Thursday, February 16, 2017

बागलाणात दोन दिवस



खूप दिवस बागलाणातील किल्ले पालथे घालायचा विचार मनात घोळत होता. पण योग येत नव्हता. या ना त्या कारणाने शक्य होत नव्हतं. अखेरीस चक्रम हाइकर्स बरोबर जाण्याची तयारी केली. नाशकातले वैशिष्टपूर्ण किल्ले सर करण्यात वेगळीच मजा असते. रात्री बसने नाशिककडे मार्गस्थ झालो. मख्खन रस्ता असल्यामुळे गाडी भरधाव होती. झोपही छान लागत होती. गाडी नाशिकला येताच नाशिककरांना घेत सटाण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं. मध्ये चहा मारत झोप उडवली. सहज दुकानातल्या वेफर्सच्या पाकीटांकडे लक्ष गेलं तर नाव होतं सैराट. काय काय नाव देतील हे देवचं जाणे. असो. साडेपाचचे सुमारास वाडी चौल्हेर येथे अवतरलो. आडोसा शोधत महत्त्वाची कामं आटपली. गरमागरम पोहे पोटात ढकलत चौल्हेरच्या दिशेने शिस्तबद्ध कदमताल सुरू. अमेय आघाडी सांभाळत होता तर सौरभ पिछाडी. ही वाट सोंडेवरून जाते. थोड्याच वेळात तीन भुयारी दरवाज्यांपाशी पोहचतो. हे दरवाजे म्हणजे उत्तम वास्तुकलेचा नमुना आहे. या दरवाज्यातनं वर गेल्यावर बालेकिल्यापाशी जाता येत. येथे काही पाण्याची टाकं आहेत. पण पाणी पिण्यायोग्य नाही. कडेला बसून डोलबारी रांग व बाकी परीसर न्याहाळता येतो. 






हा गड उतरत साल्हेरवाडीस प्रयाण केलं. वाडी चौल्हेर ते साल्हेरवाडी अदमासे तासभर लागतो. या गावची भाषा ऐकल्यावर पुरणपोळी आणि ढोकळा एकत्र खाल्यासारखा वाटतो. गुजरातमधील डांग जिल्हा जवळ असल्याने गुजरातीमिश्रीत मराठी. दुपार झाली होती. भोजन उरकलं आणि लगेच चढाईस सुरूवात केली. उन कडकडीत तापलं होतं. अवाढव्य पसरलेला रांगडा साल्हेर आव्हान देत होता. आणि खडी चढण. जेवल्यामुळे शरीर जड झालं होतं. झाडांची सावली नव्हती. चढण भाग होतं. वाट धोपट असल्याने चुकनेका प्रश्नच नाही. थोड्या चढाईनंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या दृष्टीस पडतात.या पायऱ्या कडाडत्या उन्हात चढताना छातीचा भाता फारचं जोरात चालतो. थोड्याच वेळात पहिल्या दरवाज्यापाशी येऊन ठेपतो. यावरील कमळपुष्पांवरून यादवकालीन वाटतो. 




काही क्षणांची विश्रांती घेत पुढच़्या टप्प्याकडे वळलो.  थोड्याच अंतरावर आणखी एक दरवाजा आमचं स्वागत करत होता. त्याला स्पर्श करत हा अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा न्याहाळत होतो. थोड्या पायऱ्या चढून वर गेल्यावर आणखी एक दरवाजा. जणू काही दरवाज्यांची माळचं. शेवटच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर भराट वारा सुरू होतो. मोकळं गादीपठार लागतं.


 याच गादी पठारावरून सरळ चाल ठेवत गेल्यास  एक लांबच्या लांब आयताकृती पाण्याचं टाकं लागतं. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याजवळचं एक यज्ञवेदी आहे. अशी यज्ञवेदी महाराष्ट्रात कुठल्याच गडावर आढळत नाही. यावरून गडाचा पुराणकाळाशी देखील संबंध आहे हे अधोरेखीत होते. दमछाक झाल्यामुळे थोडं पहुडलो. पुढे वाटचाल करत तलावापाशी पोहोचलो. शांत गंगासागर. मध्ये असलेल्या खांबाच प्रयोजन कळत नाही. 

