Wednesday, January 18, 2017

अनवट वाटांवर (कुंजरगड ,आजा डोंगर,कात्राबाई डोंगर)

काही वाटा या अनवट असतात. या वाटांवर भटक्यांची पावलं पडली कि यादेखील सुखाऊन जातात. अशाचं अनवट वाटांवर जाण्याचा मनसुबा केला. प्रसादच नियोजन होत. एकदम कड़क प्लान. गडकिल्ल्याची श्रीमंती लाभलेल्या नगर जिल्ह्यात भटकंती. सगळे भिडू पुणेकर असल्याने पूण्यास जावे लागणार होते. सह्याद्रीच्या भेटीसाठी एव्हडी मेहनत करण्यास तयार  झालो सह्याद्रीच्या दर्शनासाठी सह्याद्री एक्सप्रेसने पूण्यास कूच केलं. नगरचे गड किल्ले पालथे घालायचे होते. रात्री नारायणगावला मस्त थंडीत मसाला दुधाचा आस्वाद घेत पुढे निघालो. सुमारे चारच्या सुमारास विहीरगावात डेरेदाखल झालो. बसमधून उतरताच नगरच्या शरीर गोठवणाऱ्या थंडीने आमचं स्वागत केलं. पारा चांगलाच खाली गेला होता. थोड्याच वेळात सारे स्लिपींग बँगमध्ये गडप झाले. थोडीफार झोप होते न होते तोच सकाळचे सहा वाजले व कुंजरगडाकडे मार्गक्रमण सुरू झालं. हा गड हत्तीसारखा दिसतो म्हणून कुंजरगड. सुरूवातीस सोपी वाटणारी वाट खडी होत होती. सकाळचं प्रसन्न असं वातावरण असल्यामुळे तेवढी दमछाक होत नव्हती. वर एक मंदिर लागतं तिथे काळोबा व मारूतीच्या मूर्तीच धावतं दर्शन घेत पुढे कूच केलं. ट्रँव्हर्स पार करत एक छोटा चढाईचा टप्पा ओलांडत भुयारापाशी आलो. हे जवळपास ३० फूटांचे आरपार भुयार आहे.हे भुयार या गडाचं मुख्य आकर्षण आहे.



आत जाताना स्वतःला दुमडत कसरत करत जाव लागतं. काळोख असल्याने टॉर्च लागते.भुयाराच्या दुसऱ्या बाजूला पोहोचल्यावर हायस वाटत समोरच निसर्गदृश पाहून शरीर दुमडल्याच कसरत केल्याच चीज झाल्यासारख वाटत. बाहेर पडल्यावर सगळे खाणकामगारांसारखे भासत होते. गडाच्या माथ्यावर कापरं भरणारा सुस्साट वारा सुटला होता. गडावर बाकी पाहण्याजोगं काहीचं नाही. थोड्याच वेळात एक कातळटप्पा सावधपणे उतरत परत गावात जाण्यास मोर्चा वळवला. काही ठिकाणी तीव्र उतार आहे जपून उतरावं लागतं. आजोबा सर करण्यासाठी कुमशेतला गेलो जवळपास दीड तासांचा प्रवास आहे. मध्येच शिरपूंजेच्या भैरवगडाच दर्शन झालं. पोटपूजा करत सीतेचं कुंड जिथे रात्रीच्या मुक्कामाची जागा तिथे पोहोचलो. वर पाहीले तर भला थोरला बलदंड आज्या डोंगर जणू काही आव्हानचं देत होता. बाजूलाच करंडा खुणावत होता. उशीर झाल्याने चढून कँप साईटला परतणे शक्य नव्हतं.म्हणून प्रसादने आजोबा दुसऱ्या दिवशी लवकर चढण्याचा निर्णय घेतला. जवळच असलेलं गुयेरीच दार पाहून आलो. सीतेच्या कुंडातील थंडगार पाणी पित तृष्णा भागवली. सह्याद्रीत अशी अनेक कुंडं भटक्यांची तहान भागवतात. सांजवेळेच थोड़ गार अस वातावरण. थोडं विसावलो. मोकळा वेळ मिळाला.गप्पाचा फड़ रंगला. ब्रम्हा सर आणि डांगे सरांच्या सुरावंटीनी कानांना अनोखी मेजवानी मिळाली. जय जय महाराष्ट्र माझा काय ताकद आहे गाण्यात शरीरात एक वेगळाच उत्साह संचारतो. महाराज अणि त्यांचे मावळे त्यांच्या पराक्रमाच्या आठवणी नक्कीच जाग्या  होतात.सोबत असलेल्या वाटाड्यानी मोठ्या मेहनतीने केलेल्या भोजनाचा आस्वाद घेत तंबूची वाट धरली. थकल्यामुळे निद्रादेवीची आराधना करण्याची गरज भासली नाही. चटकन झोप लागली. पहाटे स्लिपींग बँगमधून बाहेर पडावसं वाटतचं नव्हतं. पण आजाच्या भेटीसाठी उठणं भाग होतं. भल्या पहाटे चढाईस सुरूवात केली. टैंगोची थोड़ी तब्बेत बिघडल्याने तो तंबूतच थांबला. बाकि टैंगो असला कि वातावरण एकदम दणाणून सोडतो. थोड़ पठारावर चालत चढ़ण सुरु झाली. पावसात भूसलक्खन होऊन मातीचा ढिगारा खाली आला होता. मातीतून वाट काढत पावलं पुढे पडत होती. दगड धोंड्यांनी भरलेली वाट. ही वाट पाहून फारशी वापरात असावी असं वाटत नव्हतं. मध्येच छोटे कातळटप्पे पार करत होतो. मध्येच हेड टॉर्च ने दगा दिला. निलेशने शक्कल लढवत टॉर्च जॅकेटच्या टोपीत अडकवली. हात मोकळे झाले त्यामुळे चढ़ण बऱ्यापैकी सुकर झालं भला थोरला आजोबा जणू काही परीक्षाचं पहात होता. एक मोठा ट्रँव्हर्स मारत वर आलो. अजूनही उजाडलं नव्हतं. त्यामुळे क्षणभर विश्रांती घेतली. अजून बरीच चढाई होती. कारवीच्या बनातली खडी चढण होती. चंद्र साक्षीला होताच. नुकतीच पूनव झाल्यामुळे तो पुर्णकृती गोळा लोभस वाटत होता. एक एक टप्पा पार करत आजोबाच्या माथ्यावर पोहोचलो एकदाचे. वर काय माहौल होता चहूबाजूला नजर फिरवली तर सह्याद्रीच्या कुटुंबातील अनेक गडकिल्ले,सुळके हे दृष्य निव्वळ थक्क करणारं होतं. 
अलंग मदन कुलंग, रतनगड, नवरा नवरी,नाफ्ता,सांधण दरी, घनचक्कर ,मध्येच दूरवर धुक्यातून कळसुबाई शिखर आपलं अस्तित्व दाखवत होतं. दोन डोळ्यात हे सारं भरून घेत तिसऱ्या डोळ्याने क्लिकक्लिकाट चालू झाला.मन भरलं. उतरण्यास प्रारंभ केला. झपाट्याने खाली उतरत होतो. बऱ्याचं ठिकाणी घसरण असल्याने काळजीपूर्वक उतराव लागतं नाहीतर दाणकन पार्श्वभाग आपटण्याची शक्यता. आधारास कारवी होतीच. थोड्याच वेळात खाली पोहोचलो. गरमागरम पोहे व फोडणीचा भात हाणत कुमशेत कडे निघालो. पुढचं लक्ष्य  होतं कात्राबाई डोंगर. चढाईस सुरूवात केली तेव्हा नारायणराव माथ्यावर आले होते. पण उकाडा जाणवत नव्हता . समोरच अजस्त्र असा कात्राचा डोंगर आमची प्रतीक्षा करत होता .  ही डोंगरवाट आपलसं करीत होती. या डोंगरवाटांवर  मनसोक्त बागडण्यासाठी तर भटके एवढया दुरवर येतात. काही ठिकाणी वाट चिंचोळी होती. कात्राची घनदाट जंगलवाट मन सुखावून टाकत होती. मजल दरमजल करत कात्राची वाट कापत होतो. कात्राच्या वाटेत मैलाचे दगड आहेत. असं म्हणतात कि गोरा साहेब भंडारदऱ्याहून रतनगडवर कात्राच्या खिंडीतून घोड्यावरून जायचा. वाटेत कात्राबाईचं मंदिर लागतं. तिथे नतमस्तक होत टॉपवर चढाईस सुरूवात केली. बाजूला गगनाला स्पर्श करणारे बेलाग डोंगर. पुढची वाट निमुळती आहे. तोल सांभाळावा लागतो. खाली नजर टाकली कि भंडारदऱ्याचा जलसंचय लक्ष वेधतो. एका बऱ्यापैकी मोठ्या चढाईनंतर कात्राचा टॉप दिसू लागतो. मोठच्या मोठं पसरलेलं विस्तीर्ण पठार. रतनगडाची भेट घेण्यासाठी माथ्याच्या कडेवर आलो. सह्याद्रीतलं हे रत्न समोरचं उभं ठाकलं होतं. खालची दरी छातीत धडकी भरवत होती. रतनगडचा खुट्टा दिमाखात उभा होता. थोड्या ढगाळ वातावरणामुळे बाकीचे गड लपून बसले होते. कात्राचा एक आगळा अनुभव घेत खाली उतरलो. वाटेत पिठलं भात खाऊन तृप्त होत गावची वाट धरली. एक आगळी मोहीम सुखरूपपणे पार पडली. बस तयार होतीचं. वाटाड्यांना निरोप दिला. बस भरधाव परतीच्या प्रवासास निघाली. सवंगड्यांना पुढच्या भटकंतीसाठी भेटण्याचं आश्वासन देत निरोप घेतला व मुंबईत परतण्यास आळेफाट्याला उतरलो ते ट्रेकच्या सुखद आठवणी सोबत घेऊनच.




1 comment:

  1. नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन.... भावा ऑफिसला सुट्टी नाही म्हणून ईच्छा असून ट्रेक ला येता येत नाही आणि सुट्टी मिळाली तर रेंज ट्रेक,फूल वसूल...भटकत रहा,लिहत रहा...

    ReplyDelete