधार पडायच्या आत गावात पोचणं गरजेचं होतं हे ओळखून निघालो. वाटेत पाणपिशव्या भरून घेतल्या. आणि सुरू झाली कात्राच्या जंगलातली वाट. कात्राच्या खिंडीतून कुमशेत असा प्रवास. झाडाचं आच्छादन असलेली ही वाट. गच्च झाडी. घनदाट जंगलातली वाट पार करताना वेगळचं सुख अनुभवत होतो. या वाकड्या वाटांची माफक अपेक्षा असते ती म्हणजे भटक्यांची पावलं. योगेश सरांच्या गुडघ्याने कुरकुरण्यास सुरूवात केली. ते जवळपास सतरा वर्षांनंतर ट्रेक करत होते. तरीही अंतर पार करत होते. रतनगड मागे पडत होता. कात्राचं जंगल फारचं दाट होऊ लागलं. मध्ये एक दोन ठिकाणी क्षणभर विसाव्यासाठी थांबलो. पुढे दगडधोंड्यांनी भरलेली चढण लागते ती पार करत टेपावर आलो. अजूनही कात्रांचं मंदिर दूर होतं. थोडी चढाई करत कात्राबाईच्या पायथ्याशी आलो. इथून एक वाट घनचक्कर गवळदेवाकडे जाते आणि एक कुमशेतकडे आणि वर चढलं कि कात्राबाईचा माथा. अजूनही कुमशेत दिड दोन तासांवर होतं. थोडं टेपावर चढून वर गेलो. छान दृश्य पहायला मिळालं. खाली कुमशेतचा कोंबडा, वाकडी सुळका,पसरलेलं कुमशेत गाव, सह्याद्रीतली अनेक शिखरं.
सर्व कँमेरात बंदिस्त करत कुमशेतमध्ये उतरण्यास प्रारंभ केला. पावलं वेगाने उतरत होती. काही ठिकाणी तीव्र उताराशी गाठ पडत होती. एका ठिकाणी तर पूर्ण घसरड आणि माती. उतरताना काही जणांची भंबेरी उडाली. पार्श्वभाग चांगलाच शेकत होता. खाली उतरत पाणवठ्याकडे आलो. थोडं विसाव्यासाठी थांबलो. ऑगस्टीन व प्रशांत योगेश सरांना सांभाळत मागाहून येत होते. योगेश सरांच्या दोन्ही गुडघ्यांनी शरणागती पत्करली होती. आणि त्यात कात्राची चिंचोळी वाट. राहुल मदतीसाठी गेला. सर्वानी न डगमगता योगेश सरांना खाली सुखरूप आणलं. अजूनही गाव तासाभरावर होतं. राहुलने निर्णय घेतला दोन चादरी एकत्र करत सरांना उचलून न्यायचं. वाट सोपी नव्हती. दगड धोंडे होते. सर्वानी थोडा थोडा हातभार लावला. धीर देत होते. थोडं सपाटीवर आल्यावर सर हळूहळू चालायला लागले. एवढं होऊनही हिम्मत काही हरले नव्हते. त्यानीही चांगल सहकार्य केलं. सह्याद्रीत भटकताना बरेच प्रसंग येतात. अचानकपणे आलेल्या प्रसंगांना खंबीरपणे तोंड द्यायचं हे सह्याद्रीचं शिकवतो. सांघिक कार्याचा नमुना इथे पहायला मिळाला. गावात पोहोचलो पण कळलं कि अस्वलेंचं घर अजून दूर आहे. थोडं थांबत पुन्हा डांबरी रस्त्याने पायपीट सुरू. दिवसभर चालल्यामुळे पाय अक्षरशः तुटत आले होते. शेवटी पोहोचलो एकदाचे अस्वलेंच्या घरी. चहाने थोडी तरतरी आली. जेवण होइपर्यंत थोडा वेळ होता. गप्पाटप्पा सुरू झाल्या. जेवण आटोपल्यावर झोपण्याची तयारी सुरू झाली. पुन्हा तापाने डोकं वर काढलं पूर्ण शरीर तापलं होतं. क्रोसीन घेतली. उद्या हरिश्चंद्रगड जमेल कि नाही हा विचार करत झोपी गेलो. साडेपाचला गजरने उठवलं. थोडं बरं वाटत होतं. चहा पीत ताजतवानं झालो. पेठ्याच्या वाडीत जायचं होतं. तरी दिड दोन तासांचं अंतर होतं. चालू लागलो. मागे वाकडीचा सुळका दर्शन देत होता.
