आषाढातलं कुंद वातावरण निवळून नुकताच श्रावण सुरू झालाय. आषाढात धोधो बरसणारा आता रिमझिम झालाय. हा बरसणारा घननिळा आणि रेशीमधारा अनुभवण्यासाठी सह्याद्रीच्या वाकड्या वाटेला जावं. सध्य वातावरण पाहता किल्ल्यांवर पिकनिक फेम गर्दी वाढलेय. ती टाळून काही ऑफबीट मिळत का ते पाहत होतो. तोच अरूण सरांचा वाघजाई सवाष्णी घाट प्लान पाहीला.जायचं ठरलं. तश्या पावसात घाटवाटा करणं म्हणजे जिकिरीचंच काम. पण निघालो. अरूण सर काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. सद्या दळणवळणाची साधनं बऱ्यापैकी झाल्याने या घाटवाटा काहीश्या पुसट होत चालल्या आहेत. आम्हा भटक्यांना मात्र या कोकणातून घाटमाथ्यावर चढणाऱ्या वा उतरणाऱ्या घाटवाटांचं कायम आकर्षण असतं.
रात्री दोनच्या सुमारास ठाण्याळ्यात पोहोचलो. एका घराच्या अंगणात पथारी पसरली. सुरूवातीला डासांनी त्रास दिला थोडा पण स्लिपींग बँग मध्ये शिरताच कमी झाला. ताणून दिली. मस्त झोप लागली. सहाच्या सुमारास जाग आली. कार्यक्रम उरकले. ठाणाळे हे रायगड मधलं छोटेखानी गावं. लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेलं. गावात शिवरायांचा तेजस्वी पुतळा आहे. चहा पोहे झाले. वाट दाखवणारे मामा तयार होतेच. सूरजने नेतृत्व स्विकारलं होतं. आमच्या बारा जणांच्या चमूने लेण्यांच्या दिशेत मार्गक्रमणास सुरूवात केली. एक टेपाड पार केलं तोच सईला रडूचं कोसळलं. का रडतेय हे कळत नव्हतं. सुरूवातीला वाटलं एकटी मुलगी असेल म्हणून कदाचित. पण तिने कारण सांगितल. "प्रत्येक ट्रेकला मी मागे रहाते दरवेळी होत असं" हे उत्तर ऐकल्यावर थोडं हसू आलं. पण आवरलं. सर्वांनी तिला धीर देत प्रोत्साहन दिलं. पुढील चढाईस प्रारंभ केला. वाट दाट जंगलातली होती. धबधब्याचा रोरावणारा आवाज वातावरण भेदत होता. प्रत्येक वळणावर नव्या नवरीसारखी नटलेली सृष्टी एकेक पदर उलगडत होती. दोन खळाळते ओढे पार केल्यानंतर चढणीला लागलो.
थोडं चालल्यावर डाव्या बाजूस कातळाच्या पोटात खोदलेल्या लेण्या दिसू लागल्या. वरून कोसळणारे धुवाधार प्रपात. वाट खाली उतरत डावीकडे वळलो. लेण्यांकडे जाणारी वाट थोडी बिकट होती. ती पार करत लेण्यांपाशी पोहोचलो. अप्रतिम कलाकुसर असलेली ही लेणी मोहीनी घालतात. दुसऱ्या शतकात खोदलेली लेणी बौद्धकालीन आहेत. एकंदर २१ विहार व दोन चैत्य आहेत. सारी लेणी नीट निरखली. घडवणाऱ्यांच्या हातांना सलाम ठोकला.
तिथे एक दोन तीन जणांचं टोळकं होतं. त्यांचा तीर्थप्राशनाचा कार्यक्रम रात्रीच आटपला होता. सूरज आणि आम्ही त्यांना चांगलच खडसावलं. थोडा नरमला तो. आमच्या धर्मात चालत असं काहीस म्हणत होता तो. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मालाच बदनाम करायला निघालाय हे ऐकून मन विषण्ण झालं व चीडही आली. त्याला पाजलेला उपदेशाचा डोस किती लागू पडेल हे त्याच तोच जाणे. असो. आम्ही पुढच्या टप्प्यावर निघालो. लेण़्यांवरून कोसळणारं पाणी शहारे आणत होतं. लेण्यांकडून सरळ पुढे वाट वाघजाईकडे जाते. वाट निसरडी होती. तोल सांभाळत निघालो. सपाटीचा रस्ता लागला. कडेला थोडं विसावलो. तळातला नजारा नजरबंदी करणारा होता. ठाणाळे गाव उन्हात न्हाल्यासारखं वाटत होतं. मंदिर व घरं चितारल्यासारखी वाटत होती. दूरवर सरसगड दिमाखात उभा होता. सुटलेला गार वारा शरीरास तजेला देत होता. उन पावसाचा खेळ चालू होता.
