Wednesday, November 22, 2017

अशाच एका आडवाटेवर (भैरवगड ते रतनगड)


शिरपुंजे तून भैरवगड 





अकोले तालुक्यातल्ये गड किल्ले परिसर केव्हाही मनास भावतात. येथील वाटा पायदळी तुडवण्यास पाय नेहमीच उत्सुक असतात. अशीच संधी मिळाली महादेवमुळे. भैरवगड ते रतनगड. ऑफबीट असा.  महाराष्ट्रात पाच भैरवगड आहेत. त्यातला हा शिरपुंजेचा. 

शुक्रवारी रात्री खचाखच भरलेल्या कसारा लोकलमध्ये बँग सावरत चढलो. ट्रेक सुरू झाल्याची जाणीव झाली. नशीब चांगलं थोड्याच वेळात बसायला जागा मिळाली आसनगाव पार केल्यानंतर तर पूर्ण सीट मालकीची झाली. मग काय दिलं ताणून कसारा येईपर्यंत. पुढचा प्रवास जीपचा शिरपुंजे पर्यंत. या रस्त्यांवर जीपा फॉर्म्युला वन सारख्या धावतात. रात्री मारुतीरायाच्या मंदिरात मुक्काम ठोकला. थंडी जाणवत होती. सकाळी लवकर उठत भैरवगडाकडे कूच केलं. वरून भैरवगड खुणावत होता. वर भैरोबा हे गावकऱ्यांचे देवस्थान आहे. त्यामुळे हा राजमार्ग आहे. विजेचे खांब असलेला रस्ता धरून चालत रहायचं. वेडीवाकडी वळणं घेत वाट धावत राहते. मध्ये कातळात खोदलेल्या पायऱ्या मार्ग सुकर करतात. काही वेळातच खिंडीत पोहोचलो. येथे सुरक्षेकरता  रेलिंग लावले आहेत. डाव्या बाजूची खडी चढण थेट गडावर घेऊन जाते. येथे शेवटच्या टप्प्यात ऊंच पायऱ्या आहेत. वर गेल्यावर डाव्या हाताला थंडगार पाण्यानं  तृष्णा भागवणारं कातळात खोदलेलं टाकं लागत. लगेचच पुढे उजव्या हातास टाकेसमुह आहे. भैरोबाच दर्शन घेण्यास पुढे निघावं. वाटेत सुंदर कोरलेल्या वीरगळी आहेत. थोडंस खाली उतरत खडकात खोदलेल्या गुहेत भैरोबाची शेंदूर फासलेली सुबक मूर्ती आढळते. या गुहेला चिकटून असलेल्या गुहेत सहा सात माणसं आरामात राहू शकतात. आता वेळ होती सभोवताल पहाण्याची. भला मोठा पसरलेला हरिश्चंद्रगड, रोहिदास, कलाडगड , नाफ्त्याचे डोंगर. पायऱ्या उतरून खिंडीत आलो. पहिला सोपा टप्पा पार झाला होता. 

पिण्याच्या पाण्याचं  टाक 

टाके समुह


वीरगळ 

गुहेतील भैरोबा 

                                                             



आता मात्र घनचक्करकडे जाण्याची वाट थोडी बिकट होती. पाऊल जेमतेम मावेल अशी वाट. पूर्ण ट्रँवर्स. उजवीकडे दरी. आस्ते कदम पाठीवरच ओझं सांभाळत तोल सावरत मातीशी , घसरणाऱ्या दगडांशी  झुंजत वर चढत रहावे. छोटा नील या वाटेवरही मोठ्या आत्मविश्वासाने चालत होता. सकाळी वाटलं होतं हा चालेल कि नाही? पण आता कळलं बंदे में दम है. या परिसरात गारगोटीचे विविध आकाराचे रंगाचे दगड आढळतात. नील ट्रेकची आठवण म्हणून ते गोळा करत होता. पुण्यात जाऊन मित्रांना देणार होता म्हणे. कौतुक वाटलं. या वाटेवर उंचावर गाईंसाठी शाकारलेल्या गुहा आहेत. गुरं अधिक असल्याने पिसवा थोड्याफार आहेत त्यामुळे अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावे. एक उतरण व चढण पार करत घनचक्करच्या पठारावर आलो. सर्वांचे इरादे बुलंद असल्याने पटपट चालत होते. घनचक्कर नावाप्रमाणेच आहे. वेगवेगळ्या गावातून अनेक वाटा येथे मिळतात. चुकण्याची संधी अधिक. भली मोठी खडी चढण जोमाने चढत माथ्यावर आलो. येथे पहाण्यासारखे अवशेष काहीच नाहीत. सह्याद्रीच अवलोकन मात्र करायचं. बाजूलाच पाबरगड डोकावत होता. गवळदेव शिखर खूलून दिसत होतं. खाली भंडारदरा. या टप्यावर थोडं विसावलो.
छोटा ट्रेकर नील 



