डोंगराच्या कुशीतल गांव |
जवळपास महिनाभर या ना त्या कारणाने सह्याद्रीची गाठ भेट झाली नव्हती. तोच प्रसादचा प्लान आला. कुडपन ते प्रतापगड. पाऊस सुरू झाल्यापासून भीमाची काठी मनात घर करून होतीच. पण योग येत नव्हता. पायलट ही चुकला होता. WTA च्या साथीने निघालो पोलादपूरच्या दिशेने. सुमारे तीन च्या सुमारास रायगडातील क्षेत्रपाळ गावात पोहोचलो. एका सुंदर अशा मंदिरात पाठ टेकली. सकाळी उठून मँगी पोटात ढकलत कुडपन कडे बसने प्रस्थान केले. वरून पाहीलं तर डोंगराच्या कुशीतलं क्षेत्रपाळ दिसत होतं. प्रमुख आकर्षण भीमाच्या काठीपाशी आलो. समोरच खोलवर झेपावणारा प्रपात रोरावत होता. जवळपास हजार फूट. मागे कोकणातले सुमार, महिपत डोकावत होते. डाव्या बाजूला भली थोरली भीमाची काठी लक्ष वेधून घेत होती. भीमाची काठी ती लहान थोडीच असणार. एकूणच वेड लावणारं दृश्य होत. याच्या थोडं पुढे जगबुडी चं पात्र. पावसात रौद्ररूप धारण करणारी आज मात्र शांत होती. पण नजारा निव्वळ थक्क करणारा होता. आजूबाजूला सह्यरांग ,धुकं, पांढरेशुभ्र कापसासारखे पुंजके. मध्येच सकाळची भेदणारी कोवळी सूर्यकिरणे. एकूणच सकाळचं प्रसन्न असं वातावरण. हे निसर्गाचं लेणं डोळ्यात आणि कँमेरात साठवत कुडपन मध्ये पोहोचलो.
सुमार महिपतची ची रांग |
आता पायपीट सुरू होणार होती. एक लोखंडी साकव ओलांडत पुढे निघालो. पावसाची काही चिन्ह दिसत नव्हती. रविवारची सुट्टी तोही साजरी करत असावा कदाचित. कोकणातून चढ असल्याने दमट वातावरणामुळे थकवा जाणवत होता. वर घाटात गार हवा मिळेल या आशेने मार्गक्रमण चालू होते. उजव्या हातास वळत एका टेपाडावर चढलो. एव्हाना खडी चढण सुरू झाली. श्वास भरभर वाढू लागला. सप्टेंबर सुरू झाल़्याने वाटेत बऱ्याच ठिकाणी बहुरंगी फुलं दर्शन देत होती. वर आता अवेरी खिंड नजरेच्या टप्प्यात येऊ लागली होती. बस थोडी देर म्हणत पावलांचा वेग वाढवला. थोड्या वेळातच खिंडीत पोहोचलो. वर टेपावर चढलो. एका वाऱ्याच्या झुळकेने थोडा का होईना तजेला मिळाला. चढून आलेला शिणवटा निघून गेला. तिथेच बसकण मारली सह्यद्रीचं अवलोकन करायला. समोरच प्रतापगड पसरला होता. आजूबाजूस गगन भेदणारी नाना शिखरं लक्ष वेधून घेत होती. रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर समांतर पठारं. अस्वलखिंड,उत्तुंग असा आर्थर सीट. दुसऱ्या बाजूस मंगळगड उर्फ कांगोरी उभा ठाकला होता. मागे वळून पाहीलं तर कोकणातील सुमार महिपत ची रांग नजरेस येत होती. खाली पसरलेली अथांग ,भयानक जावळी. हे सगळ पावसाने कृपा केल्याने स्वच्छ वातावरणामुळे अनुभवत होतो.सह्यद्रीचं अवलोकन करण्यात एक वेगळाच आनंद असतो. कुठे काय आहे हे मात्र ठाऊक पाहिजे. या बाबतीत सह्यद्रीतली शिखरं किल्ले ओळखण्यात प्रसाद निश्णात. सह्याद्रीत कुठेही उभं करा हा पठ्ठा आजूबाजूस काय काय आहे हे सांगणारचं. हा सभवताल मनात साठवत खाली उतरलो.
अवेरी खिंडीतून प्रतापगड |
पुढे पक्की सडक लागली. आता या सडकेवरूनच पाच सहा किमी ची तंगडतोड करायची होती. आडरानात फिरणाऱ्या भटक्यांना डांबरी रस्ता आला कि फार कंटाळा येतो. एव्हाना उनही वाढलं होतं. पण चालण भाग होतं. मध्येच मुंकुद सरांनी आणलेल्या काकड्यांचा फडशा पाडला. पायपीट करत पार गाव गाठले. हेच ते गाव जिथे अफझल खानाने डेरा टाकला होता. आम्ही भव्य ,सुंदर ,प्रशस्त अशा रामवारदायिनि मंदिरात प्रवेश केला. थोडं विसावलो.
