पाथरा घाट -आजा पर्वत माथा-गुयरीचा दरा
विजयादशमी झाली आणि वेध लागले ते सह्यांकनचे. चक्रम हायकर्सच सह्याकन म्हणजे पाच दिवस शिस्तबद्ध निसर्गाचा आस्वाद घेत सारे नियम पाळत केली जाणारी भटकंती. नाव लगेच नोंदवून टाकलं. डिसेंबर मध्ये होणाऱ्या या भ्रमंतीचा मार्ग खडतर होता
गुंडे गाव ( कोकण ठाणे जिल्हा) - पाथरा घाट- आजा पर्वत माथा(कुमशेत)-गुयरीचं दारा -डेहणे(कोकण)-करवली घाट-साम्रद-घाटघर(नगर जिल्हा)-कुलंग गड-छोटा कुलंग-गाढव घाट-लाधेवाडी (कोकण ठाणे जिल्हा)
आतुरतेने वाट पाहत प्रस्थानाचा दिवस उजाडला. दुसरी बँच हळूहळू चक्रम ऑफिसजवळ जमू लागली. थोड्याच वेळात बस निघाली गुंडेच्या दिशेने. रात्री दोनच्या सुमारास गावात आगमन झालं. एवढ्या रात्री देखील लांबा(विनय नाफडे सर),प्रणव ही टिम स्वागतास तत्पर होती. घराच्या अंगणात पथारी पसरली. व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पाचलाच जाग आली. सर्व विधी आटपत गरमागरम पोहे ढकलले. पाथरा घाट बऱ्यापैकी खडतर असल्याने भरपेट नाश्ता केला गेला. सगळ्या मुखड्यांची ओळख परेड झाली. वॉर्म अप झालं. तांबड बऱ्यापैकी फुटत होत.
तेजोमय |
आदित्य हळूहळू वर येत होता. आजोबा आणि करंधा या उधळलेल्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अधिकच खुलून दिसत होते. थोडं अंतर जीपनं कापायचं होतं. आता पायगाडी सुरू होणार होती. मध्येच रतनगड खुट्टा अलंग मदन कुलंग नी सुरेथ दर्शन दिलं. आमचे नेते अनुभवी भाऊ सह्याद्रीतला वाटाड्या म्हणून ओळख असणारे. व महेश. थोडं अंतर चालल्यानंतर दोन वाटा फुटतात एक बऱ्यापैकी मोठी इथे चुकण्याचा संभव. मोठ्या वाटेने न जाता उजव्या हाताची वाट धरावी आजोबा डाव्या बाजूस ठेवत. इथपर्यंत वाट दाखवत लाम्बा व प्रणव पुनः कैंप कडे फिरले.
आजोबा व सीतेचा पाळणा डावीकडे सुळका |
पठारावर जाताच सीतेचा पाळणा सुळक्याने दर्शन दिलं. पुढे जाऊ तसं हा भाग दिसत नाही. मध्ये दोन ओढे ओलांडत वर चढाई केली. तेवढ्यात शिट्टीचा आवाज कानी पडला. तत्पर महेशनी लगेच हेरलं की मधुकर हरवलाय आवाजाच्या दिशेने लगेच शोधण्यात आलं. या घाटात मनुष्यवावर फारच कमी असल्याने काळजी घ्यावी लागते. सहज वर लक्ष गेलं तर पाथरा माथ्याची बेलाग कातळधार नजरेस पडली. बरीच मजल मारायची होती. पुढचा टप्पा गवताळ वळणदार चढाईचा. हा टप्पा काळजीपूर्वक पार करत ओढ्यापाशी आलो. विसाव्यासाठी थांबलो. पुढची वाट ओढ्यातून पुढे सरकत होती. मोठ मोठाले दगड कसोटी पाहण्यास त़यार होते. हाता पायांचा वापर करत माकडयुक्त्या योजत चढाई सुरू झाली.
काहीशी थकवणारी. तिथून दूर उंचावर टेपाड दिसत होत. तिथवर पोचायच होतं. मोठमोठाल्या दगडातून बाजूला होत उजव्या बाजूच्या वाटेवर मोर्चा वळवला. हि चढाई देखील फार सोपी नव्हती. घसरड्या मुरम ,बारीक खडी दगड माती यावरून नेटानं पुढे सरकत होतो. अशी सगळी कसरत करत पाथरा खिंडीत पोहोचलो. पुढे तर वेगळचं प्रकरण वाढून ठेवलं होतं. घसरड्या ,भुसभुशीत मातीवरून अरूंद वाटेवरून खडी चढाई. एव्हाना नारायणराव माथ्यावर आले होते. आतापर्यंतच्या चढाईने घामटा काढला होता. घशाला कोरड पडली होती. शरीर घामेजले होते. वाटेत एकही झाड नाही. पाथराने आपले राखून ठेवलेले रंग दाखवण्यास सुरुवात केली.
