Thursday, May 4, 2017

चांदण्यातली भ्रमंती (कात्रज-सिंहगड)

सह्याद्री भटकायच्या मोहात एकदा अडकलं की त्यातून बाहेर पडणं अशक्यचं. त्यात रेंज ट्रेक तर आमचा वीक पॉईंटच. कात्रज ते सिंहगड रात्रीच्या गार हवेतून केली जाणारी पायपीट. भटकंतीसोबत महिन्याभरापूर्वीच प्लान ठरवून टाकला. तसही रात्रीचं पदभ्रमण बरेच दिवस केलं नव्हतं. हैदराबाद एक्सप्रेस ने पुण्यात अवतरलो. थोडा चहा मारला. स्वारगेटला जाणाऱ्या टिप्पीकल पीएमपीएम्एल  मध्ये बसलो. खणखणीत आवाजात बस सुरू झाली. 

Wednesday, April 12, 2017

सह्याद्रीतली पायपीट (कमळगड- कोळेश्वर पठार-जोर-बहिरीची घुमटी-आर्थर सीट )

कडक उन्हाळा. त्यात एखादा ट्रेक करायची खुमखुमी आली होती. एखाद्या तगड्या ट्रेकच्या शोधात होतो. आणि चक्रमचा ट्रेक मिळाला. कमळगड ते आर्थर सीट. एकदम सणसणीत. चक्रम प्लान. कमळगड कोळेश्वर खूप दिवसांपासून खुणावत होते. मुलुंडवरून निघायच होतं. सगळे जमले. आम्हाला नेणारी गाडी आलीं. अथर्वचे बाबा म्हणाले कोंबडागाडी. कोंबडागाडी म्हणजे फोर्स ची क्रुझर हो. त्या कोंबडागाडीत सगळे बसलो. प्रवास सुरू झाला. खंडाळा घाटातल्या ट्राफीक ने थोडं बेजार केलं. मुंगीच्या पावलाने गाडी पुढे सरकत होती . पहाटे खेड शिवापूर ला  गाडीतून उतरलो तर अंग शहारलं. मुंबईत वाफा तर इथे थंडी. वेगळचं अगदी. चहा मारत पुढचा प्रवास सुरू केला. सकाळ होत होती. बऱ्याच ठिकाणी मोरांनी दर्शन दिलं. आकोशी  गावात पोहोचलो. एका जर्मन शेफ़र्ड़ने आमचं दमदार स्वागत केल.

Sunday, March 19, 2017

तंगडतोड : रतनगड ते हरिश्चंद्रगड


एक भन्नाट वारी. वारीचं म्हणायची ती. मागच्या खेपेस कुमशेत ते कात्राबाई केला होता पण वेळेअभावी रतनगड हुकला होता. संधी चालून आली ती डोंबिवलीच्या ट्रेकक्षितिज मुळे. शुक्रवारी बँग भरली. अंगात थोडा ताप असल्याचं जाणवत होतं. थकल्यासारखं वाटत होतं. तंगडतोडीला जावं की नको तळ्यात मळ्यात चाललं होतं. पस्तीस चाळीस किमी रपेट जमेल कि नाही ?  शेवटी शेंडी तुटो की पारंबी म्हणत तळ्यात उडी मारली म्हणजेचं तंगडतोडीस स्वतःला सज्ज केलं. क्रोसीन घेत बस प्रवास सुरू झाला. बस रतनवाडीच्या दिशेने धावत होती. गाढ झोप केव्हा लागली कळलचं नाही. भल्या पहाटे रतनवाडीस पोहेचलो. पहाटेच्या नीरव शांततेत मंदिरातील किर्तनाचे सूर कानी पडत होते. थोडा गारवा जाणवत होता. पाठीवरील बोचकी  ठेवत काळोखाचा फायदा घेत महत्त्वाची कामं आटपून घेतली. पोटाची साफसफाई झाली. सगळे पोह्यांवर आडवे पडले. आणि गवती चहा. बेस्टचं एकदम. एव्हाना उजाडू लागलं. रतनवाडी हळूहळू जागी होत होतं. रविकिरणं अमृतेश्वरावर पडत होती. रतनगडचा खुट्टा ,नेढं खुणावत होतं. अमृतेश्वराची ओढ लागली. एक धावती भेट घेतली. याचं सौंदर्य कितीही वेळा पहा डोळ्यांचं समाधान होतंचं नाही.

