Saturday, December 3, 2016

हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने: भटक्यांचे नंदनवन !

हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने : भटक्यांचे नंदनवन ! खूप दिवस कामाच्या ओझ्याखाली दबून गेलो होतो. शहरात अक्षरशः जीव घुसमटला होता काहीतरी वेगळ कराव असं वाटत होतं. मग काय ठेवली कामं बाजूला आणि हरिश्चंद्र गडाकडे प्रयाण करण्यास पुण्याच्या WTA सोबत निघालो. सह्याद्रीत असलेल्या या बेलाग गडावर आपली पावले उमटणार तेही नळीच्या वाटेने या विचाराने मन उल्हासित झालं होतं. सव्वा अकराच्या दरम्याने आम्ही ठाणे जिल्ह्यातील बेलपाडा या आदिवासी गावात पोहोचलो. थोडं थांबून साडेअकराच्या सुमारास चढाईस प्रारंभ केला. नारायणराव आग ओकत होते. वर पाहिले तर स्थितप्रज्ञ,अजस्त्र ,बलदंड असा कोकणकड़ा खुणावत होता घामाच्या धारा वाहत होत्या. वाट बिकट होती. मोठ मोठ्या दगडांशी दोन हात करत चढाईला सुरुवात केली.

 थोड्या चालीनंतर नळीत प्रवेश केला. नाळीतील गार वाऱ्याच्या स्पर्शाने शरीर शहारलं. या गारव्यामुळे थोडा दिलासा मिळाला. पण आता खरी कसोटी लागणार होती. नळीची वाट म्हणजे हरीश्चंद्र गडावर जाणारी सर्वात अवघड वाट. प्रस्तरारोहणाचे तंत्र योजत नाळेतून थरार अनुभवत  मार्गक्रमण करावं लागत. उंचच उंच डोंगर रांगा आणि घनदाट अशी झाडी अशा  वातावरणात  हरिश्चंद्र गड अधिकच ओढ लावत होता . सोबत प्रसाद वाघ होता. प्रसाद म्हणजे सह्याद्रीत कसलेला गडी. सह्याद्रीचा सखोल अभ्यास व अनुभव. पायातल्या बूटापेक्षा मनाची ग्रिप अधिक महत्त्वाची या तत्वास मानणारा. म्हणजेचं मन चलबिचल होता कामा नये. नावाप्रमाणे  सह्याद्रीतला वाघच आम्ही छोटे छोटे कातळटप्पे पार करत होतो. पाय ठेवताच दगड व माती घसरत होती. त्यामुळे अडचणी येत होत्या. प्रत्येक पाऊल प्रस्तराचा अंदाज घेत तोलून मापून टाकावे लागत होते.




काही टप्पे पार केल्यानंतर भला मोठा कातळ टप्पा समोर उभा ठाकला जवळपास ३० फूटांचा. प्रसादने मुक्त चढाई करत दोर बांधला. मग हळूहळू सगळे हात पाय कपाऱ्यात रोवत वर चढले. मोठा टप्पा पार झाला. पुढे सावली पाहून शिदोरी सोडली. ठेपला ब्रेक झाला. आजूबाजूचं निसर्गसौंदर्य डोळ्यात भरून घेत होतो.थोडं पुढे गेल्यावर आणखी एक कातळटप्पा लागला थोडा छोटा पण जिकीराचा होता. खाली तीव्र उतार. वेडेवाकडे प्रस्तर. सटकला तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. हा टप्पा सावधपणे  पार करत वर आलो. एक छोटासा पण धोकादायक ट्रँव्हर्स मारला. वर प्रसन्ना गडावरचं गार पाणी घेऊन थांबला होता. त्या थंडगार पाण्यानं तृष्णा भागवत  ताजतवानं होत सोपी चढाई करत तब्बल साडे पाच तासांनी  कोकणकड्यापाशी पोहोचलो. सर्वांच्या चेहऱ्यावर नळीच्या वाटेने गड चढून आल्याचे एक वेगळचं समाधान होतं. वरून खाली पाहीलं तर नळीची वाट दिसत होती. विश्वासचं बसत नव्हता की इथून वर चढून आलो. कोकणकड्यावर डेंजर वारा सुटला होता. भव्य कोकणकड्याला लवकरच येतो असं वचन देत तंबूत पाठीवरची बोचकी टाकण्यास पळालो. थोडी विश्रांती घेतली. आणि गडफेरीसाठी निघालो. हरिश्चंद्रेश्वराची धावती भेट घेतली. कारण कोकणकड्यावरून मावळत्या दिनकराचा सोहळा चुकवायचा नव्हता. थोड्याचं वेळात कोकणकड्यापाशी आलो. सांजवेळ होत आल्याचा वातावरणाने इशारा केला. हवेत थोडा गारवा होता. कोकणकड्यावरून खाली उभ्याने पाहण्याचा धीर होत नाही. झोपूनच पहावं लागत. त्या भयाण सौंदर्याचा अनुभव घेतला. वक्राकार,आत घुसलेला. जवळपास ४०० मीटर खाली जाणारा.



