Tuesday, September 26, 2017

नाणेघाट जीवधन भोरांड्याचं दार

जीवधन व खडापारसी सुळका 



नवीन सह्यभटकी मैत्रीण शिल्पाचा मेसेज आला आम्ही नाणेघाट भोरांड्याच दार प्लँन करतोय . ऑफबीट म्हणून लगेच हो म्हटलं. नऊ जण  तयार झाले.  रात्री १०:३० ला कल्याण बस स्थानकात पोहचलो. नगर गाडी नादुरूस्त झाल्याने उशिरा सुटणार होती. गाडीचे पाशिंजर बोंबाबोब करत होते. मुरबाड गाडी लागली होती. तिथपर्यंत तरी बसायला मिळेल मुरबाडला पुढची यस्टी पकडू या उद्देशाने गाडीत बसलो. तोच ड्रायवर दादांनी पुकारल  "टोकावड्याला जायचय ना पाथर्डीची यस्टी लागतेय बाजूला." बँगा सांभाळत आमची जत्रा निघाली पाथर्डी बसकडे. जाईपर्यंत गाडी भरली. काहींना जागा मिळाल्या. आम्ही पेपर टाकत खालीच बसकण मारली. 

 बसल्या बसल्या डुलकी येऊ लागली. तोच नाणेघाट फाटा आला. रात्रीचा दिड वाजला होता. यस्टी निघून जाताच सारं सामसूम झाल. मिट्ट काळोख. टॉर्चचाच प्रकाश काय तो. नाणेघाटच्या दिशेने निघालो. किर्र झाडी. या झाडीत एखादा बिबट्या तर दबा धरून बसला नसेल ना अशी शंका मनाला चाटून गेली. या सातवाहनकालीन प्राचीन  मार्गावर  भरभर पावलं पडत होती. मध्येच दम लागणारे चढाव होते. पठारावर मध्ये मध्ये विसावत रमत गमत चाललो होतो. पुढे वेडीवाकडी वळणं. या वाटेवरील दगड रचल्यासारखे वाटत होते. कुणी रचले माहीत नाही. सुमारे दोन अडिच तासांत नाणेघाट गुहेपाशी पोहोचलो. एव्हाना झोप यायला लागली होती. झपझप सुभाष दादांच्या घरी पोहोचलो. कुत्र्यांनी दूरूनच जोरदार स्वागत केलं. पाठ टेकण्यास अंगणात आलो तोच दादांनी नवीन बांधलेल्या इमारतीत नेलं. आत पहातो तर मस्त हॉटेलसारखी खोली गाद्या वगैरे. स्लिपींग बँग न आणल्यामुळे एखादी चादर मिळाली तरी बर हा विचार आधी मनात होता. इथे तर गादीपण. जमिनीचं अंथरूण व मोकळ्या आभाळाच पांघरूण यात समाधान मानणाऱ्या भटक्यांचं एवढं सार मिळणं म्हणजे अहम भाग्यचं.  सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती. त्यामुळे मऊशार गादीवर मस्त ताणून दिली. सुरूवातीला उकाडा जाणवत होता. पण अचानक गारठा वाढला चादर शोधावी लागली. सकाळीच बाहेर आलो. 
नानाचा अंगठा 
 समोरच बेलाग,रांगडा जीवधन दंड थोपटून उभा होता. बाजूलाच आकाशात  झेपावणारा  ४००-४५० फूटांचा खडा पारसी (वानरलिंगी) सुळका आव्हान देत होता. मोकळा वेळ बराच होता. पठारावर गेलो. संपूर्ण हिरवागार गालिचा पसरला होता. पिवळ्या फुलांनी रंग भरले होते. भास्कराची कोवळी किरण पसरू लागली होती. दूरवर नवरानवरीचे सुळके दिसत होते. नानाचा अंगठा खुणावत होता. नाष्टा उरकला व जीवधन कडे निघालो. आमच्या सोबत पिंपरीचे चौघेजण सामील झाले. जीवधनची वाट सोडून थोड खाली आलो. समोरील दृश्य पाहून स्तब्ध झालो. जीवधन बाजूला खडापारसी,दूरवर  पसरलेला धाकोबा, आंबोली डोणीच दार, सारी शिखर उन्हात चमचमत होती.  रेंगाळणारे  पुंजके ,खाली पसरलेलं कोकण. हिरवाई पांघरलेलं सह्यद्रिच लोभसवाणं रूप  डोळ्यांचं पारण फेडणारं होत . याचसाठी तर भटके आपली पावलं इथं वळवतात. झालेली पायपीट क्षणार्धात विसरतात.
आता मिशन जीवधन सुरू झालं. जंगलातली आडवाट. खडी चढण. रोहिदास दादांच्यामागं चालत होतो. थोड्याच वेळात कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी आलो. नानाचा अंगठा व नाणेघाट खूलून दिसत होते. पायऱ्या पावसामुळे निसरड्या झाल्या होत्या. जपून पावलं टाकावी लागत होती. जस जस वर जाऊ तसा मामला कठिणच होऊ लागला. पाय घसरत होते. पाण्याने ओथंबलेल्या पायऱ्यांवरून पुढे सरकत होतो. 