Thursday, February 16, 2017

बागलाणात दोन दिवस



खूप दिवस बागलाणातील किल्ले पालथे घालायचा विचार मनात घोळत होता. पण योग येत नव्हता. या ना त्या कारणाने शक्य होत नव्हतं. अखेरीस चक्रम हाइकर्स बरोबर जाण्याची तयारी केली. नाशकातले वैशिष्टपूर्ण किल्ले सर करण्यात वेगळीच मजा असते. रात्री बसने नाशिककडे मार्गस्थ झालो. मख्खन रस्ता असल्यामुळे गाडी भरधाव होती. झोपही छान लागत होती. गाडी नाशिकला येताच नाशिककरांना घेत सटाण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं. मध्ये चहा मारत झोप उडवली. सहज दुकानातल्या वेफर्सच्या पाकीटांकडे लक्ष गेलं तर नाव होतं सैराट. काय काय नाव देतील हे देवचं जाणे. असो. साडेपाचचे सुमारास वाडी चौल्हेर येथे अवतरलो. आडोसा शोधत महत्त्वाची कामं आटपली. गरमागरम पोहे पोटात ढकलत चौल्हेरच्या दिशेने शिस्तबद्ध कदमताल सुरू. अमेय आघाडी सांभाळत होता तर सौरभ पिछाडी. ही वाट सोंडेवरून जाते. थोड्याच वेळात तीन भुयारी दरवाज्यांपाशी पोहचतो. हे दरवाजे म्हणजे उत्तम वास्तुकलेचा नमुना आहे. या दरवाज्यातनं वर गेल्यावर बालेकिल्यापाशी जाता येत. येथे काही पाण्याची टाकं आहेत. पण पाणी पिण्यायोग्य नाही. कडेला बसून डोलबारी रांग व बाकी परीसर न्याहाळता येतो. 

Sunday, January 29, 2017

सातपुड्याच्या कुशीत



मध्यप्रदेशात भटकंती करताना आवर्जुन भेट देण्यासारख  ठिकाण म्हणजे भेडाघाट मार्बल रॉक. जबलपुर पासून अवघ्या १० किमी वर. तिथल आणखी एक आकर्षण म्हणजे धुवाँधार धबधबा. येथे जाण्याच्या मार्गावर अनेक संगमरवरी कलाकुसरीच्या वस्तुंची दुकान आहेत. 
                                                                    धुवाँधारचा जलप्रपात 


                                                         
थोड्याच वेळात समोर दिसतो तो फेसाळत खाली कोसळणारा जलप्रपात . पाहून अचंबित व्हायला होत. नाव अगदी सार्थ करणारा धुवाँधार. कोसळत असते ती पांढरीशुभ्र जलधारा. पाण्यावर  जणू काही धुराचे लोट. खाली खळाळणारं पाणी. आल्हाददायक  अस वातावरण. धुवाँधार अक्षरशः  डोळ्यांचे पारणे फेडतो.  हे सगळ पाहून धबधब्यात न भिजताही मन ओल चिम्ब होउन जात. पावलं निघायच नावच घेत नाहीत. आता वेळ होती ती नर्मदेच्या पात्रातून  संगमरवरी शिळांच्या सानिध्यात नौका  सफरीची. नर्मदेचं शांत पाणी. दोन्ही बाजूने संगमरवरी शिळा. अतिशय सुंदर विलोभनीय. त्यात नावाड्याचं रसाळ काव्यमय वर्णन भर टाकतं. तो अनेक पुराणातले, सिनेमांच चित्रीकरण झाल्याचे संदर्भ देतो. या शिला आपल्याला वेगवेगळ्या आकारांत ब्रम्हा  विष्णु,महेश अशा अनेकविध  आकारांत दिसतात. फ़क्त गरज सौंदर्यदृष्टिची. त्याच  ते एक वाक्य आठवत "समझे तो आर्ट नहीं तो मॉडर्न आर्ट". जवळपास तासभर केलेली ही  सफर केवळ अविस्मरणीय अशी होती. 