 या बाजूने गडावर प्रवेश करायचा तर वाघाचचं काळीज हवं. काही जिगरबाज गिर्यारोहकांनी हा मान मिळवलाही आहे. येथून जुन्नर व मुरबाडचं विलोभनीय दर्शन घडतं. नाणेघाट तर अप्रतिम. पावसात इंद्रवज्र देखील दिसत. एकूणच कोकणकडा मन मोहून टाकतो. कोकणकड्यावर काही पिकनीकर्सची सेल्फीगिरी चालू होती. आम्ही मात्र सूर्यास्त पाहण्यासाठी जागा पकडली. थोड्याच वेळात सोहळा सुरू होणार होता. मावळतीने रंग उधळायला सुरूवात केली होती. डोळे क्षितिजाकडे खिळले. नारिंगी रंगाचा तो गोळा खाली सरकू लागला. हळूहळू झरझरत नजरेआड झाला. सोहळा पार पडला. एकंदर कोकणकड्या शिवाय हरिश्चंद्रगड पूर्ण होऊ शकत नाही  उजेड कमी झाला होता. हवेतला गारठा वाढला होता. आम्ही तंबूत परतलो. टॉमेटो सूप घेता घेता थंडी पळाली. भास्कर दादा कडे जेवणाची सोय होती. जेवण झाल्यावर थोडी शेकोटीची मजा घेतली. गप्पाटप्पा झाल्या. मग थकलेलं शरीर तंबूत पहुडलं. अणि केव्हा डोळा लागला कळलच नाही. सकाळी लवकर जाग आली. थोडी गडफेरी झाली. कोकणकडा वेगळाच भासत होता. चहासाठी गेलो. आमच्यासोबत असलेल्या काकांनी ठेपला काढला. तिथे एक परदेशी युवक होता. ते पाहून तो म्हणाला " I want to click photo of you with Chapati. " मला  हसू आलं पण आवरलं. त्याच्यासाठी चपाती,ठेपलाचं कुतूहल असणारचं .त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या.नंतर हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे निघालो.सहस्त्र वर्षांपूर्वीचं हे हेमाडपंथीय पाषाणशिल्प पाहताक्षणीच भुरळ घालत. मंदिरावरील कलाकुसर अप्रतिम आहे. आजूबाजूला इतर मंदिरं आहेत पंचायतन सारखं. मंदिराच्याच अंतर्भागात पाण्याचं टाकं आहे. गडावर  येणाऱ्यांची तृष्णा भागवणारं शीतल जल देणारं. हे मंदिर  स्थापत्य कलेचा अद्वितीय असा अविष्कार आहे  हरिश्चंद्र गडाचा इतिहास फार प्राचीन आहे.




मंदिराकडून खाली गेलं की केदारेश्वराची गुहा लागते. येथे प्राचीन शिवलिंग आहे. येथे बारमाही पाणी असतं. छत चार खांबांवर तोललेल होतं आता एकच खांब शिल्लक आहे. कदाचित काळाच्या ओघात असेल.हा परिसर पवित्र आहे पण आता येणारे पर्यटक कचरा करतात मलमूत्र विसर्जनही अगदी प्रवेशद्वारासमोर केल जात  ते पाहून मन खट्टू झालं निर्लज्जपणाचा रागही आला. आता तारामती शिखरावर चढाई करायची होती. अर्ध्या तासात शिखरावर पाऊल ठेवलं. तिथे पहाण्याजोगं असं काही नाही. पण अनेक डोंगररांगाचं दर्शन घडतं. तिथे पडलेला ध्वज परत रोवण्याचा प्रयत्न करत होतो. हाताने दगड बाजूला करतोय तेवढ्यात खाली शेपटी वळवळली. स्वप्निल जोरात ओरडला तसा माझा हात स्प्रिंगसारखा मागे आला . दैव बलवत्तर म्हणून वाचलो. त्याचे मनोमन आभार मानत खाली उतरलो. आता बालेकिल्ला सर करायचा होता. या ठिकाणी सहसा कोणी जात नाही. त्यामुळे वाट बिकट होती काट्याकुट्यांनी भरलेली. वर गेल्यावर माळशेजचा नयनरम्य परिसर डोळ्यात सामावतो. बालेकिल्ला उतरलो. थोडी विश्रांती घेत तोलारखिंड तून प्रवास सुरू झाला रोजच्या रहाटगाडग्यात परतण्यासाठी. दोन दिवस सह्याद्रीच्या सानिध्यात राहीलेलं मन काही केल्या परतायला तयार नव्हतं. शरीर परतीच्या वाटेवर निघाल पण मन मात्र तिथेच घुटमळत होतं. कोकणकड्यापाशी. 


2 comments:

  1. खूपखूप सुंदर!!!
    सह्याद्री आहेच असा!!!
    आणि केलेली स्तुती लाजवाब!!!

    ReplyDelete