गवळदेवाकडे लक्ष ठेवत तीव्र उताराने झपाट्याने खाली उतरत होतो. समोरचा हिरवागार परिसर मोहिनी घालत होता. तासा दिड तासात पाण्याचा झरा पाहून शिदोरी सोडली. थोडा आराम झाल्यावर बँगा पुन्हा पाठीवर गेल्या व गवळदेवाच्या वाटेवर निघालो. दुपारी उन चांगलच तापलं होतं. कडेकडेने उतरत होतो. थोड्याच वेळात एक चढण लागली. घनचक्कर डाव्या हातास ठेवत मार्गक्रमण होत होतं. वर ताडाची झाडं दिसू लागली. हि खूण गवळदेव जवळ आल्याची. एक बऱ्यापैकी चढ पार करत गवळदेव पायथ्याशी आलो. पठारावरुन  थोड़ उजव्या बाजूला खाली एक गुहा आहे. थकले भागले जीव गुहेत विसावले. या गुहेत पंधरा वीस जण आरामात मावतात. फक्त डोकं सांभाळाव लागतं एवढचं. साडेचारच्या सुमारास चहाच्या  घुटक्यांनी ताजतवानं केलं तंबू उभारले गेले. व सूर्यास्त पहाण्यासाठी गवळदेवाकडे धूम ठोकली. चढण तशी बरीच खडी आहे. पाय सावरत नेटाने चढावं लागतं. शेवटची सोपी कातळचढाई करत महाराष्ट्रातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर पाऊल ठेवलं. पांढऱ्याशुभ्र गवळदेवाचं दर्शन झालं. पुढे एका कड्यावर नजारा पाहण्यासाठी मांड्या ठोकून बसलो.  चहु अंगाला पटलावर विस्तीर्ण सह्याद्री दिसत होता. सूर्यास्ताला अवकाश होता. एखाद्या डोंगरावर, समुद्रकिनारी,नदीकाठी  गेल्यावर सूर्यास्त पहाण्याचा छंदच जडलाय जणू. आजूबाजूला नजर भिरभिरत होती ती अजस्र बाहू पसरलेला एखाद्या योग्या प्रमाणे भासणारा आजा पर्वत,करंधा,कात्राबाई ,चिकटून असलेला अग्निबाण सुळका, रतनगड व दिमाखदार खुट्टा व अंधुक दिसणारे अधिराज्य गाजवणारं त्रिकूट अलंग मदन कुलंग आणि आई कळसुबाईवर. खाली शांत स्तब्ध पहुडलेला भंडारदरा जलाशय. सारंच नजरेत भरणारं. हळूहळू लाल छटा या सगळ्यावर पसरू लागली. नजर स्थिरावली आजोबाच्या मागे निघालेल्या भास्कराकडे. हवेत गारठा वाढला. निशेची चाहूल लागली. दिवस बुडू लागला. एक अप्रतिम सूर्यास्त. दिवसाची सुरेख सांगता. 




वेळ न दवडता धडाधड खाली उतरलो. झऱ्यापाशी पाणी भरलं. व मुक्कामाच्या ठिकाणी आलो. जेवण होईस्तोवर गप्पा रंगल्या. एव्हाना गाई चरून परतल्या होत्या. चांदण्याचा मंद प्रकाश पठारावर सांडत  होता. बारामाते मामीनी केलेल्या चिकन रश्यावर  ताव मारत तंबूत आडवे झालो. चटकन झोप लागली. सकाळी लवकर उठत तयारी केली. आजची चालही बऱ्यापैकी होती त्यामुळे लवकर निघण भाग होतं. मध्ये पाणीसाठा नसल्याने पाणपिशव्या भरून घेतल्या. निघतानाच नुकत्याचं वर आलेल्या भास्कराने दर्शन दिलं. कोवळ्या उन्हात हरिश्चंद्रगड,रोहिदास, तारामती चमचमत होते. गवळदेवाकडे शेवटचं पहात मुड्याकडे कूच केलं. आता मुड्याच्या डोंगरावरून कात्राबाई गाठायचं होतं. आजूबाजूला सह्यकडे, शिखरं,सुळके व एका बाजूला भंडारदरा जलाशय. त्यामुळे चालण्याचा थकवा जाणवत नव्हता. पायगाडी पुढे सरकत होती. काही वेळातच वाकडी सुळका मान वर काढताना दिसला
अनामिक गुराख्याने रचलेली लगोरी व उगवता भास्कर एकाच फ्रेम मध्ये 