                        नर्मदेतील संगमरवरी शिळांचं मनोहारी दृश्य कितीही पाहीलं तरी मन भरतचं नाही.         
   
मध्यप्रदेशात अनेक जंगले आहेत. त्यातलच एक मधाई म्हणजेच सातपुडा नॅशनल पार्क. १५०० चौ .किमी क्षेत्रफळ असलेल हे जंगल. सातपुड्याच्या रांगांनी वेढलेलं. वाघांसाठी राखीव असलेल जंगल. देनवा नदीच्या काठावर एका वेगळ्या तिन्हीसांजेचा अनुभव घेऊ शकतो. विस्तीर्ण असा देनवाचा जलाशय डोंगररांगानी वेढलेला. मावळत्या दिनकराची डोंगरापल्याड जाण्याची लगबग. अनेकविध पक्षांचा मुक्त विहार. या ठिकाणी अनेक दुर्मिळ पक्षांच दर्शन घडत. मधेच एखादी विहार करणारी नौका. वातावरणाचा बदलत जाणारा रंग. पाण्यावरही पसरलेली लाली. अतिशय विहंगम दृश्य.  जणू काही सोहळाच असल्यासारखा. या सोहळ्याच नेत्रसुख घेण्यासाठी आसनस्थ व्हाव आणि रंगमच्याकडे पाहत रहावं. ही रमणीय अशी संध्याकाळ पाहून मन रमल नाही तर नवलच. हे सार टिपण्यासाठी कॅमेरा अस्वस्थ होत राहतो. हे सार कॅमेऱ्यात अणि मनाच्या कप्प्यात साठवत होतो.  क्षितिजावर डोळे स्थिरावले भास्कराला निरोप देण्यासाठी. वातावरणात थोडासा  गारवा. थोड्याच वेळात सूर्य डोंगराआड विसावला. निरोप समारंभ  पार पडला. सर्वत्र संधिप्रकाश पडलेला. या संधिप्रकाशात  भवतालचा परिसर वेगळाच भासत होता. अशी ही अविस्मरणीय संध्याकाळ. 
                                                     देनवाच्या तीरावर बसून पाहिलेला सूर्यास्त 
                                                                  पोटापाण्याची सोय करताना 

दुसरा दिवस जंगल भ्रमणाचा. मधाई सफरीसाठी बोटीने पलीकडे जावे लागते. मनात उत्सुकता होती.  जिप्सी तयार होतीच. या जंगलाच वैशिष्ट्य म्हणजे येथे लांबच लांब रांगा नसतात. जिप्सिच्याही ठराविक फेऱ्या असतात सकाळी ११ व संध्याकाळी ११. एका वाहनात ५-६ माणसं.  गाइड अणि चालक अशी जोड़ी होती. गरजेच्या सूचना देत आमची जंगल सफर सुरु  झाली. समोरच एका गवताळ कुरणात चितळांची झुंड नजरेस पडली. मनसोक्त बागडताना. गाइड ने माहिती देण्यास सुरुवात केली. येथील गाइड व जिप्सी चालक प्रशिक्षित व कुशल आहेत. झाडे पक्षी प्राणी याविषयी सखोल माहिती आहे. उत्सुकतेपोटी विचारलेली माहिती त्यानी अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितली. हे जंगल अतिशय घनदाट असे आहे. सूर्य उगवत होता. कवडसे झाडांमधून झिरपत होते. पक्षांचा किलबिलाट बाकी वातावरणात स्तब्धता. एकूणच प्रसन्न अशी जंगलातील सकाळ. तज्ज्ञांच्या मते भारतात मधाई येथे  महाकाय गवा रेडे,सांबर  आढळतात. या सफ़रीत अनेक प्राणी , पक्षी पाहिले पण व्याघ्र दर्शन काही झाले नाही. तरीही काहीतरी वेगळ अनुभवल्याचा आनंद मात्र ओसंडून वाहत होता. वाघाच्या पलीकडे जंगलात इतर पाहण्यासारख आहेच की. त्यामुळे वाघ म्हणजे सर्व काही हा विचार सफर करताना सोडून सफरीचा आस्वाद घ्यावा.  हे सर्व पाहताना वेळ कसा निघुन जातो कळतच नाही. अवर्णनीय अशी सफर. एकदा अनुभवावी अशी. 