रेणुकामाता मंदिर 

बाजूलाच पडकं मंदिर आहे. यात रेणुकामातेसोबत बाप्पा विराजमान झालेत. हे सर्व पाहून वरच्या अंगाला असलेल्या गुहांकडे गेलो. या गुहा पाहून खडकात  लेणी खोदलेली  वाटतात. तीन प्रशस्त गुहा. 


तोवर सुर्यास्ताची वर्दी आली. पटापट गुहेत बोचकी टाकत गुहेच्या वरच्या बाजूला बालेकिल्या दिशेने पळालो. बालेकिल्यावर जाताना बुद्धीबळातल्या उंटासारख तिरक्या वाटेने जावं लागतं. वाट घसरडीची आहे. जपून पावलं टाकावी लागतात. पण रवीला डोगरापल्याड जाताना पहायचं होतं. पाय झपझप चालू लागले. वर गेल्यावर परशुराम मंदीर खुणावतं. एक खडी चढण पार केल्यावर गडाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचतो. परशुरामाला दंडवत घातला. परशुरामाने येथून बाण सोडला त्यामुळे पिंपळगडावर नेढं तयार झालं अशी आख्यायिका सांगितली जाते. नजर चहूबाजूला भिरभिरत होती. सह्यमंडळ अवतरल होतं. समोरचं सालोटा खेटून उभा होता लहान भावासारखा. साल्हेर सालोट्यातली प्रचंड दरी, पिंपळ्या, हातगड ,रवळ्या  जावळ्या ,धोडप,चौल्हेर असे अनेक गड, मधूनचं डोकावणारी शिखरं एकूणचं अवर्णनीय. सारंचं विस्मयकारी. या गडाच्या विस्तार फारच मोठा आहे. 


परशुराम मंदिर 
मावळतीकडे डोंगररांगाच्या मागे जाण्याची घाई करणारा तांबूस झालेला मित्र म्हणजेच भास्कर. खाली धरणबारीचा जलसंचय. दुर्गभटक्यांसाठी हा अपरिमित आनंदच . सर्वोच्च किल्ल्यावर असल्याच्या संतोषाने मन न्हालं होतं. भास्कराकडे डोळे लावून बसलो. या सालेरीच्या इतिहासाची पान डोळ्यांसमोर आली.  येथे झालेली घनघोर लढाई. गनिमी काव्याचा वापर करत घोड़ दळ व पायदळाच्या साहाय्याने मुघलांना पाणी पाजणारे मराठे. महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटलं तेव्हा ते बागलाणात आले. मराठ्यांनी कारंजे शहर लुटलं तेव्हा भरपूर लूट मिळाली ही लूट सुरक्षित ठेवण्याकरता साल्हेरची निवड केली गेली. साल्हेरला वेढा पडला. साल्हेर ताब्यात आला. लूट साल्हेरवर ठेवण्यात आली. दाऊदखान लगेच साल्हेरला निघाला पण तोवर मराठ्यांनी साल्हेर जिंकला होता. औरंगजेब चवताळला होता. त्याने बहादुरखान व दिलेरखान याना  बागलाण मोहीमेवर पाठवले. साल्हेरला मुघलानी वेढा घातला. राजांना खबर लागताच मोरोपंत पिंगळे  व प्रतापराव गुजर यांना धाडले. या दोघांनी एक योजना आखली. तुंबळ युद्ध झालं. मराठ्यांनी मुघलांना दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडलं. मराठ्यांच्या झंझावातापुढे मुघलांचा निभाव काही लागला नाही. मुघल चारी मुंड्या चित झाले. विजयाचे पडघम वाजले. दिलेरखान साल्हेरजवळ होता ही वर्दी ऐकून मागच्या मागे पळून गेला. राज्याभिषेकापूर्वीची ही अत्यंत महत्त्वाची लढाई. या लढ़ाईत खुप मोठी लूट मिळाली. साल्हेर या लढाईचा साक्षीदार होता.राजांना व मावळ्यांना मानाचा मुजरा.

