खूप दिवसांपासून सह्याद्रीस बिलगलो नव्हतो. एखाद्या दमदार,तगड्या ट्रेकची प्रतिक्षा होती. महादेवने टाकलेला दाऱ्या घाट वाचला आणि प्रतिक्षा संपली. तसाही दाऱ्या घाट मनात खूप दिवस घोळत होता. त्रिगुणधारेतून वर चढायचं. दुर्ग,धाकोबा व दाऱ्या तून खाली. एकदम तगडा ट्रेक. शुक्रवारी रात्री कल्याण बस स्थानकात हजर झालो. महादेवशी गप्पा मारत असताना एक समोर बसलेला कलाकार आमच्या जवळ आला. त्याच्या बोलण्यावरून तो नुकताच तीर्थप्राशन करून आल्याचं आम्ही ताडलं. त्याचं काय झालं की महादेवने बाकावर ठेवलेली भलीमोठी बँग मढ्यासारखी वाटली म्हणून तो विचारपूस करण्यास आला. गमतीचा भाग. तात्पर्य सतर्कता महत्त्वाची. आम्ही अवघे सात जण होतो. मुरबाडला जाणारी यष्टी पकडली. जवळपास बाराच्या सुमारास पोहोचलो. स्थानकात चार पाच पाशिंजराखेरीज कोणी नव्हतं. आम्ही आलो आणि गडबड सुरू झाली. डेहरीची बस १२:३०ची होती. ट्रेक्स , अवघड ट्रॅव्हर्स च्या गप्पांमधें गुंतून गेलो. बसमध्ये चढलो. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास सुरू होता. ड्रायवर महाशय पार रंगात आले होते. यष्टी उड्डाणं अशी काय घेत होती की हाडं खिळखिळी होतात कि क़ाय असं वाटू लागलं. शेवटी डेहरी गावात पोहोचलो. एका घरात पथारी पसरली. सकाळी लवकर उठलो. सर्व विधी आटपून नाश्ता करून बाहेर पडलो. डेहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचं गाव. गोरखगडाचं दूरूनचं दर्शन घेतलं. पुढचा प्रवास जीपचा होता. वाघाच्या वाडीत पोहोचलो. सह्यरांगांनी वेढलेलं हे गाव. खालून खुटे दाराची कठीण वाट व त्रिगुणधारा घाट दिसत होता. एका दादांना विचारलं किती वेळात चढता त्रिगुणधारा उत्तर एक तास. मला या एक तासाचं गणित घाट उतरल्यावरही कळलं नाही. असो.
आम्ही घाट चढायला सुरूवात केली. हा घाट वर डोणी गावाला जाऊन मिळतो. त्यास डोणीचं दार असाही नाव आहे. तीन शिखरांमुळे त्याला तिरंगी असाही म्हटलं जातं. ऑफबीट असल्याने आम्हा सात जणांशिवाय कोणीच नव्हतं. दाट जंगलाची वाट होती. दाट सावली सुखावत होती. मध्येच बिबट्याचा विषय निघाला. माझ्या माहीतीप्रमाणे बिबट्या मागून हल्ला करतो हे सांगितल्यावर सुरूवातीस मागे असलेला रोहन पुढे जाऊ लागला . थोडं जंगल पार केल्यावर नळीत शिरकाव केला. आता मोठमोठ्या दगडांशी सामना करावा लागणार होता. थोडा विसावा घेत पावलं घाटाची वाट चालू लागली दुर्गवाडीच्या दिशेने. मोठमोठे दगड ,घसरण पार करत, सह्याद्रीच मनोहारी दर्शन घेत मार्गक्रमण चालू होतं. या घाटातून आजोबा पर्वत, सीतेचा पाळणा एकदम स्पष्ट दिसतो. शेवटी एक चढाईनंतर पठार लागलं. थोडं हायसं वाटलं. मध्यान होऊन गेली होती. एक नदी पात्र बाजूलाचं होतं. सावली सापडली .