जीवधन चढाई 

बऱ्याच पायऱ्या इंग्रजांच्या तोफांनी उध्वस्त केल्यात. समोरच कातळटप्पा उभा राहीला अदमासे १५ फूटांचा. पावसाच्या पाण्यामुळे निसरडा व कठिण. दोराच्या सहाय्याने आस्ते कदम वर आलो. कातळात कोरलेल्या दरवाजात आलो. यावर चंद्र सूर्य यांच्या प्रतिमा कोरल्यात. दरवाज्यातील भले मोठे दगड पाहून पूर्वी  चिणून टाकलेला दरवाजा काही वर्षांपूर्वी मोकळा केल्यासारखा वाटतो. टेकडीवर पोचलो. येथून नाणे घाटच विस्तीर्ण पठार दिसतं. या गडावरूनच  नाणे घाटची रखवाली केली  जायची.  चावंड हड़सर शिवनेरी यांच  दुरून दर्शन घेतलं.  दुसऱ्या वाटेने खाली उतरायचं ठरलं. शिल्पामुळे नव्या वाटा उमगत होत्या. माझी वॉकिंग स्टिक खालीच राहिली. पण पिंपरीच्या एका पठ्ठ्यानं दोराशिवाय खाली उतरत आणली देखील. गडफेरी सुरू झाली. गडावर फुरशी जास्त असल्याने काळजी घ्यावी लागते. वर चढत देवीच्या मूर्तीपाशी पोहोचलो. गवत वाढल्याने ही सुबक रेखीव मूर्ती झाकली गेली होती. 
जीवधन वरील देवीची मूर्ती 


लेणी वजा वास्तु प्रवेशद्वार 

मूर्तीचं दर्शन घेत आम्ही एका लेणेवजा वास्तूकडे मोर्चा वळवला. प्रवेशद्वारात गजांतलक्ष्मीच कोरलेलं शिल्प. आत गूढ काळोख. टॉर्च घेऊनच आत शिरावं लागतं. आत पाच दालनं. वर कमलपुष्प कोरली आहेत. ही प्राचीन वास्तु अगम्य भासते.  नंतरच्या काळात  याचा वापर धान्य ठेवण्यासाठी केला जात होता . कल्याण दरवाजा , ही लेणीवजा वास्तू कोरीवकाम थेट इतिहासकालीन सातवाहन काळात घेऊन जातात.  उध्वस्त जुन्नर दरवाजापाशी पोहोचलो. बाजूलाच पाण्याच्या टाक्यांची माळ आहे. पाणी पिण्यायोग्य मात्र नाही. पायऱ्या  उतरण्यास सुरूवात केली. पुन्हा एकदा शेवाळामुळे निसरडा उतार. जपूनच उतराव लागत. मध्ये दोन शिड्या लावल्या आहेत. ही उतरणीची वाट जास्त वापरात नसल्यानं फारच बिकट आहे.

जुन्नर दरवाजा निसरडी वाट 


नवरा नवरी सुळके वऱ्हाड

खाली घाटघरला उतरलो. पठारावरून नाणेघाटला निघालो. वाटेत नवरा नवरी सुळके,वऱ्हाड, अनेक डोंगररांगा साथीला होत्याच. सुभाष दादांच्या घरी पोहचेपर्यंत थकून गेलो होतो. थोडी पोटपूजा करत भोरांड्याकडे वळलो. जाताना जीवधन उजव्या हातास ठेवत सरळ जाव. पुढे शेताच्या कडेने डाव्या बाजूस रस्त्यावर येत पुढे चाल ठेवावी. थोड्याच वेळात एक चौथरा दिसू लागला बाजूलाच भोरांड्याचं दार. 
भोरंडयाच दार 
व्ही आकाराच्या घळीतून सारं कोकण दिसत होतं. खाली उतरताना दाऱ्या ,त्रिगुणधाराची आठवण झाली. खडकाळ,ओबडधोबड वाट.तीव्र उतार. पायांवर बऱ्यापैकी ताण येतो. इथे फारशी वहीवाट नाही. एका ओढ्यापाशी पोहोचलो. इथूनच एक वाट खाली जाते पण झाडीमुळे ओळखू येत नव्हती. अखेर संजय सरांनी ओढ्यापलीकडील वाट ताडली. या वाटेने निघालो. कडेने चालत बरच अंतर कापलं. थोड्याच वेळात विद्युतीकरणाचं काम चालू होतं तिथे पोहोचलो. भला मोठा मातीचा रस्ताही दिसला. पुढे निघालो. मोरोशीच्या भैरवगडानं दर्शन दिलं. खात्री पटली कि हीच सडक खाली घेऊन जाणार. काही वेळातच गाड्यांचे आवाज कानी पडले. महामार्गाला लागलो. बोलावलेली जीप आली. जीपने टिटवाळ्याकडे प्रयाण केले. मध्ये मिसळ वर ताव मारत ट्रेकची सांगता केली.


                                                     "गत वैभव ते हरले सरले 
                                                      आज राहिल्या खुणा 
                                                         दे खिलार जोड़ी 
                                                            पुन्हा आणुनी 
                                                        फिरुन येईन पुन्हा "
                                                                             ---- ब्रम्हा पुजारी सर 












No comments:

Post a Comment