थोड्याच वेळात मित्राला निरोप देत संधीप्रकाशात गुहेकडे निघालो. हवेत गारठा वाढला होता. भूक तर सपाटून लागली होती. आणि समोर भेळ आली सारेचं तूटून पडले. या गारठ्यात सूप आणि चहाचं सुख वेगळचं. मध्येच चर्चा चालू होती गंगासागराजवळ बिबट्याच्या पावलांची. छातीत थोडी धडकी भरली.आला असेल पाणी प्यायला अस समजावत भिती घालवली. रात्र चढत होती. साल्हेर शांत होता. थोड्याच वेळात खिचडी खात स्लिपींग बँगमध्ये शिरलो. सकाळी जाग आली. बाहेर आलो. तांबडं नुकतंच फुटत होतं.भवतालाने एक वेगळाच वेश परिधान केला होता. उगवती उजळून निघत होती. शिखरांवर रंग चढत होता,चमचमत होती. प्रसन्न सकाळ. कँमेरे सरसावले. थोडी फोटोग्राफी झाली.


 नाश्त्याला मँगी झाली. गुहेतली आवराआवर करत पाण्याच्या पिशव्या भरून सालोट्याकडे निघालो. पुन्हा एकदा दरवाज्यांची मालिका. 

मध्ये गुहांची साखळी काही कोरड्या तर काहीत पाणी. एका दरवाज्यातून सालोट्याचं रूप अफलातून दिसतं. शेवटचा दरवाजा पार केला. हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. तीव्र पायऱ्या उतरत खिंडीत पोहोचलो. थोडं विसावलो. भूक लाडू मटकावले. साल्हेरहून आल्यावर समोरची वाट वाघांब्यात जाते आणि उजवीकडे वर जाणारी सालोट्याकडे. वाट अतिशय निमुळती आहे. थोडी घसरड आहे. बाजूला खोल दरी. तोल सांभाळावा लागतो. पुढे डावीकडे खडी चढाई केल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या. पहिला दरवाजा. भलाथोरला दगड खाली येऊन दरवाजा बंद झालाय. त्याला पार करत आत प्रवेश केला. थोड्या अंतरावर दुसरा दरवाजा.

 याच्या कमानीवर पहारेकऱ्यांसाठी जागा केलेय. येथेही गुहांची माळ आहे. तिसऱ्या दरवाजातून थेट गडावर पोहोचतो. अजूनही माथ्याची चढाई होतीचं पायवाट सोडून दुसऱ्या वाटेने निघालो. वाट नव्हतीचं ती पूर्ण घसारा. प्रणव आणि मी पुढे होतो. पाय ठेवला कि पायाखालची माती सरकायची. सुकलेली कारवी होती पण ती सरळ हातात यायची. पायातल्या अँक्शन वर व हातातल़्या काठीवर भरवसा होता. पाय व काठी रोवत मार्ग काढत होतो. शेवटी पोहोचलो एकदाचे. वर पहाण्याजोग काहीच नाही. समोरचं निश्चल उभा साल्हेर गगनाच चुम्बन घेतो असे वाटते. त्यावरील परशुराम मंदीर, खालचा बागलाण परिसर मात्र लक्ष वेधून घेतो. उतरण्यास प्रारंभ केला. मोठाल्या पायऱ्या चिंचोळी वाट, खालची खोल दरी पाहून धडकी भरत होती. खाली उतरत वाघांब्याच्या वाटेला लागलो. वाटेत लागणाऱ्या सोंडेवरून साल्हेर सालोट्याला डोळ्यात भरून घेतलं व पुढे निघालो. तोच डाव्या गुडघ्याने  कुरकुरण्यास सुरवात केली. हळू हळू काठीचा आधार घेत वाघांब्यात पोहोचलो. बागलाण मोहीम फत्ते झाली. तीनही गड मनात कोरले गेले ते वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे आणि खडकात कोरलेल्या पायऱ्यांमुळे. मुल्हेर मोरा हरगड पहायचे राहीले. पुन्हा केव्हातरी.

साल्हेर 


सालोटा आणि साल्हेर 

No comments:

Post a Comment