डोळे गरगरुन टाकणारी दरी |
एवढ्याश्या वाटेवर पाय रोवत चढत होतो. खाली छाती दडपून टाकणारी खोल दरी. तोच समोर कातळटप्पा आला. होल्ड्स बऱ्यापैकी आहेत. चक्रमच्या टेक्निकल टिमने दोर लावून सुरक्षित केला होता. हा टप्पा मात्र सावधपणे पार करावा लागतो. हा टप्पा संपतो न संपतो लगेच जेमतेम पाऊल मावेल असा ट्ँव्हर्स. खाली भयावह दरी. चढून वर आलो तरी परीक्षा काही संपत नाही. भुसभुशीत माती गवत पार करत चढायचं. पुढे कोकम सरबत घेत क्षीण दूर केला. ताजतवानं वाटलं. पुढील वाटचाल सुरू झाली. येथून नाफ्ताच दर्शन झाल. वर चढताच कातळाला अरुंद वाटेने एक वळण घेतलं. पुढे जेमतेम पाऊल मावेल असा ट्रँव्हर्स. पाय हळूहळू सरकवत हा टप्पा पार करावा. खाली पाहील तर भयकाप उडवणारी दरी. इथे अडकलो. एम.बी नी लगेच हात देत सोडवल. श्वास वाढला. पुढे पायऱ्यासदृश्य वाट माथ्यावर घेऊन जाते. वर गेल्यावर पाथरा पार केल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पोटपूजा करत कँपसाईटवर पोहोचलो. येथून आजाेबा करंडा यांच सुरेख दर्शन होत होतं. शमांगी प्रणव यांनी स्वागत केलं. सूप व जेवणावर ताव मारत झोपी गेलो. थंडीचा पारा चांगलाच वाढला होता. पहाटे जाग आली ती कोल्हेकुईने. तयार होत आजोबा सर करण्यास सरसावलो.
आजा पर्वत |
आजोबा पायथ्याशी भूसलख्खन झालय त्या मातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढत पुढे निघालो. वाटेत झाडझुडपं. छोटे छोटे कातळटप्पे दगड पार करत उजव्या बाजूस भला मोठा ट्रँव्हर्स मारत पाण्याच्या कुंडापाशी आलो. क्षणभर विश्रांती घेत पुढे निघालो. गतवर्षी केलेल्या आजोबाच्या आठवणी ताज्या झाल्या. अजूनही बऱ्यापैकी चढ बाकी होता. आजोबाच तो. सहजासहजी थोडचं शक्य आहे? आता खडी चढण आणि दगडमातीचा घसारा. पाऊलं रेटीत काठीच्या जोरावर वर यायचं. चढणाऱ्याला बाजूच्या कारवीचा काय तो आधार.
घसारा |
माथ्यावर येताच लख्खपणे दिसणारे रतनगड,खुट्टा कळसुबाई,त्रिकुट अलंग मदन कुलंग सांधण दरी डोळ्यात साठवल. उतराईस सुरूवात झाली. उतरताना पावल बऱ्यापैकी रोवत उतरावं नाहीतर घसरगुंडीच. दिड दोन तासात खाली उतरलो. जेवण वाट पहात होतं. पाण्याच्या ठिकाणी जेवण करत पाणपिशव्या भरून घेतल्या. कारण गुयरीच्या दारातून डेहणेपर्यंत पाणी नाही. आजोबा व करंधा यांच्यामधून दिसणारी व्ही आकाराची घळ म्हणजे गुयरीच दार.
व्ही आकारात गुयरीचा दरा आजोबा आणि करंडा च्या मध्ये |
दारात पोहोचेपर्यंत जंगलवाट. मागे आजोबा करताना प्रसादने दाखवली होती. त्या घळीतून खाली निरखलं पार दूरवर कोकण दिसत होतं दाऱ्याघाटासारखं. गावकरी काही प्रमाणात वापरतात. ट्रेकर्स जवळपास नाहीच. घळीत उतरलो. ट्रेक पोल बँगेत टाकला.