                                                                          अपनेही धुनमें 

                                                                            किंगफिशर 








                                                             गाइड व जिप्सी चालक सोबत 
 प्रसन्न सकाळ 



















                                                                          

Wednesday, January 18, 2017

अनवट वाटांवर (कुंजरगड ,आजा डोंगर,कात्राबाई डोंगर)

काही वाटा या अनवट असतात. या वाटांवर भटक्यांची पावलं पडली कि यादेखील सुखाऊन जातात. अशाचं अनवट वाटांवर जाण्याचा मनसुबा केला. प्रसादच नियोजन होत. एकदम कड़क प्लान. गडकिल्ल्याची श्रीमंती लाभलेल्या नगर जिल्ह्यात भटकंती. सगळे भिडू पुणेकर असल्याने पूण्यास जावे लागणार होते. सह्याद्रीच्या भेटीसाठी एव्हडी मेहनत करण्यास तयार  झालो सह्याद्रीच्या दर्शनासाठी सह्याद्री एक्सप्रेसने पूण्यास कूच केलं. नगरचे गड किल्ले पालथे घालायचे होते. रात्री नारायणगावला मस्त थंडीत मसाला दुधाचा आस्वाद घेत पुढे निघालो. सुमारे चारच्या सुमारास विहीरगावात डेरेदाखल झालो. बसमधून उतरताच नगरच्या शरीर गोठवणाऱ्या थंडीने आमचं स्वागत केलं. पारा चांगलाच खाली गेला होता. थोड्याच वेळात सारे स्लिपींग बँगमध्ये गडप झाले. थोडीफार झोप होते न होते तोच सकाळचे सहा वाजले व कुंजरगडाकडे मार्गक्रमण सुरू झालं. हा गड हत्तीसारखा दिसतो म्हणून कुंजरगड. सुरूवातीस सोपी वाटणारी वाट खडी होत होती. सकाळचं प्रसन्न असं वातावरण असल्यामुळे तेवढी दमछाक होत नव्हती. वर एक मंदिर लागतं तिथे काळोबा व मारूतीच्या मूर्तीच धावतं दर्शन घेत पुढे कूच केलं. ट्रँव्हर्स पार करत एक छोटा चढाईचा टप्पा ओलांडत भुयारापाशी आलो. हे जवळपास ३० फूटांचे आरपार भुयार आहे.हे भुयार या गडाचं मुख्य आकर्षण आहे.

Saturday, December 31, 2016

दाऱ्यातून उतरताना

खूप दिवसांपासून सह्याद्रीस बिलगलो नव्हतो. एखाद्या दमदार,तगड्या ट्रेकची प्रतिक्षा होती. महादेवने टाकलेला दाऱ्या  घाट वाचला आणि प्रतिक्षा संपली. तसाही दाऱ्या घाट मनात खूप दिवस घोळत होता. त्रिगुणधारेतून वर चढायचं. दुर्ग,धाकोबा व दाऱ्या तून खाली. एकदम तगडा ट्रेक. शुक्रवारी रात्री कल्याण बस स्थानकात हजर झालो. महादेवशी गप्पा मारत असताना एक समोर बसलेला कलाकार आमच्या जवळ आला. त्याच्या बोलण्यावरून तो नुकताच तीर्थप्राशन करून आल्याचं आम्ही ताडलं. त्याचं काय झालं की महादेवने बाकावर ठेवलेली भलीमोठी  बँग मढ्यासारखी वाटली म्हणून तो विचारपूस करण्यास आला.  गमतीचा भाग. तात्पर्य सतर्कता महत्त्वाची. आम्ही अवघे सात जण होतो. मुरबाडला जाणारी यष्टी पकडली. जवळपास बाराच्या सुमारास पोहोचलो. स्थानकात चार पाच पाशिंजराखेरीज कोणी नव्हतं. आम्ही आलो आणि गडबड सुरू झाली. डेहरीची  बस १२:३०ची होती. ट्रेक्स , अवघड ट्रॅव्हर्स च्या गप्पांमधें गुंतून गेलो. बसमध्ये चढलो. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास सुरू होता. ड्रायवर महाशय पार रंगात आले होते. यष्टी उड्डाणं अशी काय घेत होती की हाडं खिळखिळी होतात कि क़ाय असं वाटू लागलं. शेवटी डेहरी गावात पोहोचलो. एका घरात पथारी पसरली. सकाळी लवकर उठलो. सर्व विधी आटपून नाश्ता करून बाहेर पडलो. डेहरी  हे गोरखगडाच्या पायथ्याचं गाव. गोरखगडाचं दूरूनचं दर्शन घेतलं. पुढचा प्रवास जीपचा होता. वाघाच्या वाडीत पोहोचलो. सह्यरांगांनी वेढलेलं हे गाव. खालून खुटे दाराची कठीण वाट व त्रिगुणधारा घाट दिसत होता. एका दादांना विचारलं किती वेळात चढता त्रिगुणधारा उत्तर एक तास. मला या एक तासाचं गणित घाट उतरल्यावरही कळलं नाही. असो.