बारामते मामा 

वाकडी सुळका व कुमशेत चा कोंबडा 

मागे कुमशेतचा कोंबडा व खाली पसरलेलं कुमशेत गाव. समोरच कात्राबाई व खेटून असलेला अग्निबाण. आता चढाई होती कात्राची. तब्बल पंचेचाळीस मिनिटांची थकवणारी. कात्रा पठाराचा आवाका बऱ्यापैकी मोठा आहे. येथून हा पाबरगड, तो हरिश्चंद्र,वाकडी सुळका,कुमशेतचा कोंबडा ,करंधा,आजोबा अशी पुन्हा उजळणी झाली. येथून रतनगड व खुट्टा अगदीच जवळ दिसतात. मध्ये फक्त भयाण दरी. एक दोन उड्यात पोचता येईल का?(मनातला विचार फ़क्त )

कात्रा उतरत कात्राच्या जंगलात निघालो रतनच्या दिशेत. सुरूवातीस दगडधोंडे खाच खळग्यांची वाट. या वाटेवर आधी येऊन गेल्यामुळे बरीचशी ओळखीची वाटत होती. दिशादर्शक बाणही आहेत फक्त ते रतन ते कात्रा खिंड असे आहेत आमचा प्रवास उलट होता. घनदाट झाडी,मोठाले वृक्ष यामुळे थकवा व उकाडा जाणवत नव्हता. झाडीतील सरसर लक्ष वेधून घेत होती. कारण येथे बिबटे मोठ्या प्रमाणात आढळतात. कात्राच्या जंगलात एकाठिकाणी पाणी साठा आहे. मजल दरमजल करत वाट कापत होतो. खुट्टा नजरेत येऊ लागला. रतनच्या चौफुलीकडे एकदाचे पोहोचलो. लिंबू सरबत पित क्षीण घालवला व सज्ज झालो रतन चढाईस. शिड्या पार करत माथ्यावर पोचलो. कात्राचा भव्य अवतार नजरेत भरून घेतला.


रतनगड खुट्टा 

त्र्यंबक दरवाजाकडे निघालो. साम्रदहून मामा आमच्यासाठी शिदोरी घेऊन पोचले होते.  पोटपूजा झाली. जास्त वेळ न काढता त्र्यंबकच्या अवाढव्य पायऱ्या काळजीपूर्वक उतरू लागलो. उजव्या हाताची वाट धरली. दिमाखदार खुट्टा जवळ येत होता. सोेंडेवरून चालत होतो. खुट्याजवळ पोहोचलो. खाली बाण सुळक्याने सुरेख दर्शन दिलं. मागच्या करवली घाटाची आठवण झाली. डाव्या बाजूची शिड्या असलेली वाट धरली. दगडधोंड्यांनी भरलेली वाट छोट्या छोट्या शिड्या असलेली काळजीपूर्वक उतरावी.पुढे जंगलवाट सुरू होते.जसजस साम्रद जवळ येत तोच समोर अलंग मदन कुलंग नजरेस पडतात त्यांच भंडारदरा जलाशयात पडणारं प्रतिबिंब निव्वळ दिलखेचक. लाजवाब. डाव्या हाताला दिसणारा शिपनूरचा डोंगर. हे सगळ डोळ्यात साठवतच उतराव. साम्रदमध्ये पोचताच या भल्या मोठ्या ट्रेकची सांगता झाली. पण मन मात्र तिथेच होतं डोंगरांच्या कुशीत. भटकंतीच्या पोतडीत आणखी एक आडवाट अलगद जाऊन पडली. त्याबद्दल महादेवचे खूप आभार.


काही नोंदी: 

१)पल्ला खुप मोठा असल्याने व् मध्ये  गावांशी संपर्क नसल्याने मानसिक व शारीरिक तयारी असावी. 
२)ऑक्टोबर ते जानेवारी सर्वोत्तम. शक्यतो पावसात टाळावा. धुक्यामुळे चुकण्याचा संभव. 
३)जंगलवाट असल्याने सोबत वाटाड्या असणं सोयीस्कर. 
३)मधे फार ठिकाणी पाणी नसल्याने ४-५ ली पाणीसाठा ठेवावा. 
४)जेवणाची सोय गवळदेव पायथ्याला बारामते कुटुंबाकडे होउ शकते. पण तेही पाणीसाठा संपल्यावर गाई घेऊन कोकणात उतरतात. 


बाण सुळका 


4 comments:

  1. अप्रतिम वर्णन मंदार👍👌, सोबतच ट्रेक केल्याचा भास झाला, हा वेगळा वाटेचा ट्रेक नक्की करावासा वाटतोय

    ReplyDelete