शिदोरी सोडली. पोटात कावळे ओरडत होतेच. मस्त ताव मारला. थंडगार सावलीत पहुडलो. आराम केल्यावर लिंबू सरबत घेत दु़र्ग च्या दिशेने वाटचाल सुरू झाली. वाट सपाटीची होती. पुढे एक खोलवर जाणारा कडा नजरेस पडला कोकणकड्यासारखा. झोपून पाहील तर त्याचं भयाण अक्राळविक्राळ रूप नजरेस पडलं. थोडं अंतर कापलं. अवधूत पूर्णपणे थकला होता. इथेच बसतो असं म्हणू लागला. आता थोडंच अंतर आहे त्याला थोडा धीर दिला व राजी केलं. पुढे एका मामांना रस्ता विचारत दुर्गची वाट धरली. वर चढताना गर्द झाडी होती. देवीचं दर्शन घेत कोकणकड्याकडे पळालो. सायंकाळचं आल्हाददायक वातावरण होतं. कोकणकड्याहून परतत मंदिराच्या समोरील बाजूने दुर्ग चढण्यास सुरूवात केली. दहा पंधरा मिनिटांत एक छोटा कातळटप्पा सर करत गडावर आलो. गार वारा सुटला होता. तो भरार वारा फुफ्फुसात भरून घेतला. थोडी गडफेरी झाली. सूर्यास्ताची चाहूल लागली. पळत मावळतीकडे बसलो. दूरवर डोंगराआड भास्कर रंग उधळत होता व निरोप घेत होता. त्याला न्याहाळताना एक वेगळाचं आनंद मिळत होता. तिथेचं बसून रहाव अस वाटत होतं पण गावात जायचं होतं. थोड्या वेळात दुर्गवाडीत पोहोचलो. जवळपास साडेसात वाजले होते. एका घरात जेवणाची व राहण्याची सोय झाली. बाजूलाच शिवार होतं. आकाश एकदम सुंदर दिसत होतं . चांदण्या लुकलुकत होत्या. मंद वारा सुटला होता. शहरात हायमास्ट मुळे या चांदण्यांचं सौंदर्य खुलतचं नाही. आकाशदर्शनासाठी अनुकूल असं वातावरण होतं. कस्तुरी खगोलमंडळात असल्याने तिने बऱ्यापैकी माहीती सांगितली. दुर्बिण नसल्याची खंत मात्र जाणवली. या ताऱ्यांच्या चांदण्यांच्या गावी एकदा तरी जावे हा विचार मनात आला. गरमागरम भाजी भाकरी डाळ भात असा बेत होता. दिवसभर चालल्यामुळे भूकही सणकून लागली. जेवून तृप्त होत स्लिपींग बँगमध्ये शिरलो. रविवारचा दिवस पाचच्या सुमारास उठलो. चहा घेत तयार झालो. अवधूत थकल्यामुळे मुंबईत परतण्यास निघाला. त्याला निरोप देत धाकोबा च्या वाटेला लागलो. सुर्योदय होत होता. सोनेरी किरणं पसरली होती. दोन-तीन तासात धाकेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. टुमदार असं मंदिर.
तिथे एक भलामोठा दगड ठेवण्यात आला आहे जवळपास सत्तर ऐंशी किलोचा. असं म्हटलं जातं कि तो गोळा उचलून खांद्यावरून मागे टाकायचा. महादेवने लिलया उचलला. महादेवचं तो. त्याला काय अशक्य असणार? अमितने उचलण्याचा प्रयत्न केला पण असफल. मी विचार केला पण बस की बात नही असं मनाला सांगत विचार झटकून टाकला.बाजूच्या विहीरचं थंडगार पाणी पित धाकोबा चढण्यास प्रारंभ केला. खडी चढण होती. मातीमुळे पाय घसरत होते. दूरवर पाहीले तर गोरखगड मच्छिंद्रगडाचे सुळके डोकं वर काढत होते. थोडीफार कातळचढाई करत वर पोहोचलो. काय अफलातून नजारा पेश झाला होता. आजूबाजु़ूला दुर्गरांगांचं भारावून टाकणारं दर्शन .मन भरलं .भटक्याना आणि काय हवं असतं? लांबच लांब दूरवर पसरलेल्या रांगा. समोरचं नाणेघाटचा रक्षक बलाढ्य जीवधन उभा ठाकला होता.सोबत नाणेघाट.हरीश्चंद्र गड,नवरा नवरी असे कितीतरी. दूरवर चावंड डोकावत होता. बाजूलाच निमगिरी, हनुमंतगड.