Saturday, December 3, 2016

हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने: भटक्यांचे नंदनवन !

हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने : भटक्यांचे नंदनवन ! खूप दिवस कामाच्या ओझ्याखाली दबून गेलो होतो. शहरात अक्षरशः जीव घुसमटला होता काहीतरी वेगळ कराव असं वाटत होतं. मग काय ठेवली कामं बाजूला आणि हरिश्चंद्र गडाकडे प्रयाण करण्यास पुण्याच्या WTA सोबत निघालो. सह्याद्रीत असलेल्या या बेलाग गडावर आपली पावले उमटणार तेही नळीच्या वाटेने या विचाराने मन उल्हासित झालं होतं. सव्वा अकराच्या दरम्याने आम्ही ठाणे जिल्ह्यातील बेलपाडा या आदिवासी गावात पोहोचलो. थोडं थांबून साडेअकराच्या सुमारास चढाईस प्रारंभ केला. नारायणराव आग ओकत होते. वर पाहिले तर स्थितप्रज्ञ,अजस्त्र ,बलदंड असा कोकणकड़ा खुणावत होता घामाच्या धारा वाहत होत्या. वाट बिकट होती. मोठ मोठ्या दगडांशी दोन हात करत चढाईला सुरुवात केली.

Wednesday, October 12, 2016

सह्याद्रीतलं अमूल्य रत्न :रतनगड


झिम्माड पावसात पोट भरून भटकंती केल्यावर सरत्या पावसातली भटकंती करायची फार इच्छा होती.(सह्याद्रीत कितीही भटकंती केली तरी पोट काही भरत नाही. सह्यभ्रमणाची भूक काही भागत नाही.) बरेच दिवस सह्याद्रीची भेट झाली नव्हती. या भटकंतीसाठी रतनगड खुणावत होता. सह्याद्रीत अनेक दुर्गरत्न आहेत त्यातलचं एक रतनगड .सह्याद्रीच्या अनेक रंगांनी सजलेल्या माळरानांवरचं पुष्प वैभवही अनुभवता येईल आणि अमृतेश्वराचं दर्शन होईल म्हणून रतन गड पक्का केला. Travel त्रिकोण सोबत रतनवाडीस जाण्यास निघालो. बस वेगाने मार्गक्रमण करत होती. बस घोटीच्या आसपास अचानक धीमी झाली. पहातो तर गाड्यांची रांगच रांग लागली होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्यामुळे गाड्यांची वाहतूक रोखण्यात आली होती. मन बेचैन झालं होतं. रतनगड होतोय की नाही धाकधूक होती. पण नशिब दांडग बस त्यातून बाहेर पडली. भंडारदऱ्याच्या जवळ गार वारा सुटला होता. साम्रद,उडदवणे अशी गावं मागे टाकत बस मार्गस्थ होत होती.शेवटी पहाटे साडेपाच च्या सुमारास रतनवाडीत पाऊल टाकलं. प्रातःविधी उरकेपर्यंत तांबडं फुटायला लागलं होतं. रतनवाडीचं ते रूपडं न्यारं दिसत होतं. अमृतेश्वराचं  मंदिर, धरणाचं पाणी,चहूबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा. खरंच अकोले तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलीय याची प्रचिती येते.