या गावातून पार घाटाने प्रतापगड गाठता येतो. आम्हाला राजमार्गाने जायचं होतं त्यामुळे पुढे निघालो. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो. मुकुंद सरांनी वर्णन केलेलं ढिश्शूम काही मिळालं नाही त्यामुळे ढिश्शूम ची तहान पेप्सीवर भागवावी लागली. असो. सारे जेवणावर तूटून पडले. अजून गड चढायचा बाकी होता. तरीही चिंता नव्हती. खिरीवर सारेच ताव मारत होते. जेवण होताच थोडी विश्रांती घेत राजमार्ग चढण्यास सुरूवात केली. गच्च झाडी असलेला हा मार्ग तसा सोपा पण चढण होतीच. मजल दरमजल करत वर आलो. गडाचं दर्शन सुखावत होतं. वाहन तळापाशी आलो. वर चढत आत प्रवेश केला. गडाच्या तटांवरून हिंडताना गड न्याहाळताना आठवाव ते राजांच रूप त्यांचा प्रताप. त्यांच्या दूरदृष्टीला कोटी कोटी सलाम. इथल्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी, संरक्षणासाठी या डोंगराची निवड अफलातून. आजूबाजूस मंगळगड,चंद्रगड,मकरंद गड यासारखे गड. सह्याद्रीच्या अगणित रांगा . खाली नजर टाकताच दिसणारं जावळीचं भयानक निबीड खोरं. अस्वलाच्या केसातली उ सापडण एखादेवेळी शक्य पण या रानात माणूस सापडण कठीण. अगदी खरयं. अशा ठिकाणी गड उभारणे म्हणजे धाडसच. याच ठिकाणी महाराजांनी अफझल खानाला भेटीसाठी बोलावलं. खान रडतोंडी चढून वर आला. घाट चढताना त्यांचे नाकीनऊ आले. खानाचा डाव राजांनी आधीच ओळखला होता.फाजिल आत्मविश्वास असलेल्या खानानं संधी साधत वार केलाही. पण सावध व चाणाक्ष राजांनी तो हाणून पाडला व पुढच्याच क्षणी खान भुईवर कोसळला. जिवा महालानं सय्यद बंडाचा हात तलवारीपासून वेगळा केला. तोफा कडाडल्या. तोच मावळ्यांनी बेसावध असलेल्या खानाच्या फौजेला कापून काढलं. या सुवर्णक्षणाचा हा गड साक्षीदार आहे. आज खानाची कबर तिथे आहे. काही कारणास्तव ती वादग्रस्त झालेय. मध्यंतरी काही लोक त्यास नवस बोलत. आता स्वराज्यावर चाल करणारा,मंदिरं उध्वस्त करणारा,आया बायांची अब्रू लुटणारा कसा काय पावेल हे त्यांच तेच जाणोत. असो. हर एक बुरूज निरखत निघालो. आतील दरवाज्यात(जो पूर्वी मुख्य दरवाजाला जोड़त असे ) हॉटेलचं सांडपाणी पाहून मन खट्टू झालं. जिथे राजांनी पराक्रम घडवला तिथे आज ही अवस्था. गडावर पर्यटन सुविधा व्हाव्यात पण योग्य ती खबरदारी घेऊनच. वाटेत रान माजलं होतं. त्यामुळे बुरूज चोरवाटांचा अंदाज येत नव्हता. पर्यटक सहसा तटांवर फिरकत नाहीत. महाबळेश्वर जवळ आहे म्हणून फ्लाईंग व्हिजीट. बालेकिल्ल्यावर पोहोचलो.भव्य असा राजांचा अश्वारूढ पुतळा उभारलाय. हातात तळपती समशेर. तेजस्वी, तोच आवेश. त्यांना वंदन करून सदरेवर पोहोचलो. थंडगार ताक रिचवत भवानी मंदिर गाठलं. भवानीमातेच्या प्रसन्न देखण्या मूर्तीने मंत्रमुग्ध झालो. विशेष म्हणजे महाराजांनी त्यासाठी शिळा खास नेपाळहून मागवाली होती. मंदिराच्या आवारात छोट्या तोफा ठेवल्या आहेत. असा हा छोटासा पण मन तृप्त करणारा ट्रेक संपवत मुंबईकडे निघालो.
|
No comments:
Post a Comment