छायाचित्र साभार:मंदार तळवेकर
लगेच डोक्यात पुढच्या ट्रेकचा प्लान झाला.येथून दाऱ्या घाट खुणावतो. हा सगळा नजारा पाहत तासंतास बसावसं वाटतं. दाऱ्या घाटातून उतरण्यास निघालो. घाटाच्या मुखाशी जाण्यास जवळचा मार्ग होता. पण रॉक पँच मुळे टाळत थोडा लांबचा मार्ग निवडला. दाऱ्या घाटापाशी आलो. तिथे एक मंदिर आहे भैरवाचं. घाटाचा प्रवास सुखरूप होण्यासाठी साकडं घालण्यासाठी. तिथेचं जेवण उरकल. दाऱ्या च्या मुखापाशी आलो. हा घाट म्हणजे जुन्नरमधील आकर्षण. आंबोली गावातून थेट पळू गावात. कोकणाला जोडणारा. व्ही आकाराची घळ.वरून दृष्य पाहीले की बेभान व्हायला होतं. हा दाऱ्या अक्षरशः डोळ्यात भरतो. आम्ही उतरण्यास सुरूवात केली. दाट झाडी, दोन्ही बाजूला गगनाला भिडणारे उंचच उंच कडे. दगड धोंड्यांनी भरलेली वाट. मध्येच पक्षाची शीळ सुरावट ऐकून कान तृप्त होत होते.पुढे नदीचं पात्र लागलं. मोठमोठे दगड पार करावे लागत होते. नदीपात्रातून बाहेर पडत वरून जंगलातून जाण्याचा निर्णय घेतला. वाट दाट जंगलातली होती. बराच वेळ तंगडतोड झाली. आणि निर्णय चुकल्याची जाणीव झाली. पण सह्याद्रीत त्याला पर्याय नसतो. महादेवपाठोपाठ परत नदीपात्रात उतरण्यास सुरूवात केली. वाट फार बिकट होती. वापरात नसल्याने काट्याकुट्यांनी दगडधोंड्यांनी भरलेली. सावध खाली उतरलो. क्षणभर विश्रांती घेत ठणठणपाळ पात्रातून मार्गक्रमणास सुरूवात केली. तिन्हीसांजेस थोडाचं वेळ बाकी होता. भरभर गावात पोहोचणे गरजेचं होतं. वाट काही संपत नव्हती. अंदाज येत नव्हता.अखेर महादेवला वाट शोधण्यात यशं आलं. नदीपात्र सोडून आम़्ही त्या वाटेला लागलो. अंधार पडू लागला होता. टॉर्चच्या प्रकाशात वाट तुडवत होतो. गाड्यांचे आवाज कानी पडू लागले. गावाचा अंदाज येऊ लागला. तब्बल तासाभराने घरं दिसली. गावं आलं. पण ते सिंगापूर होतं. आम्हाला उतरायचं होतं पळूत पण दोन किमी मागे उतरलो. सिंगापूरला विमानाने नाही चालत तर पोहोचलो एवढचं काय ते समाधान. पळूत जीप बोलवली होती. त्याला मागे सिंगापूरमध्ये बोलावलं. दादा सहापासून वाट पाहत होते. मुरबाडकडे निघालो तिथून यष्टीनं कल्याण. एक स्मरणात राहील अशी भटकंती. पूर्ण ट्रेक भर व कल्याण येईपर्यंत गंगटोक भटकंती विषय फारचं गाजला. हाती काही लागलं नाही हा भाग वेगळा. असो पुन्हा भेटूच नवीन भटकंती व विषय घेऊन. सरत्या वर्षाला जडपणे निरोप देतोय. भटकंती साठी हे वर्ष खूपचं छान गेलं. नवीन वर्षाचं ताज्या दमाने स्वागत करूया.
Chhan Mandar
ReplyDeleteKhup Mast Mandar....
ReplyDelete