गुयरीचा दरा |
मोठमोठ्या दगडांवरून चालण्याची कसरतच होती जणू. भलीमोठी बँग सांभाळत दोन दगडांचा आधार घेत पार होणं. कधी बसत पाय सोडत उतरण. कधी दगडाकडे तोंड करून उतरणं. काही ठिकाणी फारच काळजीपूर्वक उतराव लागत होतं. दगड घसरत होते. त्यात तीव्र उतार. तोच वीस एक फुटांचा कातळटप्पा लागला. येथे प्रसादने दोर लावत सुरक्षित केला होता. खाली मंगेश मार्गदर्शन करत होता. हा टप्पा व्यवस्थित पार केला. तरी दगड काही पाठ सोडेनात. पण थंडगार सावलीचा दिलासा होता. तीव्र उतार उतरल्यावर एक वाट डावीकडे जंगलात जाते. ती धरावी. मागे वळून पाहीलं तर करंधा चमचमत होता. हा थोडा जंगलटप्पा. तरीही काही ठिकाणी उतार होताच. तंगडतोड करत पुन्हा उजवीकडे पाण्याच्या वाटेत आलो. पुन्हा दगडांशी मुकाबला. थोडं अंतर कापत उजवीकडे लहानशा वाटेवर चढलो. पुन्हा जंगलवाट. आता मात्र पावलांचा वेग वाढला. अंधारायच्या आत गावात पोहचणं गरजेच होतं. तितक्यात तीव्र उतार घसाऱ्याचा टप्पा आ वासून उभा होता. इथे शूज ला ब्रेक लावत काठीचा आधार घेत आस्ते जावं. हा टप्पा संपतो न संपतो गवताचा घसारा सुरू. तीव्र उतार पाठ काही सोडत नव्हता.
घसरगुंडी शेवटचा टप्पा |
काळोख पडायच्या आत हा टप्पा सुखरूपपणे खाली उतरलो. डेहणे कँप टिम सरबत घेऊन तयार होतीच. ताजतवानं होत डेहणेची वाट धरली. सपाटीची वाट असल्याने पायांना आराम होता. टॉर्च लावाव्या लागला.नदी काठाने चालत दिड एक तासात डेहणेत आलो. गावातली लोकं पाथरा चढून वर गेलो म्हणून तोंडात बोटं घालत होती. तब्बल १२ तासांची चाल झाली होती. मैत्रीने बनवलेल गरमागरम सूप पोटात जाताच गुयरी उतरतानाचा थकवा निघून गेला. डेहणे छोटसं टुमदार असं गाव. सह्याद्री रांगानी वेढलेलं. सूप पिताना लांबाचे ट्रेकिंग नुस्खे ऐकले. लाम्बा म्हणजे अगदी खेळकर माणूस. थोड्याच वेळात पोटोबा करत झोपी गेलो. दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.
कुमशेत छावणी |
पाथरा घाट
कोकणतालं गाव: गुंडे
घाटमाथ्यावरील गाव: कुमशेत
श्रेणी : कठिण
लागणारा अवधी:६ ते ७ तास
गुयरीचा दरा:
कोकणातील गाव:डेहणे
घाटमाथ्यावरील गाव :कुमशेत
श्रेणी:कठिण
लागणारा अवधी : ६ते ७ तास
पाथरा घाट व गुयरीचा दरा काही नोंदी:
- नवख्या ट्रेकर्सनी शक्यतो टाळावा
- अनुभवी ग्रुप सोबत करावा
- शारिरीक व मानसिक तयारी हवी
- गरज पडल्यास दोराचा वापर जरूर करावा
- पाण्याचा पुरेसा साठा सोबत घ्यावा
- पाथरा घाटच्या वाटा कठिण आहेत पण अशक्य नाहीत माती भुस भुशीत व घसारा असल्याने थोड्या अवघड आहेत घाबरून न जाता सावधपणे पार करावा.
आजा पर्वत माथा :
पायथ्याच गांव:कुमशेत
श्रेणी:मध्यम
लागणारा कालावधी : ४:३० ते ५ तास (चढ़ाई+उतराई )
पायथ्याला पाण्याची सोय आहे. वर चढताना मधे पाणी साठा आहे.
विशेष आभार :चक्रम हाइकर्स
(क्रमशः )
पायथ्याच गांव:कुमशेत
श्रेणी:मध्यम
लागणारा कालावधी : ४:३० ते ५ तास (चढ़ाई+उतराई )
पायथ्याला पाण्याची सोय आहे. वर चढताना मधे पाणी साठा आहे.
विशेष आभार :चक्रम हाइकर्स
(क्रमशः )
Excellent description.
ReplyDeleteThank you
DeleteNice write up
ReplyDeleteThank you
DeleteAs usual very informative n detail description...good
ReplyDeleteThanks swarupa
Delete