पेठ्याच्या वाडीकडे जाताना |
वाकडी सुळका |
कुमशेत मागे पडल. मध्येच कलाडगड डोकावत होता. ही जी वाट आहे तिथे मैलाचे दगड आहेत ब्रिटीशकालीन असावेत. ही वाटही फार सुंदर आहे. मुळा नदीच्या काठाने मार्गक्रमण करत होतो. मुळा नदीचं पात्र ओलांडत पलीकडे आलो. वाटाड्या मामांना निरोप दिला. पुढे चढण सुरू झाली. चढण संपताच पेठ्याच्या वाडीत पोहोचलो. विशेष म्हणजे रतनवाडीपासून पासून पेठ्याच्या वाडीपर्यंत कुत्रीने सोबत केली. बस तयार होतीचं. अर्ध्या तासात पाचनईला पोहोचलो. नाश्ता व्हायला थोडा वेळ होता. तोपर्यंत मंदार सोबत म्हटलेल्या स्फूर्ती गीतांनी परिसर दणाणून गेला. पोहे पोटात गेल्यावर हरिश्चंद्रगडाची वाट चालू लागलो. ही फारचं सोपी वाट आहे. थोडं चढल्यावर पायऱ्या लागतात. डाव्या बाजूस उंचच उंच कडा. त्यानंतर नदी काठची वाट सुरू झाली. छोटासा ओढा पार करत चढणीला लागलो. थोडा आराम केला. आता थोडंचं अंतर कापायचं होतं. थोडंसं अंतर चालल्यावर मंदिराचा कळस दिसू लागला. आलो बुवा एकदाचे गडावर. मंदिराकडे निघालो. प्रवेशद्वारातून आत शिरताना देवनागरीतील शिलालेख नजरेस पडला.
येथे वर्णन केलेला चक्रपाणि वटेश्वर म्हणजे चांगदेव. गोनीदानी त्यांच्या दुर्गभ्रमणगाथा पुस्तकात याच उल्लेख केलाय ते म्हणतात कि चक्रपाणि हे महानुभव पंथाच्या आचार्यांचे नाव. या गडावरील शिलालेख हे कुतूहलचा विषय आहे. प्राचीन असं हे मंदिर डोळे खिळवून ठेवतं. गाभाऱ्यात चहूदिशांनी प्रवेश करता येतो. या हेमाडपंथीय मंदिराची कलाकुसर देखणी आहे. वेगवेगळे भाव असलेल्या अनेकविध मूर्त़्या कोरल्यात.
मागे गुहांमध्ये मधुर थंडगार पाण्याची टाकं आहेत. त्या हातांना सलाम ज्यांनी हे मंदिर घडवलं. ही कलाकुसर पाहत केदारेश्वराचं दर्शन घेतलं. गणेश गुहेकडे निघालो. येथे दोन गुहा आहेत. शे दिडशे माणसं आरामात राहू शकतात. गुहेत भाया गणेशाची मूर्ती आहे. तळपत्या उन्हात कोकणकड्याकडे कूच केलं. झोपून त्याचं ते अक्राळविक्राळ अर्धवर्तुळाकार विराट रूप पाहील. सरळ कोकणात घुसलेला. येथे म्हणे इंद्रवज्र दिसतं पावसात. नक्कीच पहाव लागेल. कोकणकड़्यावरून बराच मोठा आवाका नजरेत सामावतो. कोकणकड्याशिवाय हरिश्चंद्रगड पूर्णचं होत नाही.
या महाकाय दर्शनानंतर भास्कर दादाकडे भरपेट पिठल भाकरी खाली. भूक शांत झाली. गड उतरू लागलो. एवढ्या भयानक वेगाने सर्व जण ताडताड उतरत होते कि अर्ध्या पाऊण तासात पाचनईत. विहीरीच़्या थंडगार पाण्याचे हबके मारत दिवस भराचा शिणवटा दूर केला. परतीच्या मार्गाला लागलो. या वाटेने मनात ठसा उमटवला ते मोहून टाकणारे गड,सह्यशिखरं, सुळके यामुळे तसेच दोन अर्वाचीन पाषाणशिल्पांमळे.
No comments:
Post a Comment