सरसगड व कोकण |
ठाणाळे गाव |
पुढे उजव्या बाजूला चढाईस सुरूवात केली. चालताना डाव्या बाजूस उंचावरून झेपावणारे धबधबे तर उजव्या हाताला हिरवंगार कोकण. कडेकडेने चालत होतो. आम्हाला उतरायचं होतं तो सवाष्णी घाट डोेंगराच्या पल्याड होता. त्याआधी वाघजाई मंदिर गाठायचं होतं. चढणीचे टप्पे पार करत पाऊस झेलत वाघजाईपाशी पोचलो. हे छोटंसं मंदिर आहे. मंदिराच्या मागे धबधब्याचा आवाज येत होता. तुफान वेगाने पाणी येत होतं. पाण्यात उतरण्याचा मोह झाला. प्रवाहात चिंब झालो. सकाळी राहून गेलेली आंघोळ आटपली. एव्हाना कडाडून भूक लागली. तितक्यात मुसळधार. मंदिरात जेवण्याचा निर्णय घेतला. पटापट डबे उघडले गेले. सारं फस्त केलं गेलं. लेमन राईसने तर पोट भरून गेलं.
सुधागड |
तेलबैलाच्या वाटेला लागलो. वाघजाई मंदिराकडून ठाण्याळ्याकडे जाताना उजव्या हाताला ही वाट आहे. थोडं चढल्यावर कोरलेल्या पायऱ्या लागल्या. वर टेपाड चढल्यावर पठार लागलं. समोरचं अजस्र अश्या तेलबैलाच्या भिंती होत्या. पण ढग आणि धुक्यात हरवल्या होत्या. त्याच्या दर्शनासाठी थोडा वेळ थांबलो पण कसलं काय. अंधुक दर्शन झालं. तेलबैला डावीकडे ठेवत सवाष्णीकडे निघालो. बाकी खाली कोकणात मस्त ऊन पडलं होतं. पठारावर बरंच चाललो. टोकापाशी आलो. तर एक नजाकतदार दृश्य पहायला मिळालं. चमचमणारा हिरवाईने नटलेला प्रचंड सुधागड. वर खाली होणारे ढग. सुधागडाची तटबंदी व चोर दरवाजा दिसत होता. मागच्या महिन्यात केलेल्या सुधागडाच्या आठवणी जाग्या झाल्या. कितीतरी वेळ ते दृश्य पहात होतो.
सुधागड |
शेवटी धुकं मध्ये आलंचं. सवाष्णी घाट आता सुरू झाला होता. पहिलाचं टप्पा निसरडा. काळजीपूर्वक पावलं टाकावी लागत होती. घसरला तर खैर नव्हती. आता असं नाव कसं काय पडलं त्याला इतिहास आहे पेशवे काळात पंत सखाराम त्यांची पत्नी येथे पडून मरण पावली. तिची समाधी घाटात आहे. पण वाढलेल्या गवतांत ती पाहता आली नाही. झपझप घाट खाली उतरत होतो. या वाटेला फारसं कुणी जात नाही त्यामुळे अधिक निसरडी. जपून उतरावं लागत होतं. नाहीतर पार्श्वभाग आणि जमिनीचा दाणदिशी संपर्क होणार हे निश्चित. मध्ये अळूची भलीमोठी झाडे होती. काही झाडांना भलेमोठे काटे आहेत. थोडं सांभाळूनचं जावं लागत. वाट जंगलातली होती. निसरडे दगड पाठ काही सोडत नव्हते. रमत गमत उतराई चालू होती. एका पठारावर विश्रांती घेतली. सहज वर पाहिलं. केवढं उतरून आलो आपण. आता थोडंच अंतर राहीलं होतं. एव्हाना गाव नजरेच्या टप्प्यात आलं होतं. शेवटचा टप्पा उतरलो. हुश्श पोचलो एकदाचे असं म्हणतानाच अजून शेवटचा पेपर बाकी होता. समोरची वाट पूर्ण चिखलाने भरलेली. कदाचित गुरांची वाट असावी. बाजूला काटेरी कुंपण होतं. पाय टाकावा तरी कुठे. इकडे आड तिकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती. पण कसरत करत चिखलात पाय न बुडवता हाही टप्पा पार केला. धोंड़श्याच्या बैराम पाड्यात उतरलो. समोरचं गाडी उभी होती. सुरुवातीला रडणाऱ्या सईनं हसत ट्रेक पूर्ण केला. दोन सुंदर अशा घाटवाटा पोतडीत टाकत परतीच्या मार्गाला लागलो.
![]() |
शेवटची कसरत फोटो साभार :सागर रांजणकर |
- हा ट्रेक पावसानंतर करत असाल तर पुरेस पाणी बाळगा कारण वाटेत कुठेही पाणी नाही
- सोबत वाटाडया घ्यावा
- सोबत किमान १०० फूटी दोर बाळगा. जर काही आपत्ती आली तर उपयोगी पडतो
- वाट जंगलाची असल्याने सावधानता बाळगावी
खूपच मस्त ...श्रावण सरींची शब्द गंगा अशीच खळाळत राहू दे !
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete